आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्यसंपन्न जीवनासाठी सुदृढ दात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फेडरेशन डेंटायर इंटरनॅशनल ही दंतवैद्यकीय क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेली संघटना‘एफ. डी आय.’ नावाने ओळखली जाते. यावर्षापासून 20 मार्च रोजी ‘जागतिक मौखिक आरोग्य दिन-वर्ल्ड ओरल हेल्थ’ साजरा करण्याचे संघटनेने घोषित केले आहे.तसेच ‘हेल्दी टीथ फॉर हेल्दी लाइफ’ हे घोषवाक्य या दिनाकरिता जाहीर करण्यात आले आहे. त्या निमित्ताने हा लेख.

जगातील सर्वच देशांमधील दंतवैद्यांची संघटना स्थापन करण्याचा निर्णय अमेरिकेतील कोपनहेगन डेंटल सोसायटीच्या बैठकीत 1894 मध्ये घेण्यात आला.‘ फेडरेशन डेंटायर इंटरनॅशनल’ म्हणजेच एफ.डी.आय. असे या संघटनेचे नामकरण झाले. 1899मध्ये पॅरीस शहरात संघटनेने पहिली‘वर्ल्ड डेंटल कॉन्फरन्स’आयोजित करून जगातील दंतवैद्यानो एकत्र या अशीच हाक दिली. परिणमी संघटनेची व्याप्ती वर्षागणिक वाढली. आज जगातील 136 सदस्य देशांमधील 191 संघटना एफडीआय या शिखर संघटनेशी संलग्न आहेत. त्यामध्ये भारतातील ‘इंडियन डेंटल असोसिएशन - आयडीए’ समावेश आहे.

एफडीआय सध्या जगातील सुमारे दहा लाख दंतवैद्यांचे प्रतिनिधित्व करते. जागतिक पातळीवर मौखिक आरोग्यविषयक धोरणाच्या आखणीचे आणि अंमलबजावणीचे तसेच त्यापूर्वी आवश्यक असणार्‍या सर्वेक्षणाचे आणि संशोधनाचे काम ही संघटना करते.मौखिक आरोग्यासाठी घातक तंबाखूयुक्त पदार्थ तसेच दातकिडीला कारणीभूत शर्करायुक्त पदार्थांच्या वापरावरील निर्बंधाबाबत या संघटनेने काही महत्त्वपूर्ण शिफारशी जागतिक आरोग्य संघटनेकडे केल्या. त्यानंतर 1981मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने 2000 पर्यंत सर्वासाठी मौखिक आरोग्य ही घोषणा केली; परंतु जगातील आर्थिकदृट्या मागासलेल्या अनेक देशांमध्ये निधीअभावी मौखिक आरोग्याविषयक सुविधाच उपलब्ध झाल्या नाहीत.
एप्रिल 2004मध्ये आफ्रिकेतील नैरोबी शहरात आणि फेब्रुवारी-2005मध्ये रवांडा येथे परिषदा आयोजित करून एफडीआयने आफ्रिकन देशासाठी‘ओरल हेल्ह पॉलिसी’ तयार केली.

2007 मध्ये दुबई येथे झालेल्या परिषदेत एफडीआयचे संस्थापक डॉ. चार्ल्स गॉडन यांचा जन्मदिन 12 सप्टेंबर असल्यामुळे त्या दिवशी मौखिक आरोग्य दिन साजरा करण्याचे घोषित झाले होते; परंतु या वर्षीपासून त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. यापुढे प्रत्येक वर्षी 20 मार्च रोजी ‘ओरल हेल्थ डे’चे आयोजन संघटना करणार आहे. यावर्षी ‘हेल्दी टीथ फॉर हेल्दी लाइफ’ हे घोषवाक्य या दिनानिमित्त संघटनेने जाहीर केले आहे. जाहीर केलेल्या अहवालात संघटनेने शालेय विद्यार्थ्यांच्या दंत-आरोग्यासंदर्भात विशेष काळजी घेण्याचे सूचित केले आहे. केक्स आणि चॉकलेट्ससारख्या प्रक्रिया केलेल्या गोड आणि चिकट पदार्थाच्याअतिसेवनामुळे शालेय विद्यार्थ्यांचे दंत आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी दंत-तपासणी उपक्रमाची व्याप्ती वाढवण्यावर संघटना भर देणार असून बालकांसाठी दंतक्षय-प्रतिक्षय-प्रतिबंधक उपायांच्या अंमलबजावणीकडे विशेष लक्ष देणार आहे.एफडीआय संघटनेच्या सर्वेक्षण अहवालामध्ये मौखिक आरोग्यासाठी घातक घटकांची नोंद गांभीर्यपूर्वक घेण्यात आली आहे. त्या अनुषंगाने ‘व्हिजन-2020’ हे डॉक्युमेंट तयार करण्यात आले आहे.

‘2020 पर्यंत सर्वांना मौखिक आरोग्य’ हे एफडीआयचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देश्भरातील दंतवैद्य, दंतवैद्यकीय विद्यार्थी आणि अन्य सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील व्हावे, हीच अपेक्षा आहे.