आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवास माझ्या आवडीचा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखाद्याकडे कार आहे, तो रविवारी दुसऱ्या शहरात एकटा चालला आहे तर तो वेबसाइटवर सगळे तपशील देतो, इच्छुक त्याच्याशी संपर्क करतात आणि जी कार फक्त एका माणसाला घेऊन जाणार असते, ती चार जणांना घेऊन जाते. तेही बहुतेकदा फुकट.

जर्मनीत माझं राहतं शहर हॅनोव्हर. मी एका आयटी कन्सल्टिंग कंपनीत काम करत असल्यामुळे जिथे प्रोजेक्ट असेल तिथे जावं लागतं. सध्याचा प्रोजेक्ट आहे हॅनोव्हरपासून जवळपास ३६० किलोमीटर (म्हणजे अजिबात जवळपास नाही) दूर बाड होम्बुर्ग नावाच्या टाऊनमध्ये. सोमवार ते गुरुवार मी तिथे राहते, गुरुवारी रात्री घरी परत आणि शुक्रवारी ‘वर्क फ्रॉम होम’ म्हणजे घरून काम, असा आठवडा जातो. घरून ऑफिसपर्यंत पोहोचण्यासाठी मला घरापासून ट्राम स्थानकापर्यंत ७ मिनिटं चालणे, तिथून हॅनोव्हर मेन स्थानकापर्यंत  ११ मिनिटांची ट्राम पकडणे, हॅनोव्हर मेन स्थानक ते फ्रँकफर्ट मेन स्टेशन २ तास ७ मिनिटांची फास्ट ट्रेन (Sprinter) पकडणे, फ्रँकफर्ट मेन स्टेशन ते बाड होम्बुर्ग स्टेशन २२ मिनिटांची ट्रेन घेणे आणि शेवटी स्टेशन ते ऑफिस ५ मिनिटं चालणे असा द्रविडी प्राणायाम करावा लागतो. 

एवढं लांबलचक वाचायला त्रास होत असला तरीही सोमवारचे मंडे-ब्लूज सोडल्यास मला प्रवासाचा अजिबात त्रास होत नाही किंवा शीण येत नाही. उलट ट्रेनमध्ये छान झोप काढून होते किंवा एखादा लेख लिहूनदेखील होतो. कोणीतरी म्हटलंय, ‘A developed country is not a place where the poor have cars. It’s where the rich use public transportation.’ “विकसित राष्ट्र म्हणजे ज्या ठिकाणी गरिबांकडे मोटारी असतात, असा अर्थ नसून ज्या ठिकाणी श्रीमंत माणसेही पब्लिक ट्रान्सपोर्टने जातात, असा आहे.” हे वाक्य जर्मनीसाठी चपखल बसतं. माझ्या नवऱ्याला आणि मला जर्मनीत येऊन चार वर्षं होत आली. पण अजूनही आमच्याकडे कार नाही. घेण्याची ‘इच्छा’ आहे पण ‘गरज’ नाही, त्यामुळे कार घेण्याचा बेत नेहमीच पुढे ढकलण्यात येतो. 

इथे U-Bahn, S-Bahn, RE, IC, ICE, Sprinter (Bahn म्हणजे जर्मन भाषेत ट्रेन, अंडरग्राउंड ट्रेन, सिटी ट्रेन, रिजनल एक्सप्रेस, इंटरसिटी ट्रेन, इंटरसिटी एक्सप्रेस, श्प्रिंटर) अशा विविध ट्रेन्स/ट्राम्सनी शहरं आणि शहरांमधली ठिकाणं व्यवस्थित जोडलेली आहेत. त्याऐवजी शहरांना जोडणाऱ्या आणि शहरांमधील ठिकाणं जोडणाऱ्या बसेसदेखील आहेत. त्यामुळे तुम्ही जर्मनीत स्वतःच्या वाहनाशिवाय आरामात राहू शकता. (त्या उलट अमेरिकेसारख्या देशात कार नसली तर तुमची पंचाईत होऊन जाते. त्यामुळे तिथे कार असणे ही अन्न, वस्त्र, निवारा यांसारखीच एक मूलभूत गरज आहे.) जर्मनीत शहरांची वेगवेगळ्या झोन्समध्ये विभागणी केलेली असते. म्हणजे, समजा तुमचं घर एका झोनमध्ये आहे आणि तुमचं ऑफिस तिसऱ्या झोनमध्ये; तर तिथे जाण्यासाठी तुम्हाला तीन झोन्सचं तिकीट काढायला लागतं. 

तिकिटांची मशिन्स प्रत्येक ट्राम/ट्रेन स्टेशनवर असतात. तिथे यूरोज (नाणी किंवा नोटा) टाकायच्या आणि तिकीट घ्यायचं. त्या तिकिटावर तुम्ही तीन झोन्समध्ये कुठलंही पब्लिक ट्रान्सपोर्ट (ट्रेन/ट्राम/बस) वापरू शकता. जर प्रवास रोजचाच असेल तर महिन्याचा पासदेखील काढता येतो. आणि हो, या पासवर रोज संध्याकाळी सात वाजल्यानंतर आणि वीकएंड आणि सुट्टीच्या दिवशी आणखी एक व्यक्ती तुमच्यासोबत मोफत प्रवास करू शकते. मी आठवडाभर दुसऱ्या शहरात असल्यामुळे माझ्याकडे हॅनोव्हरचा पास नाही. नवऱ्याकडे आहे, त्यामुळे वीकेंडला मी त्याच्याबरोबर विनामूल्य प्रवास करू शकते. ICE/Sprinter या लांब पल्ल्यांच्या ट्रेन्सची तिकिटं महाग असतात. 

