आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजभाषा असे...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘उच्चारकोश’ असले पाहिजेत, भारतीय बोलींचे दस्तऐवजीकरण करता येईल.
मराठी भाषेला ‘राजभाषे’चा दर्जा देणे ही तर एक केवळ तांत्रिक पूर्तताच आहेे.
‘मराठी’ला राजभाषेचा दर्जा देण्याचा ठराव महाराष्ट्र शासनाने नुकताच पारित केला. मात्र, ठराव पारित करून जबाबदारी संपत नाही. मराठीचा वापर, प्रसार, प्रचार अधिक वाढेल कसा, नव्या पिढीला मातृभाषेचे प्रेम कसे वाटेल याचा विचार, तदनुषंगिक कृती करणेही अगत्याचे आहे. उमलत्या, युवापिढीचे भावविश्व मायमराठीशी कसे जोडले जाईल याविषयी.....
‘उच्चारकोश’ असले
पाहिजेत, भारतीय बोलींचे दस्तऐवजीकरण करता येईल

मराठी भाषेला ‘राजभाषे’चा दर्जा देणे ही एक तांत्रिक पूर्तता आहे. प्रत्यक्षात १९६० मध्येच भाषावार प्रांतरचना स्वीकारल्यावर मराठी ही महाराष्ट्राची भाषा, हे मान्य झाले होते. नुकताच पारित झालेला ठराव हे एक औपचारिक पाऊल होते. भाषावार प्रांतरचनेचा उद्देशच प्रादेशिक भाषांच्या जतन, संवर्धनाचा होता. शासनव्यवस्थेत सामान्यांची भाषा हीच राजव्यवहाराची भाषा, हे तत्त्व अनुस्यूत आहे.

मराठी भाषा ही व्यक्तीसाठी भावविश्वाचे अस्तर असते. समाजासाठी ती संस्कृतीची वाहक असते. ज्ञानव्यवहारात ती संवादाचे माध्यम, दैनंदिन व्यवहारात विनिमयाचे साधन, तर कलाव्यवहारात ती सर्जनाचे साधनद्रव्य असते.
काय अपेक्षित आहे ?
मराठी खऱ्या अर्थाने ‘राजभाषा’ ठरायची असेल तर कुठलाही, कुणाचाही, कसलाही अपवाद न करता शालेयस्तरावर मराठी अनिवार्य केली पाहिजे. मराठी माध्यमाच्या शाळांची दयनीय अवस्था सुधारण्यासाठी जोमाने प्रयत्न केले पाहिजेत. इंग्रजी ही उत्तम भाषा आहे. तिचे जागतिक महत्त्व स्वीकारूनही मातृभाषेचे अस्तित्व अबाधित राखले पाहिजे. मुलांचे भावविश्व उमलवण्याचे सहज सामर्थ्य मातृभाषेतच असते. ते आपण नाकारून कोवळ्या वयाच्या मुलांना इंग्रजी सक्तीचे करत आहोत. त्यामुळे आपली सांस्कृतिक अभिव्यक्ती नीट उमटतच नाही. मातृभाषेशी नाळ तुटलेली आपली पिढी यामुळे भविष्यात आपल्याला अनोळखी होत जाण्याचा धोका आहे.

भाषांचे निकोप सहजीवन हवे
इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांना मराठी भाषा अतिशय कमकुवत पातळीवर शिकवली जाते. त्यामुळे भाषेच्या सांस्कृतिक-साहित्यिक पातळीपासून मुले दूरच राहतात. तुटत जातात. यासाठी अगदी प्राथमिक स्तरापासून मुलांना उत्तमोत्तम बालसाहित्य, कविता, गाणी, कथा पुस्तके, सीडी, गेम्स आदी सर्व माध्यमांतून उपलब्ध केल्या पाहिजेत. सचित्र शब्दकोश तयार केले पाहिजेत. भाषेच्या जडणघडणीसाठी बालसाहित्य मोलाचे आहे. यादृष्टीने ‘खडू-फळा योजने’चे पुनरुज्जीवन करावे. मराठीची अवहेलना न करता इंग्रजी भाषेकडे विवेकी दृष्टिकोनातून पाहावे. सामाजिक प्रतिष्ठेचे ते लक्षणही नाही. या भाषाभगिनींचे निकोप सहजीवन असावे, असे सुचवावेसे वाटते.

दोन पातळ्यांवर भाषा हवी
शालेय स्तरावरच सध्या आपण परक्या भाषेला झुकते माप देत आहोत. हे सरकारी पातळीवरही घडते आहे. उलट दूरदर्शन, अन्य माध्यमे या सर्व ठिकाणी ‘भाषातज्ज्ञ’ असे पद निर्माण केले पाहिजे. कारण तज्ज्ञतेशिवाय भाषेला प्रतिष्ठा नाही. प्रत्येक विद्यापीठात स्वतंत्र भाषा विभाग असला पाहिजे. भाषा आणि जीवनव्यवहार यांची सांगड घालता आली पाहिजे.

कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजीचे पेपर जसे दोन स्तरांवर घेता येतात तसे मराठीचेही घेता आले पाहिजेत. एक भाषालक्ष्यी आणि दुसरा साहित्यलक्ष्यी. याचे कारण असे की, सामाजिक सरमिसळ मोठ्या प्रमाणात होत असल्याने विविध आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक स्तरावरील गट शिक्षण प्रक्रियेत सामावले जात आहेत. त्यामुळे मराठीचा विस्तार व्यापक स्तरावर होत आहे. अशांसाठी ‘उच्चारकोश’ असले पाहिजेत. (उदा. सिव्हगड की सिंहगड, सुष्मा की सुषमा?). इतर विद्याशाखांमध्येही (उदा–कायदा, आरोग्य, संगणक) मराठीचा एक पेपर पाहिजे. कारण त्या विद्याशाखांमध्ये शिकलेली व्यक्तीही भविष्यात इथेच काम करणार असते. त्या व्यक्तीला इथल्या जगण्यातले प्रश्न समजून घेता आलेच पाहिजे.

