आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थरकाप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘पाऊस आला धो-धो
पाणी वाहिले सों सों
नदी-ओढे खळखळ वाहती
धरती माता हिरवीगार होती’

आमच्या लहानपणीचा पाऊस, रौद्ररूप धारण करून यायचा आणि तांडव नृत्य करायचा, या नृत्याने जमीन हादरून जायची आणि आमच्या जिवाचा थरकाप व्हायचा.
पाऊस नकोसा वाटायचे कारणही तसेच होते. राहण्यासाठी 5 खणाचे माळवदाचे घर मातीचे. पाऊस येऊ लागला की भिंतीचा एक एक कोना मातीचा पडायचा आणि आई आम्ही 6 भावंडं रडत बसायचो. बाप छत्रीखाली घेऊन आम्हाला बसायचा, असा तो पाऊस. पाऊस खूप पडावा म्हणून चिखलाची महादेवाची पिंड करायची व त्यावर हरळी दूर्वा लावायची आणि ओल्या कपड्यानिशी पाऊस मागायचो.

‘धोंडी धोंडी पाणी दे
पाऊस पाणी पडू दे राळे, भुरके पिकू दे,
काळी आई पिकू दे’
असे आम्ही गाणे म्हणायचो.
आमच्या लहानपणीचा पाऊस ‘ढगफुटी’सारखाच. पाऊस बंद व्हावा म्हणून पळीत विस्तू घेऊन पावसाला चटका द्यायची, पण पाऊस थांबत नव्हता.

पावसाची रिपरिप सुरू झाली की आई चूल पेटवायची व गरमगरम हायब्रीडची भाकरी, पिठलं आणि तोंडी लावायला ज्वारीचे, कोंड्याचे पापड भाजायची. सोबत बाजरीच्या खारवड्या. या सर्वांचा खरपूस वास. त्यामुळे पोटभर जेवण व्हायचं. पण संडासला हागणदारीला जावं लागायचं, गावाकडची पावसाळ्यातील हागणदारी, चिखलाची दलदल... ते दिवस आठवले की अजूनही अंगावर काटा येतो.

त्या वेळी आम्हाला शाळेला परगावी जावे लागत असे. माझे माहेर लातूर तालुका, शिपूर गाव व शाळेचे ठिकाण गावापासून 5 किलोमीटर लांब अलमला, तालुका औसा. ना रेनकोट ना छत्री. दप्तर भिजू नये म्हणून खताच्या पोत्याचा घोंगता केलेला असायचा. दप्तराला पण खताचीच पिशवी. असा आमचा शिक्षणाचा प्रवास. रोज पावसात भिजून डोक्यात ‘मायाबहिणी’ म्हणजेच ‘उवा’ व्हायच्या. त्याबी आमच्या मैत्रिणीच. गुरुजींनी हातावर एक छडीचा दणका दिला की डोक्यातली ऊदेखील वळवळ करायची आणि तळपायाची आग मस्तकाला जायची.

मी सातवीच्या वर्गात शिकत होते. 15 मुले आणि 4 मुली. आम्ही रोज शाळेला आमच्या गावाहून जायचो. गुडघाभर चिखल, पायवाट. वाटेने काटे, चिखलात सगळी भेळ व्हायची. पायात काटा मोडला की देव आठवायचा आणि मागच्या मुला-मुलीला आम्ही सांगायचो नाही की, मी जिथे पाय ठेवला तेथे ठेवू नको. कारण एकाला काटा मोडला की दुसर्‍याच्या पायात पण तो खुडायचा, आमच्या पायात खूप ठिकाणी काटा मोडल्यामुळे ‘कुरूप’ व्हायचे.

शाळेच्या गावाला जाताना नदी आडवी. तावरजा. नदीवर मोठे धरण. आमचा गाव धरणाच्या पायथ्याशी आणि शाळेचे गाव नदीच्या किनारी. आम्ही शाळेला सकाळी गेलो तेव्हा पाऊस अजिबात नव्हता. परंतु 9 वाजता पाऊस सुरू झाला आणि नदीला महापूर आला. शाळा सुटायची वेळ झाली. आम्ही गावाकडे निघालो तर नदीने अक्राळविक्राळ रूप धारण केलं होतं. आम्ही सर्व मुलं 11-12 वर्षांचे होतो.

गावी जाण्यासाठी कोणतेच साधन नव्हते. जिवाचा नुसता थरकाप होत होता. सर्वांचे नातेवाईक नदीच्या त्या बाजूने होते आणि आम्ही या बाजूला. पाण्यात कोणीही येऊ नका म्हणून ओरडत होते. आईवडिलांची आठवण येत होती. त्या पावलीच आम्ही शाळेच्या गावाला गेलो. तेथील सरपंचाच्या घरी मुलींची राहण्याची सोय केली व मुलगे शाळेत थांबले. गावचे सरपंच धाराशिव अप्पा यांनी सर्वांच्या जेवणाची सोय केली व दुसर्‍या दिवशी आम्ही सर्व जण शाळा बुडवून गावी जाण्यास निघालो.

पाण्याचा प्रवाह कमी झाला होता. सर्वांनी हाताची घट्ट साखळी केली. एकेकाच्या कमरेला घट्ट धरून नदीचा किनारा ओलांडला व आमचा जीव भांड्यात पडला. घरी येऊन आईला घट्ट मिठी मारली आणि चार दिवस शाळेला दांडी. असा तो खट्याळ पाऊस. आता तो पाऊस राहिलाच नाही. तावरजा माय तर कोरडीच राही.

दसर्‍याच धुणं, पोळ्याच्या सणाला गुरांना धुण्यास आता नदीत पाणी नाही. तावरजा माईच्या पात्रात आता वाळूच नाही, बिचारीच्या शरीराचे पोस्टमॉर्टम झाले आहे. ठिकठिकाणी भगदाडे पडली आहेत. आता तो पाऊस हवाहवासा वाटू लागला आहे. कारण आधुनिकीकरणाने राने बोडकी झालीत. चिमणीलाही पाणी नाही.
‘खूप मोठा ये रे पावसा, तुला देत नाही पैसा
पैसा देऊन भागत नाही, तुझ्याशिवाय आम्हाला
करमत नाही, करमत नाही.’