आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

द ग्रेट फ‍िलॉसॉफर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विसाव्या शतकातील श्रेष्ठ व्यक्तिमत्त्वांमध्ये ‘टाइम’ साप्ताहिकाने चित्रकार म्हणून पिकासो, लेखक म्हणून जेम्स जॉइस, कवी म्हणून टी. एस. इलियट आणि तत्त्वज्ञ म्हणून लुडविग विड्गेस्टाइन यांची निवड केली. विड्गेस्टाइन कुटुंबीय हे व्हिएन्नामधील टाटा-बिर्लांसारखे धनाढ्य होते. विड्गेस्टाइन 1910च्या सुमारास केंब्रिज इथे एरॉनॉटिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घ्यायला आला. त्या काळात केंब्रिजमध्ये बर्ट्रांड रसेल, जी. ई. मूर यांसारखे तज्ज्ञ शिक्षक म्हणून होते. रसेल सुटीमध्ये तत्त्वज्ञानाचा वर्ग घेत असे. त्यामध्ये विड्गेस्टाइनने प्रवेश घेतला. त्याने एकदा रसेलला भेटून विचारले, मी तत्त्वज्ञ होऊ की इंजिनिअर होऊ? तेव्हा रसेल म्हणाला, सुटीमध्ये तू एक निबंध लिहून आण. तो वाचल्यावर मी सांगतो. विड्गेस्टाइनने रसेलला निबंध दाखवला.


आपल्या आत्मचरित्रात रसेल लिहितो, ‘मी त्या निबंधाचे पहिले वाक्य वाचल्यावर ओळखले की, हा फिलॉसॉफर होणार.’ त्याने आपला सहकारी जी. ई. मूर याला विचारले, ‘विड्गेस्टाइनबद्दल तुझे काय मत आहे?’ तो म्हणाला, ‘ही इज अ ग्रेट मॅन. कारण मी जेव्हा वर्गात शिकवतो, तेव्हा सा-या विद्यार्थ्यांचे चेहरे शांत असतात. फक्त याचाच चेहरा गोंधळलेला दिसत असतो.’ साहजिकच तत्त्वज्ञानाचा अभ्यास कर, असा सल्ला रसेलने विड्गेस्टाइनला दिला. विड्गेस्टाइन त्याचा प्रिय शिष्य बनला. इतका की, प्रेयसीला लिहिलेल्या पत्रातही रसेल विड्गेस्टाइनबद्दलच लिहीत असे. रसेल त्याच्याबद्दल पत्रात लिहितो, ‘तत्त्वज्ञानातले जे प्रश्न मी सोडवू शकलो नाही, ते बहुधा हा सोडवेल.’
विड्गेस्टाइन सैनिक म्हणून पहिल्या महायुद्धात दाखल झाला. पाठीवरच्या एका वहीत तो तत्त्वज्ञानविषयक सुचलेल्या गोष्टी लिहून काढत असे. तेही एक, दोन, तीन असे क्रमांक टाकून. युद्ध संपल्यावर त्याने ती वही रसेलला दाखवली. रसेलने ते जसेच्या तसे छापायचा सल्ला दिला. जर्मनीत ते ‘ट्रॅक्टॅटस लॉजिको- फिलॉसॉफिकस’ या नावाने जर्मन भाषेत आणि मग 1922मध्ये इंग्रजीत प्रसिद्ध झाले. हा छोटेखानी ग्रंथ केवळ 80-90 पानांचा आहे. पण त्याने विड्गेस्टाइनला तत्त्वज्ञ म्हणून जगभर मान्यता मिळवून दिली. एक दिवस त्याने मोटारच्या अपघाताची बातमी वर्तमानपत्रात वाचली. त्यासोबत नकाशा काढून अपघात कसा घडला, हे दाखवण्यात आले होते. तेव्हा विड्गेस्टाइनला वाटले, बुद्धिबळाप्रमाणेच भाषादेखील निश्चित नियमांनी बांधलेली असते आणि तत्त्वज्ञानातील अनेक प्रश्न भाषेच्या विश्लेषणाने सोडवता येतात. या छोटेखानी ग्रंथाचे वर्णन ‘लंडन टाइम्स’ने ‘तत्त्वज्ञानावरील कविता’ असे केले आहे. त्यात अशी वाक्ये आहेत :
- जे दाखवता येते, ते सांगता येत नाही.
- तत्त्वज्ञानाचे कार्य म्हणजे बाटलीत अडकलेल्या माशीला बाटलीचे तोंड दाखवणे.
- जेथे शब्द खुंटतात, तेथे माणसाने गप्पच बसले पाहिजे.
या वाक्याने हा ग्रंथ संपतो.
