आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेनिसचे दिवस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टी व्ही अगदी तुरळक घरांमध्ये होते तेव्हाची गोष्ट. जून-जुलैमध्ये होणारे विम्बल्डनचे टेनिसचे सामने पाहायला ती शेजार्‍यांकडे जायची. साधारण 1980 ते 90चा काळ. पुरुषी दिसणारी आणि जबरदस्त ताकदीने खेळणारी मार्टिना नवरातिलोवा, तिच्यासमोर काहीशी नाजूकशी दिसणारी क्रिस एव्हर्ट लॉइड, नंतरनंतर आलेली सुंदर दिसणारी स्टेफी ग्राफ, चिडखोर जॉन मॅकेन्रो, हेअरबँडने केस आवरून ठेवणारा मोठाथोरला बियाँ बोर्ग, एक डोळा थोडा बारीक असलेला इवान लेंडल, पॅट कॅश, बोरिस बेकर, या सार्‍यांचा खेळ, तोही विम्बल्डनमधला पाहणं हा एक उत्सव असायचा. हिरवेगार लॉन, त्यावर पांढरेशुभ्र कपडे घालून पोपटी पिवळसर चेंडू घेऊन खेळणारे खेळाडू, हे विम्बल्डनचे वैशिष्ट्य. टेनिसची लव्ह आणि ड्यूसची भाषा तेव्हा कळायला लागली होती. इंग्लंडमध्ये होणार्‍या या स्पर्धेत आकर्षण असायचं ते राणीचं. विजेत्यांना चषक/तबक देण्यासाठी येणारी राणी आणि प्रिन्स एडवर्ड, नंतरच्या काळात येणारे प्रिन्स चार्ल्स आणि लेडी डायना, त्यांना विशिष्ट प्रकारे गुडघ्यात वाकून अभिवादन करणारे बॉलबॉइज आणि गर्ल्स, मध्येच पडणारा पाऊस आणि त्यापासून वाचण्यासाठी छत्र्या उघडून बसणारे प्रेक्षक, प्रेक्षकांत थोडा जरी आवाज झाला तरी ‘क्वाएट प्लीज’ म्हणणारे रेफरी, हे सामने पाहायला येणारे सेलिब्रिटीज, स्थानिक वेळ दाखवणारं स्टेडियममधलं घड्याळ पाहून इकडचं आपलं घड्याळ बरोबर साडेपाच तास पुढे करणारे तिचे वडील या विम्बल्डनशी जोडल्या गेलेल्या आठवणी. जुलैच्या दुसर्‍या शनिवारी होणारा महिलांचा एकेरीचा आणि रविवारी होणारा पुरुषांचा एकेरीचा सामना म्हणजे या काळातल्या महत्त्वाच्या घटका.
असे हे विम्बल्डन नुकतेच सुरू झालेय. आता मात्र त्यातले सगळे सामने पाहायला वेळ मिळत नाही. तरीही अंतिम सामने पाहण्याचा निश्चय ती दरवर्षी करतेच. आता विम्बल्डनबद्दल इंटरनेटवरही खूप काही वाचायला मिळते. स्ट्रॉबेरीज अँड क्रीम हे विम्बल्डनचं फेव्हरिट फूड आहे, असं तिने एकदा काही वर्षांपूर्वी वाचलं. काय माहीत, काय असतं ते, असा विचार केला. पण हल्ली एक-दोन वर्षांपूर्वी पाचगणीहून मस्त ताज्या स्ट्रॉबेरीज आणल्या होत्या, तेव्हा त्याची तिला आठवण झाली. मग त्या स्ट्रॉबेरीजवर फ्रेश क्रीम घालून खाताना तिला आणि तिच्या घरातल्यांना कोण आनंद झाला होता.
त्या वेळी आणि नंतरही अनेक वर्षं, विम्बल्डन किंवा ज्याला ग्रँड स्लॅम स्पर्धा म्हणतात, त्या फ्रेंच, ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकन ओपन स्पर्धांमध्ये भारतीय चेहरा नसायचाच, किंबहुना भारतीय खेळाडू असावा अशी अपेक्षाच नव्हती तेव्हा. या स्पर्धा आपल्या खेळाडूंच्या आवाक्याबाहेरच्याच समजल्या जात. त्यामुळे जेव्हा लिअँडर पेस आणि महेश भूपती या स्पर्धांमध्ये दिसू लागले, तेव्हा तिला अगदी आनंदाने भारून टाकलं होतं. पेस मार्टिनासोबत मिश्र दुहेरी खेळला, तेव्हा तर फारच कौतुक वाटलं होतं. मग सानिया मिर्झा आली आणि या कौतुकात भरच पडली. आता स्पर्धेचं रूप बदललं असलं, नवनवीन खेळाडूंचा ट्रॅक ठेवणं तिला कठीण झालं असलं तरी विम्बल्डनच्या काही सामन्यांची मजा घ्यायचीच, असं तिने नक्की ठरवलंय. तुम्हीही पाहणार ना यातली मजा?