आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Teja Kulkarni Article About Women's Self Help Groups, Divya Marathi

कुटुंब व समाजाचे प्रोत्साहन आवश्यक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिला बचत गटाच्या योजनेमध्ये बँकेची भूमिका फार महत्त्वपूर्ण असते. काही महिला एकत्र येऊन गट तयार झाल्यावर बचत गटाचे खाते उघडण्यासाठी बँकेत येतात. या महिलांना बँक व्यवहारात संपूर्ण सहकार्य करणे आवश्यक असते. जसे की, भर उन्हातान्हात, पावसात बँकेत पैसे जमा करण्यासाठी आलेल्या महिलांना समजून घेणे, त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे, प्रसंगी इतर कामे बाजूला ठेवून प्राधान्याने या महिला बचत गटासाठी वेळ देण्याची आवश्यकता असते. महिलांना हेलपाटे घालण्यास लावणे, पुस्तक वेळेवर भरून न देणे, दुर्लक्षित कारणे, अथवा निष्क्रियता दाखवणे असे प्रकार होता कामा नयेत. कारण या महिला घरातली सर्व कामे करून संसारासाठी हातभार लागेल या उद्देशाने बचत गटात आलेल्या असतात. छोटी छोटी बचत या महिलांना फार मोलाची असते. या छोट्या बचतीमधला आनंद खरोखरच त्यांच्या चेहर्‍यावर वाचता येण्यासारखा असतो. उत्साहाने बँकेमध्ये आलेल्या महिलांना बचत गट प्रक्रियेमध्ये प्रोत्साहनाची फार गरज असते. ही भूमिका बँक कर्मचारी, अधिकारी फार चांगल्या प्रकारे करू शकतात, किंबहुना करणे आवश्यकच आहे.

महिलांना बचत गटाच्या माध्यमातून अर्थार्जन करणे सोपे होणार आहे. कारण एखादा छोटासा व्यवसाय निवडला तर बचत गटाच्या भांडवलातून कर्ज मिळू शकते आणि गट काही महिन्यांच्या अनुभवी आणि काही उद्योग व्यवसायासाठी पात्र झाल्याची बँकेची खात्री झाली तर बँकही या उद्योग व्यवसायासाठी अल्प व्याजदराने कर्ज पुरवठा करू शकते. रिझर्व्ह बँकेनेही तसे अधिकार सहकारी बँकांना दिलेले आहेत. गटांनी एखादा व्यवसाय निवडून त्या व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल, त्याची उपलब्धता, माल तयार करण्यासाठी कामगारांची उपलब्धता, स्वत:ची कार्यतत्परता आणि महत्त्वाचे म्हणजे तयार मालाच्या विक्रीसाठी बाजारपेठ कुठे मिळेल, कुठे तयार माल पोहोचवता येईल, त्यासाठी वाहनांची व्यवस्था, माल पुरवठ्यासाठी मनुष्यबळ, मालाची किंमत, विक्री, वसुली या बाबी तर अनुषंगाने आल्याच. या सर्व बाबींचा अभ्यास करून नियोजन आवश्यक आहे. तसेच घेतलेले काम वसा म्हणून जपल्यास छोट्यामोठ्या व्यवसायात यश प्राप्त होण्यास वेळ लागणार नाही.

उद्योग-व्यवसायात माल तयार करणे हे त्या मानाने अलीकडे सोपे झाले आहे; परंतु ग्राहकांची गरज ओळखून ती वस्तू तयार करणे, चांगल्या किमतीत ग्राहकांपर्यंत पोहोचवणे हे उद्योजकाचे कौशल्य असते. तयार वस्तूंचे पॅकेजिंग व्यवस्थित असले पाहिजे. कारण जो माल आकर्षक दिसेल तोच माल ग्राहक घेईल.

म्हणून ग्राहकांच्या पसंतीला पडेल, असा माल उत्पादन करण्याची व तो योग्य प्रकारे पॅक करण्याची आवश्यकता असते. आपण नेहमीच्या व्यवहारातही म्हणत असतो की, चार पैसे जास्त जाऊ द्या, पण माल चांगला मिळाला पाहिजे. म्हणजे पैसे खर्च करायला ग्राहक तयार असतो. आपला माल/उत्पादने त्यांच्या पसंतीला उतरली पाहिजेत हे शास्त्र सर्वांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

महिलांसाठी भविष्य निश्चित उज्ज्वल आहे; पण त्यासाठी महिलांनीही संधीचा जास्तीत जास्त फायदा घेणे गरजेचे आहे. देणार्‍याचे हात हजार, दुबळी माझी झोळी अशी वेळ येऊ नये.

कोणत्याही मालाला/वस्तूला बाजारपेठ मिळण्यासाठी उत्पादक, ठिकाण, जाहिरात आणि किंमत या मूलभूत बाबी आहेत. यामध्ये आपण तयार केलेली वस्तू विकायची आहे. ते ठिकाण विक्रीयोग्य आहे का हे पाहावे. याबरोबरच आपण तयार केलेल्या वस्तूची जाहिरात होणेही आवश्यक असते. आपण महिला बहुतेक वेळा कसं बोलायचं असा संकोच करतो. अशा वेळी तुम्ही वस्तूचे महत्त्व, त्याची उपयोगिता, त्याची गुणवत्ता, आवश्यकता आणि वाजवी किंमत याबाबत बोललाच नाहीत तर कोण आपल्या वस्तू घेणार? कोणत्याही व्यवसाय / उद्योगामध्ये गुणवत्तेत कधीच तडजोड होता कामा नये. आपण या बाबतीत जागरूक राहणे आवश्यक ठरते. व्यवसाय / धंद्यातील आणखी एक महत्त्वाचे म्हणजे तयार केलेल्या वस्तूंची किंमत. ती योग्य असली पाहिजे; ना अधिक ना कमी. विक्रीसाठी चांगले नियोजन आवश्यक आहे. या छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या बाबी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत.

मुळात महिला अत्यंत कष्टाळू, जिद्दी आणि कार्यतत्पर असतात. या तिच्या गुणांना घरातील लोकांचे, बँकांचे, समाजाचे प्रोत्साहन मिळाले, कौतुकाची पाठीवर थाप मिळाली तर या महिला बचत गटांची गाडी आत्मनिर्भर होण्यास निश्चित मदत होणार आहे. आणि महिला खरोखरच बचत गटाच्या माध्यमातून स्वयंसिद्ध होतील याची खात्री आहे.
(लेखिका जनता सहकारी बँकेच्या संचालिका असून बचत गटांच्या कामाचे नियोजन करतात.)