आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाटलीच्‍या शोधात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिसायकलिंगचं महत्त्व आणि पर्यावरणाशी असलेली बांधिलकी या दोन्ही गोष्टी इथल्या व्यवस्थेमध्ये आणि लोकांमध्ये ठासून भरलेल्या आहेत. त्यामुळे शासन ही धोरणं राबवतं आणि लोक त्यात पूर्णपणे सामील होतात. म्हणूनच जर्मनी, स्वीडन, नॉर्वे अशी अनेक युरोपीय राष्ट्रे कचऱ्याचं रिसायकलिंग करण्यात अग्रेसर आहेत. 

जर्मनीतही फार तुरळक प्रमाणात का होईना, पण भिकारी असतात. आणि इथेही फार क्वचित प्रमाणात का होईना, पण पाण्याची/बिअरची एखादी रिकामी बाटली रस्त्याच्या कडेला आढळते. मी जर्मनीत नुकतीच राहायला गेले असतानाची गोष्ट. एके ठिकाणी बसची वाट पाहात उभी असताना, एक भिकारी शोधक नजरेने चालत असताना दिसला.
 
त्याने बसस्टॉपच्या कडेला असलेली एक रिकामी बाटली आपल्याकडच्या बॅगेत टाकली. “आपला देश, आपली जागा स्वच्छ राहावी असं त्यालाही वाटतं, ह्यातच सगळं आलं,” मनात हा विचार येऊन मला फार कौतुक वाटलं त्याचं. बस यायला वेळ असल्यामुळे, आता माझी शोधक नजर त्याच्यामागे जात राहिली. तो समोरच्याच एका सुपरमार्केटमध्ये गेला आणि तिथे बाहेर असलेल्या एका मशीनमध्ये त्याने त्याच्या बॅगेतल्या बाटल्या टाकल्या आणि एक बटण दाबलं. त्यातून एक कागद बाहेर आला, तो उचलून तो भिकारी सुपरमार्केटमध्ये शिरला. 
 
नंतर खरा प्रकार लक्षात आला. इथे पाणी/ज्युसेस/बिअर इत्यादींच्या कॅन्स किंवा बाटल्या खरेदी करत असताना त्यावर एक जास्तीची रक्कम आकारलेली असते. त्याला pfand असं म्हणतात. म्हणजे त्यांच्या किमतीत हे समाविष्ट केलेलं असतं. बाटल्या खरेदी करत असताना त्या रॅकवर त्या बाटलीची किंमत+ pfand असं छापलेलं असतं. साधारणपणे एका बाटलीमागे २५ सेन्ट्स ते १ यूरोपर्यंत असतो pfand. प्रत्येक सुपरमार्केटमध्ये या बाटल्या स्वीकारायचं कमीत कमी एक यंत्र तरी असतंच. बाटली रिकामी झाल्यानंतर त्या यंत्रात टाकायची आणि शेवटी तिथलं बटण दाबून किती कॅन्स/बाटल्या टाकल्या आणि किती pfand झाला, हे दर्शवणारा कागद उचलायचा. तो तुम्ही काउंटरवरून एनकॅश करू शकता किंवा जर तिथून खरेदी केली असेल तर एकूण बिलामधून तेवढी रक्कम वजा होते. 
 
प्रत्येक बाटलीला एक बार कोड असतो. ते यंत्र तो कोड स्कॅन करूनच ती बाटली अॅक्सेप्ट अथवा रिजेक्ट करते. जमा झालेल्या बाटल्यांचं/कॅन्सचं रिसायकलिंग केलं जातं. बाटलीवर परत मिळणाऱ्या किमतीमुळे सगळेच आपापल्या घरात वापरलेल्या बाटल्या इतस्ततः न फेकता या यंत्रात जमा करतात आणि नकळत प्रत्येक व्यक्ती या रिसायकलिंग साखळीचा हिस्सा बनते. जेव्हा हे कळलं, तेव्हा खूपच छान वाटलं होतं. खरं पाहता हे नवीन नाही. मला लहानपणचे दिवस आठवतात. तेव्हा पिण्याचा सोडा काचेच्या बाटलीतूनच मिळायचा.
 
