आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Pakistan Military In Politics: Orijeans Involution Consequence

लष्करी पाकिस्तानचा अभ्यासपूर्ण शोध (अभिलाष खांडेकर)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानचे सांस्कृतिक जीवन नेहमीच कुतूहल आणि चर्चेचा विषय ठरते. मात्र, इश्तियाक अहमद लिखित ‘द पाकिस्तान मिलिट्री इन पॉलिटिक्स : ओरिजिन्स, इव्होल्युशन, कॉन्सिक्वेन्सेस’ हे पुस्तक वेगळी वाट चोखाळत पाकिस्तानच्या राजकारणातील लष्कराच्या ठसठशीत अस्तित्वाचा शोध घेते...

पाकिस्तान हा नेहमीच चर्चेत असणारा देश आहे, मुख्यत्वे चुकीच्या कारणास्तव. भारत-पाक फाळणी झाल्यापासून अर्थात, 1947पासूनच आपला हा शेजारी कधीही स्वस्थ बसला नाही किंवा त्याला स्वस्थ बसूच दिले गेले नाही. याचे प्रमुख कारण तिथे कधीच लोकशाही नांदू शकली नाही. वर्षाच्या सुरुवातीला याच स्तंभात मी ‘पाकिस्तान : ए न्यू हिस्ट्री’ या पुस्तकाची ओळख वाचकांना करून दिली होती. त्यानंतर आलेले हे नवे पुस्तक वाचनीय आहे.
मागील आठवड्यात पेशावर शहरात बॉम्बहल्ला झाला, तेव्हा इश्तियाक अहमद यांचे ‘द पाकिस्तान मिलिट्री इन पॉलिटिक्स’ हे पुस्तक वाचत होतो. त्याच पुस्तकाचा परिचय आज मी माझ्या वाचकांना करून देत आहे. अहमद यांनी स्टॉकहोम येथून राज्यशास्त्र या विषयावर पीएच. डी. घेतली व त्याच विद्यापीठात त्यांनी अध्यापनही केले. या ग्रंथाद्वारे त्यांनी पाकिस्तानच्या जन्मापासून आजपर्यंत सैन्याने कशी आपली पकड पाकिस्तानी राजवटीवर घट्ट करून ठेवली आहे, याचे सखोल विश्लेषण केले आहे. अतिरेकी कारवाया, अमेरिका, भारत, इस्लाम या सगळ्या विषयांना या पुस्तकात त्यांनी स्पर्श केलेला आहे.

मागील निवडणुकांनंतर जरी पाकिस्तानमध्ये लोकशाही नांदू लागल्याची चाहूल जगाला लागली असली, तरीही लष्कराची ‘राजवट’ तेथे संपुष्टात आली, असे अजून तरी मानता येणार नाही. देशाच्या जन्माचा सुरुवातीचा काळ सोडला, तर पाकिस्तानने नेहमीच ‘इस्लामचा बालेकिल्ला’ म्हणून जगात आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मुस्लिम देशांचे नेतृत्व शिया लोकांच्या इराणकडे, तसेच दुसºया कोणत्याही देशाकडे न जावे, असा त्यामागे हेतू होता.