अमराठींसाठी टॉफेलसारखी परीक्षा
मराठी मंडळी विदेशात शिकायला जाताना त्यांना टॉफेलसारखी भाषेची परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असते. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात शिकायला येणाऱ्या अमराठी आणि विदेशी मंडळींना मराठीची एक परीक्षा अनिवार्य केली पाहिजे. टॅक्सीवाल्यांना इंग्रजीचे धडे देणे सुरू झाले आहे; मग इथे येऊन राहणाऱ्या, व्यवसाय करणाऱ्यांना इथली भाषा, संस्कृती जाणून घेणेही अनिवार्य असले पाहिजे. त्यासाठी मराठीचे प्राथमिक ज्ञान देणारे छोटे अभ्यासक्रम मोठ्या प्रमाणात निर्माण केले पाहिजेत. ते अनिवार्य असले पाहिजेत. परिचारिकांमध्ये अमराठी व्यक्ती बहुसंख्येने असतात. इथल्या रुग्णांशी त्यांचा नित्य संपर्क असतो. त्यांना कामापुरते मराठी आलेच पाहिजे. अशांसाठी इंग्रजी संभाषणवर्गांच्या जोडीला मराठीचे संभाषणवर्गही असले पाहिजेत.

स्थिरता आणि गतिशीलता
भाषा प्रवाही असते, असावी, हे मान्य; पण म्हणून शब्दांचे मूळ अर्थच गमावून बसणे योग्य नाही. स्थिरता आणि गतिशीलता हे दोन ध्रुव असतात. त्यामुळे भाषेसंदर्भात विविध प्रकारची सर्वेक्षणे होणे अगत्याचे आहे. सर्वेक्षणे शास्त्रशुद्ध हवीत आणि त्यातून जी सामग्री समोर येईल त्यानुसार योग्य ते बदल स्वीकारले जावेत, अशा अर्थाने भाषेचा शास्त्रीय अभ्यासही केला जावा.
शब्दांकन : जयश्री बोकील, पुणे

मराठी भाषेला ‘राजभाषे’चा दर्जा देणे ही तर एक केवळ तांत्रिक पूर्तताच आहेे.
हे घडणे अगत्याचे
बोलींचे शब्दकोश हवेत – सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेजेस, म्हैसूर या संस्थेच्या सहकार्याने भारतीय बोलींचे दस्तऐवजीकरण करता येईल.

सध्या भाषेबाबत तुटलेपणा दिसतो. ‘सेन्स ऑफ बिलाँगिंग’ (आपण कुणाचेतरी काहीतरी लागतो) ही भावना हवी. स्वत:पुरतेपणा सोडून आपल्या सांस्कृतीची, ज्ञानपरंपरेची बलस्थाने समजली पाहिजेत.

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या शिवनेरी बसमध्ये प्रत्येकाच्या हातात इंग्रजी वृत्तपत्र का दिले जाते, असा प्रश्न उपस्थित केला पाहिजे.

मराठीच्या आंतरराष्ट्रीय अध्ययनाची दारे खुली केली पाहिजेत. मराठीतील उत्तम साहित्यकृतींचे अन्य भाषांत उत्तम अनुवाद केले पाहिजेत.

थोडक्यात म्हणजे भाषेविषयी तुच्छता नको आणि भाबडे प्रेमही नको. आंधळा द्वेष नको, तर भाषाविवेक हवा. भाषेच्या न्याय्य हक्कांसाठी सजगता हवी. भाषेचे चलनवलन सामूहिक नेणिवेद्वारे चालते. त्यासाठी मराठीविषयीचा सन्मानभाव नुसता विचारात जागा नाही, तर कृतिशील झाला पाहिजे. मराठीचा जागर विश्वभर करण्याआधी मूळ महाराष्ट्रात – जिथे तिची मुळे रुजली आहेत तिथे उत्तम प्रकारे झाला पाहिजे. तरच तिच्या पारंब्यांचा, शाखांचा विस्तार जगभरात करण्याचे स्वप्न दृष्टिपथात येईल.

मराठीसाठी मॉडेल (छत्रपती शिवरायांनी राजव्यवहारकोश सिद्ध करून उभा केला आदर्श
भाषेची शक्ती : शब्दसंग्रह ही भाषेची शक्ती असते. तो सतत वाढवत नेणे, नव्या अर्थच्छटा सांगणारे शब्द सामावून घेणे. (गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी ‘संस्कृती’ हा मराठी शब्द बंगाली भाषेत जसाच्या तसा घेतला आणि रूढ केला.) बोलीभाषांमधून नवे शब्द घेता येतील.
लवचिकता : भाषा जगण्यासाठी तिचे अनुकूलन महत्त्वाचे असते. आज दैनंदिन जगण्यात कुणी पंडिती मराठी बोलू लागला तर ते समजणार नाही. त्यामुळे योग्य ते बदल डोळसपणे स्वीकारावेत. भाषेत शुद्ध-अशुद्ध असे फरक करण्यापेक्षा प्रमाणलेखन म्हटले जावे.

प्रतिकारशक्ती : संस्कृतला तोंड देऊन मराठी आज उभी आहे. शिवाय ऐतिहासिक काळात उर्दू, पर्शियन यांच्याशीही मराठीने सामना केला आहे. छत्रपती शिवरायांनी राजव्यवहारकोश सिद्ध करून आदर्श निर्माण केला आहे.
डॉ. नीलिमा गुंडी, पुणे