आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ती वेळच तशी होती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काहीतरी कुणाची तरी चूक होते आणि घटना घडते. त्याला कार्यकारण भाव असतोच. अगदी साधं उदाहरण बघा हं! भाजी चिरणं पण रोजचंच. बोट मात्र कापतं एखाद्याच दिवशी. लक्ष नसतं, हातून काहीतरी सरकतं किंवा मन वेगळ्याच दिशेनं धावतं असतं. माझी मावशी मात्र म्हणायची असं काही नसतं. एखादी वेळच विचित्र असते किंवा त्या वेळेला काहीतरी अमानवी आणि आक्रीत घडतं. कधी झोप न लागणा-या माणसाला, चोरी होते त्या दिवशी, गाढ झोप लागलेली असते. मावशी एक प्रसंग लगेच उदाहरणादाखल सांगते. तुम्हाला पटतं का की ती वेळच तशी होती?


संध्याकाळ हळूहळू पसरत चालली होती. झोपाळ्यावर आजी जपमाळ ओढत इकडे-तिकडे नजर ठेवून बसली होती. आई स्वयंपाकाला लागली होती. बाबा आॅफिसमधून येऊन पेपर वाचत बसले होते. बाळू रिमोट हातात घेऊन चॅनल्स सर्च करत होता. अस्वस्थ होता. कारण थोड्याच वेळात मालिका सुरू होतील आणि आजी टीव्हीच्या रिमोटचा आणि समोरच्या मोठ्या खुर्चीचा चार्ज घेणार होती.


साधारण वेळेचा अंदाज घेऊन आजी सावकाश टीव्हीच्या खोलीत यायला निघाली. त्याच वेळी बाबांच्या आॅफिसमधला माणूस काही फाइल्स घेऊन सही करण्याकरिता आला. ताई मैत्रिणीशी मोबाइलवरून मन लावून बोलत होती. त्याच वेळी दारातून एक चिचुंद्री आत शिरताना ताईला दिसली आणि तिने जोरात किंकाळी मारली. ‘चिचुंद्री! चिचुंद्री! तिला बाहेर ढकला. घरात शिरली तर निघत नाही. आजी, बाबा, चिचुंद्री! कोणालाच ओरडण्यातले शब्द नीट कळले नाहीत. बाबा घाईघाईने उठून तिच्याकडे जायला निघाले आणि मधल्या टेबलाला अडकून जोरात पडले. आजीचे पाय कपाटात अडखळले आणि ती सरळ तोंडावर दारात पडली. आई काहीतरी तळत होती, तिला बाबा पडताना दिसले आणि हातातला झारा तळणीत पडून हातावर तेल उडाले. ताईचा मोबाइल हातातून पडला व फुटला. आलेला पाहुणा वाभरटासारखा मधेच उभा होता. बाळू आजीकडे धावला, आई बाबांकडे, ताई मोबाइलकडे. पाहुणा आणि चिचुंद्री स्तब्ध. अखेर 2 सेकंदांत आरडाओरडा सुरू झाला. ताई मोबाइल तुटल्यामुळे रडत होती. बाबांच्या कपाळावर टेंगूळ आले होते. ते ताईला ओरडत होते. आई हात भाजल्याने रडवेली झाली होती. आणि आजी? आजीला उठताच येईना.
अखेर पाहुण्याने परिस्थिती पाहून पळ काढला. चिचुंद्री आल्यापावली परत गेली. आजीला यथावकाश दवाखान्यात अ‍ॅडमिट केले. पायाचे
फ्रॅक्चर एक ते दीड महिना तरी अंथरूण दाखवणार होते. आईची जखम
खूप दिवस रेंगाळली. बाबांची डोकेदुखी कायमची झाली. ताईला परत मोबाइल मिळाला नाही. चिचुंद्री आल्यापावली परत गेल्यामुळे आजी
म्हणते, ‘घरात आली असती तर निदान समृद्धी तरी आली असती.’ पण
नाही. ती वेळच तशी होती ना!