उन्हाळ्यात लिंबूसोडा करण्यासाठी आजी सोडा आणायला पाठवायची. दुकानदार त्यावर एखादा रुपया डिपॉझिट घ्यायचा आणि रिकामी बाटली परत केल्यास तो रुपया परत मिळायचा. पण दिवाळीत रॉकेट उडवायचं म्हणून ती बाटली घरीच ठेवल्यास तो रुपया जायचा! जोक्स अपार्ट, ही तीच संकल्पना आहे. फक्त तंत्रज्ञान वापरून त्याचं ऑटोमेशन करण्यात आलेलं आहे. भारतातदेखील वापरलेल्या बाटल्या/कॅन्सचा किती कचरा बाहेर, रस्त्यावर पडलेला असतो! प्रत्येक बाटलीवर जर काही पैसे परत मिळत असतील तर त्या आपसूकच सुपरमार्केट्स/सेन्टर्समध्ये जमा केल्या जातील. ‘स्वच्छ भारत अभियाना’द्वारे आपणही ही संकल्पना राबवू शकतो, असं मनोमन वाटतं.
 
यंत्रामधून pfand परत मिळणाऱ्या बाटल्यांवर तसं लिहिलेलं असतं. पण विना डिपॉझिटच्या बाटल्या कशा आणि कुठे रिसायकल करायच्या? तेलाच्या, वाइनच्या, जाम/मार्मालेडच्या इत्यादी बाटल्या/बरण्या या phandfrei म्हणजे डिपॉझिट-फ्री असतात. त्यांच्यासाठी, म्हणजे फक्त काचेच्या रिकामी बाटल्यांसाठी प्रत्येक वसाहतीत/चौकात तीन मोठाले कंटेनर्स असतात. फोटोतल्याप्रमाणे तपकिरी, हिरव्या व पांढऱ्या रंगाचे कंटेनर्स त्याच रंगाच्या बाटल्यांकरिता असतात. त्यात बाटली टाकली असता, ती खळकन फुटण्याचा आवाज येतो. त्यामुळे हे करत असताना जरा वेळकाळ पाहून करावे, नाहीतर आजूबाजूच्या लोकांना आवाजाचा त्रास होऊ शकतो.
 
घरातील बाकीचा कचरा वेगवेगळ्या सेक्शनमध्ये घरातच वेगळा केला जातो. जैविक कचऱ्यासाठी वेगळ्या बायोबॅग्स मिळतात. जैविक, कागद/पुठ्ठे इत्यादी आणि या सगळ्यातही न मोडणारा इतर कचरा असे ढोबळमानाने तीन प्रकार होतात. मनुष्यबळ कमतरतेमुळे घरोघरी जाऊन कचरा उचलणारा माणूस ही संकल्पना इथे नाही. प्रत्येक इमारतीबाहेर वरील प्रकारांसाठी वेगवेगळ्या रंगाचे डबे ठेवलेले असतात. आपण जाऊन कचरा त्यांच्यात जमा करायचा आणि लोकल महापालिकेची माणसं आठवड्याला किंवा पंधरवड्याला येऊन ते डबे रिकामे करतात.
 
इतक्या व्यवस्थित रीतीने कचऱ्याची विभागणी होत असल्यामुळे त्याचं रिसायकलिंग करायला सोपं जातं. रिसायकलिंगचं महत्त्व आणि पर्यावरणाशी असलेली बांधिलकी या दोन्ही गोष्टी इथल्या व्यवस्थेमध्ये आणि लोकांमध्ये ठासून भरलेल्या आहेत. त्यामुळे शासन ही धोरणं राबवतं आणि लोक त्यात पूर्णपणे सामील होतात. म्हणूनच जर्मनी, स्वीडन, नॉर्वे अशी अनेक युरोपीय राष्ट्रं कचऱ्याचं रिसायकलिंग करण्यात अग्रेसर आहेत. त्यामागे अशाच सोप्प्या आणि अनुकरण करण्याजोग्या संकल्पनांचा आणि लोकांचा सक्रिय सहभाग आहे. आणि यातून आपल्याला खरोखर शिकण्यास वाव आहे.
 
tejalkraut@gmail.com
बातम्या आणखी आहेत...