विड्गेस्टाइनच्या वाट्याला जी अफाट संपत्ती आली, ती त्याने एका मित्राकडे वाटून टाकण्यासाठी दिली आणि युरोपातील गरजू लेखक, चित्रकार, कवी यांना यातून पैसे द्यावेत, असे सुचवले. रिल्केसारख्या महाकवीलाही यातून आर्थिक मदत मिळाली. पैसे वाटून टाकण्याचे कारण तो सांगत असे की, तत्त्वज्ञानाच्या अभ्यासात पैसा हा अडथळा आहे.
विड्गेस्टाइन लहरी होता. तो सतत अस्वस्थ असे. त्याच्या एका भावाने आत्महत्या केली होती. त्यालाही नैराश्याचे झटके येत. त्याने माळीकाम केले. एका छोट्या गावात शिक्षक म्हणून काम केले. त्या गावात एक रेल्वेगाडी अडकली, तेव्हा त्याने तिचे इंजिन दुरुस्त करून दिले. आपल्या बहिणीचे घर, घराची पूर्ण रचना त्याने एखाद्या आर्किटेक्टप्रमाणे करून दिली.
अगदी कडीकोयंड्यासकट. (हे घर आता अभ्यासाचा विषय झाले आहे. त्यावर एक भलेमोठे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.) 1927च्या सुमारास त्याने केंब्रिजमध्ये अध्यापन करावे, असे रसेलने सुचवले. केंब्रिजमध्ये शिकवण्यासाठी पीएचडीची गरज असते. तेव्हा रसेल म्हणाला, ट्रॅक्टॅटस हाच ग्रंथ पीएचडीचा प्रबंध म्हणून सादर कर. जी. ई. मूरने विड्गेस्टाइनला डॉक्टरेट देताना ‘ट्रॅक्टॅटस’बद्दल अभिप्राय लिहिला, ‘हा ग्रंथ म्हणजे प्रतिभेचा आविष्कार आहे. (वर्क ऑफ अ जीनियस.) पण असे असले तरी केंब्रिज पीएचडीसाठी असलेल्या सा-या निकषांवर तो उतरतो.’
विड्गेस्टाइन अत्यंत साधेपणाने राहत असे. चहाच्या रिकाम्या खोक्यांवर झोपत असे. त्याच्या वर्गाला विज्ञान, गणित, कला याही शाखांची मंडळी येऊन बसत. त्यामुळे वर्ग सुरू करताना तो म्हणत असे, आय डोंट वाँट व्हिजिटर्स. तो काहीही शिकवत नसे, तर नाटकात स्वगत म्हणावे तसे तत्त्वज्ञानाबद्दल स्वत:शीच मोठमोठ्याने बोलत असे. हे सारे मुले चकित होऊन पाहत. कारण ‘ट्रॅक्टॅटस’मधील तत्त्वज्ञानाला छेद देणारी मांडणी विड्गेस्टाइनला सुचत होती. मुले त्याला साक्षी होती.
विड्गेस्टाइनचे सहकारी आणि त्याचे शिष्य यांनी त्याच्यावर अतीव प्रेम केले. बहुतेक विद्यार्थ्यांनी त्याच्या आठवणी लिहिल्या. त्यातून पुस्तके तयार झाली. त्यातील माल्कम याचे पुस्तक अत्यंत वाचनीय आहे. विड्गेस्टाइनला रवींद्रनाथ टागोरांच्या कविता आवडत. मारधाड सिनेमेही आवडत. तो फारसे वाचत नसे. त्याने केलेल्या निवडक लेखनात फ्रेझरच्या ‘गोल्डन बो’वरील टीकालेख उत्कृष्ट आहे. त्याने आयुष्यात दुसरे पुस्तक लिहिले नाही. पण विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या नोट्सवरून ‘ब्ल्यू बुक’ आणि ‘रेड बुक’ ही दोन पुस्तके सिद्ध झाली. तसेच त्याने लिहायला घेतलेले ‘फिलॉसॉफिकल इन्व्हेस्टिगेशन’ हेही त्याच्या मरणानंतर प्रसिद्ध झाले.
1951मध्ये विड्गेस्टाइन मरण पावला. त्याच्या ‘ट्रॅक्टॅटस’ने तार्किक परमाणुवादाला (लॉजिकल पॉझिटिव्हिझम) जन्म दिला. ही विचारसरणी मांडणारी मंडळी ‘व्हिएन्ना सर्कल’ म्हणून ओळखली जातात. विड्गेस्टाइनवर बरीच पुस्तके आहेत. पण रे माँक याने लिहिलेले त्याचे चरित्र अत्यंत अभ्यासपूर्ण आणि लोकप्रियही आहे.