नियमित प्रवास करत असाल तर Bahn Card नावाचं कार्ड विकत घ्यायचं. त्याचे २५, ५० आणि १०० असे प्रकार असतात. Bahn Card २५ घेतलं की प्रत्येक तिकिटावर २५% सूट, ५० वर ५०%, तर १००% वर तिकीट विनाशुल्क. त्यामुळे आमच्यासारखे दर आठवड्याला इंटरसिटी प्रवास करणारे Bahn Card को जेब में लिये घूमते है. याचा आणखीन एक फायदा म्हणजे फ्लेक्सीतिकीट. म्हणजे समजा माझी हॅनोव्हर-फ्रँकफर्ट तिकीट असलेली ट्रेन चुकली तर मी त्याच तिकिटावर हॅनोव्हर-फ्रँकफर्ट दुसऱ्या ट्रेनने विनाशुल्क प्रवास करू शकते. फक्त त्या दुसऱ्या ट्रेनमध्ये मला सीट बुक करावी लागते, इतकंच. याउप्पर Deutsche Bahnच्या वेबसाइटवर विविध तिकिटांवर स्कीम्स चालू असतात. उदाहरणार्थ ‘हॅपी वीकएंड’ तिकीट. शनिवारी सकाळी निघून रविवारी रात्री परत यायचं असेल तर स्वस्तात प्रवास करायचं हे तिकीट. शिवाय Sparpreis म्हणजे ‘बजेट किंमत’ असलेल्या बऱ्याच ऑफर्स असतात.
 
हे झालं ट्रेन्स आणि बसेसच्या संदर्भात. इथे ‘कार पूलिंग’ ही संकल्पनादेखील खूप प्रभावीरीत्या राबवली जाते. इथे वेबसाइट्स आहेत जिथे लोक रजिस्टर करू शकतात. उदाहरणार्थ एखाद्याकडे कार आहे, तो रविवारी दुसऱ्या शहरात एकटा चालला आहे आणि त्याला कार पूलिंग करण्यात रस आहे. तो वेबसाइटवर सगळे तपशील देतो, इच्छुक त्याच्याशी संपर्क करतात आणि जी कार फक्त एका माणसाला घेऊन जाणार असते ती चार जणांना घेऊन जाते. इथे आकारण्यात येणारे शुल्क अगदी नगण्य किंवा कधीकधी शून्यदेखील असते. नवीन लोकांचा परिचय व्हावा आणि एकट्यासाठी इंधन न जाळता त्यात चार जण आल्यामुळे पर्यावरणाला होणारी मदत, या धारणेने हे कार पूलिंग चालते.

लोकल ट्रान्सपोर्टसाठी इथे बाइक्सची रेलचेल आहे. बाइक म्हणजे इथे सायकल. सायकलस्वारांसाठी वेगळे ट्रॅक्स असल्यामुळे ते आणि वाहतुकीची रहदारी यांना एकमेकांचा अडसर होत नाही. ऑफिसमधला माझा एक सहकारी दररोज एकमार्गी ३० किलोमीटर्सची सायकलतोड करत ऑफिसला येतो. जर्मन्सच्या शारीरिकदृष्ट्या फिट राहण्यात सायकलचा खूप मोठा भाग आहे. हे सगळं पाहताना, अनुभवताना मनात भारताचा विचार येत राहतो. मुंबईत वाढल्यामुळे लोकल ट्रेन्सने प्रवास कधी चुकला नाही. 

लोकल ट्रेन्स, बेस्ट बस या मुंबईच्या लाइफलाइन आहेत. पण मुंबईबाहेर पुण्यात, बंगळुरूमध्ये मात्र लोकल ट्रान्स्पोर्टच्या नावाखाली निराशाच पदरी पडली. अत्यंत वाईट अवस्थेत असलेल्या बसचालकांची अरेरावी, रॅश ड्रायव्हिंग, हव्या त्या ठिकाणी हव्या त्या वेळी नसलेलं बसेसचं कनेक्शन इत्यादीमुळे लोकल ट्रान्स्पोर्टची भिस्त स्वतःच्या वाहनावर आहे. त्यामुळे या शहरांत अचानक वाहनांचे पीक येऊन वाहतुकीचा आणि पर्यायाने प्रदूषणाचा फार मोठा त्रास होत आहे. वेळ बहुमोल आहे. कामावर निघालेल्या लोकांसाठी प्रवासातील वेळ हा म्हणजे बहुतांशी निरुपयोगी असतो. त्यामुळे हा वेळ कमीत कमी असावा आणि त्यात त्रास न होता प्रवास सुखकर होत बरोबरीने पर्यावरणाला कमीत कमी इजा पोहोचवायची असल्यास पब्लिक ट्रान्स्पोर्टला पर्याय नाही. या बाबतीत जर्मनीचे मॉडेल अभ्यासून ते भारतात आणल्यास आपण रोजच्या प्रवासात नक्की अच्छे दिन अनुभवू शकू.

- तेजल राऊत, हॅनोव्हर
tejalkraut@gmail.com
बातम्या आणखी आहेत...