लेखक म्हणतो की, 1947मध्ये पाकिस्तानची लष्करी क्षमता तुलनेने कमी होती; परंतु अमेरिकेने 1950-51मध्ये सुरू केलेल्या भरघोस मदतीमुळे पुढे ती वाढत गेली. काही वर्षांनंतरच भारतविरोधी चीननेही पाकिस्तानला शस्त्रास्त्रे पुरवणे सुरू केल्याने पाकिस्तानी सैन्याचे सामर्थ्य कैकपटीने वाढले. हे का व कसे घडले? लेखक लिहितो की, शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेच्या जवळ जाण्याच्या हेतूने पाकिस्तानी राजवटीने सोविएत रशियाच्या विरोधात भूमिका घेत, अमेरिकेकडून शस्त्र पुरवठ्याची अपेक्षा केली होती; कारण भारताची त्याला नेहमीच भीती वाटत होती. नव्याने जन्मलेल्या या राष्टÑाला आपली विशिष्ट अशी ओळखही निर्माण करायची होती. तिथल्या राजकारण्यांनी आणि सेनाधिकाºयांनी भारतविरोधी भूमिका, अमेरिकेशी जवळीक व आंतरराष्ट्रीय पातळीवर इस्लाम राज्य अशी ओळख या विविध मुद्द्यांच्या साह्याने सैन्याला मजबूत केले, तेही नकळत. अमेरिकेला त्या काळात साम्यवादाला रोखायचे होते. त्यासाठी मित्र राष्टÑे किंवा अमेरिकेची ताकद ओळखून त्यांच्या मागे उभी असणारी राष्टÑे हवी होती.
लेखक सुमीत गांगुली यांच्या भारताच्या परराष्टÑ धोरणाबद्दलच्या पुस्तकाचा हवाला देत अहमद सांगतात की, अमेरिका व सोविएत रशिया या दोघांपासून दोन हात दूर राहण्याच्या जवाहरलाल नेहरू यांच्या नीतीमुळेही पाकिस्तानचे फावले व अमेरिका-पाकिस्तान जवळीक वाढली.
पाकिस्तानमध्ये सर्वांत ताकदवान अशी संस्था म्हणून पाकिस्तानी सैन्य कसे भरभराटीला आले व पुढे अनेक वर्षे देशाची धोरणे ठरवत गेले, याबद्दल आयेशा जलाल, हसन-अस्करी रिझवी, हुसैन हक्कानी व हसन अब्बास या व अन्य लेखकांनी केलेले अभ्यास व त्यांचे दाखले देत लेखकाने असे सांगण्याचा प्रयत्न केला आहे, की 2011-12मध्ये पाकिस्तानने आपल्या संरक्षण तरतुदीमध्ये 12 टक्क्यांनी वाढ केली. त्याचे मुख्य कारण भारताची भीती!
याच संदर्भात लेखक स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय शांती संशोधन संस्थेच्या अभ्यासाबद्दल सांगतात की, या संस्थेने मार्च 2011मध्ये असे दाखवून दिले की, भारत आंतरराष्ट्रीय शस्त्र बाजारात सर्वांत जास्त शस्त्रास्त्रे आयात करणारा देश आहे. याच कारणास्तव पाकिस्तानमध्ये लष्कराचे वर्चस्व अनेक वर्षे चालत आले. वर्ष 2009मध्ये पाकिस्तानने संरक्षणावर 23.1% खर्च केला, तर आरोग्यावर 1.3% आणि शिक्षणावर 7.8% इतका कमी खर्च केला. पाकिस्तानच्या तुलनेत भारताने त्याच काळात 18.6% संरक्षणावर, 3.4% आरोग्य, 12.7% शिक्षण क्षेत्रात खर्च केला.
लष्कराच्या सतत पाठिंब्यामुळेच पाकिस्तानात स्थैर्य कधीच बघायला मिळाले नाही. परिमामी, भारताच्या किंवा जगातील अनेक विकसनशील देशांच्या तुलनेत हा देश नेहमीच मागासलेला राहिला. लष्कराच्या दादागिरीमुळेच परवेझ मुशर्रफ पाकिस्तानचे प्रमुख झाले आणि त्याच काळात बेनझीर भुत्तोंची हत्या (27 डिसेंबर 2007) झाली. पुढच्याच वर्षी अर्थात, आॅगस्ट 2008मध्ये मुशर्रफ पायउतार झाले. कारण त्यांचे खंदे समर्थक असलेले लष्कर आणि अमेरिका यांचा पाठिंबा त्यांना राहिला नाही.
अनेक वर्षांनंतर पकिस्तानमध्ये लष्करी शासक आता नाही. पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे सरकार तेथे निवडणूक जिंकून आलेले आहे. शरीफ हे किती ‘शरीफ’ आहेत व पाकिस्तानी सैन्याला वठणीवर आणून किती दिवस आपले सरकार व्यवस्थित चालवून पाकिस्तानची दशा व दिशा सुधारू शकतात, याकडे फक्त भारताचेच नव्हे, तर जगाचे डोळे लागले आहेत. विकसित पाकिस्तान, स्थिर पाकिस्तान केव्हाही भारताला हवाच आहे.
पुस्तकात अनेक आंतरराष्ट्रीय संदर्भ, पाकिस्तानचा इतिहास, भारताबद्दल भाष्य, अमेरिकेची बदलती भूमिका वगैरे सगळेच वाचायला सर्वसाधारण वाचकाला व राज्यशास्त्राच्या अभ्यासकांना केव्हाही आवडेल.

> पुस्तक : द पाकिस्तान मिलिट्री इन पॉलिटिक्स : ओरिजिन्स, इव्होल्युशन, कॉन्सिक्वेन्सेस
> लेखक : इश्तियाक अहमद
> किंमत : 795 रु., पाने : 540
> प्रकाशक : अमरयलीज
(abhilash@dainikbhaskargroup.com)