आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मत्स्यकथा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक आटपाटनगर, नाव त्याचं Friedrichsfahen. ऑस्ट्रिया, जर्मनी आणि स्वित्झर्लंड या तिन्ही देशांच्या सीमेवर स्थित, पण मुळात जर्मनीमध्ये असलेलं एक शहर. २०१४मध्ये एका प्रोजेक्टवर माझी तिथे बदली झाली. नवराही एक महिन्यानंतर तिथे सुट्टी टाकून आला. मी ऑफिसला जायचे आणि त्याने तिथे जर्मन शिकायला सुरुवात केली. 

आम्ही दोघेही अस्सल खवय्ये. आमच्या मते भारतीय जेवणाची दुसऱ्या कुठल्याही जेवणाला सर नाही आणि जर्मन जेवणात तर आम्हाला अजिबात (आणि तसाही) रस नाही. तिथे मित्रमंडळ नसल्यामुळे आम्ही दोघंच एकमेकांचं मित्रमंडळ होतो. त्यामुळे संध्याकाळी स्वयंपाकघरात मस्त बेत जमायचे. असं तीन महिने चाललं आणि नवऱ्याला फ्रँकफुर्टमध्ये प्रोजेक्ट मिळाला. साधारण पाच तासांचा ट्रेनने प्रवास. त्यामुळे तो सोमवार ते गुरुवार तिथेच एका हॉटेलमध्ये राहणार होता आणि शुक्रवारी रात्री घरी परतणार होता. आठवडाभर फोनवर आमच्या गप्पा. गप्पा नव्हे गायन आणि त्यात फक्त “हे जेवण माझ्या गळी उतरत नाही,” हा एकच तक्रारीचा सूर. 

त्यामुळे शुक्रवारी त्याच्यासाठी खास बेत करायचा मी ठरवलं. तो केरळचा आहे त्यामुळे मत्स्यप्रेमी. अर्थात पापलेट, सुरमईसारखे मासे तिथे मिळत नाहीत. पण आम्हाला तिथे पर्यायी आणि अत्यंत रुचकर असा salmon (उच्चार सामन. लचा उच्चार म्हणे करायचा नसतो, आणि खाताना तर आम्ही कसलाही उच्चार करत नसतो. असो.) मासा सापडला. आणि त्याला आम्ही भारतीय रंगात आणि मसाल्यात बुडवला. रात्रभराचं मॅरिनेशन तर अतिउत्तम. त्याला साधारण दोन तास १५० अंश. से.ला अव्हनमध्ये बेक केलं की, अवधूत गुप्ते म्हणतो तसा ‘चाबूक’ लागतो. तर त्या शुक्रवारी नवरा परतण्याच्या वेळेच्या अंदाजाने मी सामनला त्याच्या सामानासकट अव्हनमध्ये ढकलला. 
 
दीड तास झाला आणि नवऱ्याने दारावरची बेल दाबली. मी लगबगीने दार उघडलं आणि त्याला आठवड्यानंतर बघून आनंदाने मिठी मारली. माझ्यापेक्षा तो सव्वा फुटाने उंच आहे. त्यामुळे त्याला मिठी मारताना मला टाचा उंच कराव्या लागतात. तशा मी उंच केल्या आणि घराची लक्ष्मणरेषा ओलांडली. नकळत माझा पाय दारातून निघाला. आणि मला हर्षोल्हास आणि hydraulic door closure दोघेही नडले. दार धपकन बंद झालं. तो त्याची किल्लीसुद्धा मला देऊन गेला होता. दोन्ही किल्ल्या घरात, मी आणि नवरा दारात, आणि मासा अव्हनमध्ये!

आई गं! माझ्या गळ्यात घास नाही, मासा अडकला. 
रात्री साडेदहाची वेळ. फेब्रुवारी महिना. उणे १ अंश तापमान आणि घरातल्या कपड्यात घराबाहेर मी. मी रडायलाच लागले. “आपण आज रात्र कुठल्या तरी हॉटेलमध्ये राहू या, उद्या पाहू,” अशी नवऱ्याने समजूत काढायचा प्रयत्न केला. तेव्हा मी त्याला अव्हनमध्ये ‘तो’ असल्याची बातमी दिली आणि त्याचे समजुतीचे हावभाव “तुला खाऊ की गिळू”मध्ये पालटले. त्याने दरवाजा ढकलायचा (निष्फळ) प्रयत्न केला. पण जर्मन गुणवत्ता असा वेळीच घात करू शकते, त्याचा प्रत्यय आला (आता उपहास सुचतोय, तेव्हा बोबडी वळली होती).

तळमजल्यावर घर होतं, त्यामुळे तो भोवताली फिरून खिडकीतून आत जाता येईल का, ते पाहात होता. पण थंडीचे दिवस, मी खिडक्या करकचून आवळल्या होत्या. मला तेवढ्यात एक वयस्क बाई दिसली. तिला रडतरडत किस्सा सांगितला आणि तिने तिच्या नवऱ्याला आमच्या मदतीस धाडलं. त्याने दार पाहून मान डोलावली. नंतर माझा रडवेला चेहरा पाहून, “माझ्याकडे एक टूल किट आहे ते घेऊन येतो, पाहू या काही होतं का,” असं काहीतरी आश्वासनपूर्वक बोलून गेला. 

मला तर काहीच सुचेना. नवरा फायरब्रिगेडचा नंबर गुगल करायला लागला. ओव्हन चालू राहिला तर काय विध्वंस होऊ शकतो, याची कल्पना करवत नव्हती आणि आमच्याकडे करवतसुद्धा नव्हती. तेवढ्यात आमचे शेजारी समोरून येताना दिसले. मला इतक्या थंडीत, अशा कपड्यांत आणि अवस्थेत पाहून लगेचच आमच्याकडे आले. मला हुंदका आवरेना. मी कसंबसं त्यांना सांगितलं आणि लतादीदी, आशाताईंच्याहूनही मंजुळ स्वर कानावर पडले, “we have a spare key.” आणि माझा जीव अव्हनमधून भांड्यात पडला. सुमारे अर्धा तास ही एकांकिका चालली आणि आम्ही दार उघडून त्यावर पडदा पाडला. मी अव्हन उघडला तर तयार मासा आ वासून माझ्याकडे पाहात होता.
बातम्या आणखी आहेत...