आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • There Should Be Consantrate On Speaking Language

लुप्त झालेल्या भाषांचे, लोकवाङ्मय, बोलीभाषांच्या संशोधनावर भर दिला पाहिजे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रा. कमलताई पाटील बोलीभाषेच्या अभ्यासिका, भुसावळ - Divya Marathi
प्रा. कमलताई पाटील बोलीभाषेच्या अभ्यासिका, भुसावळ

खेड्यांसह शहरातील मराठी माध्यमांच्या शाळा बंद होऊ नयेत, यासाठी पालकांनी इंग्रजीचा अट्टाहास कमी करण्याची गरज आहे. मराठीच्या उपशाखा असलेल्या प्रत्येक बोलीभाषेचा गोडवा संवादातून व्यक्त झाला पाहिजे. भाषिक संशोधनासाठी धडपडणा-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्याची मोहीम यशस्वी होऊ शकते.


* मराठी शब्दभांडारामुळे अभिजात आहेच
मराठी भाषा ही आशयघन शब्दभांडारामुळे अभिजात आहेच. तिचे प्राचीनत्व सिद्ध करण्यासाठी मोडीसह ज्या भाषा लुप्त झालेल्या आहेत, त्यांचे संशोधन झाले पाहिजे. अभिरुची टिकवून ठेवण्यासाठी साहित्य वर्तुळात जी ‘कंपुशाही’ फोफावली आहे, तिचे समूळ उच्चाटन करण्याची नितांत गरज आहे. तसं झालं तर नवोदित लेखकांना खरे बळ मिळून कसदार साहित्य कलाकृती वाचकांना मिळतील. पर्यायाने मराठी भाषेची अभिरूची उत्तरोत्तर वाढतच राहील.


* परभाषेतील शब्दाने दर्जा कमी होत नाही, खेडोपाडी यात्रोत्सवात ग्रंथप्रदर्शनांची गरज
मराठी भाषेत परभाषेतील शब्दांची घुसळण झाली म्हणून तिचा दर्जा कमी होत चाललाय, अशी जी ओरड केली जातेय, ती अयोग्य आहे. बहुभाषिक देशांत भाषेचे आदान-प्रदान होणे स्वाभाविक आहे. कारण, भाषा चैतन्यदायी, जिवंत अन् प्रवाही असते. कालपरत्वे ती नावीन्याचा शोध घेते. लोकवाङ्मयात दडलेल्या खजिन्याचे उत्खनन करून त्याच्या लखलखाटाने मराठी भाषेचं सौंदर्य आणखी तेजाने खुलले पाहिजे. त्यासाठी शहरांसह ग्रामीण भागातही लोककला महोत्सवांचे आयोजन होणे नितांत गरजेचे आहे.
सांस्कृतिक, वैचारिक जडणघडणीसाठी हे महोत्सव भविष्यात पथदर्शी ठरतील. यात्रोत्सव, गणेशोत्सव, दुर्गोत्सवात खेडोपाडी, शहराशहरांत ग्रंथप्रदर्शन लावून विचारमंथन घडवून आणणा-या पुस्तकांवर सर्वकष चर्चा व्हावी. गप्पा कट्टा, नुक्कडमंच, वाचनकट्टा, सांस्कृतिक कट्टा असे उपक्रम राबवणा-या संस्थांचे जाळे विणले गेले पाहिजे.


* मातृभाषा हे ममत्वाचा
झरा अन् छत
भाषिक, धार्मिक अन् राजकीय या तीन शक्ती जगात सामर्थ्य गाजवू शकतात. त्यातील भाषिक शक्ती ही दोन्ही शक्तींचे पूरक खाद्य आहे. ती सशक्त राहावी, यासाठी तिचं अभिजातपण टिकवून ठेवणे हेच खरे आव्हान असते. ‘इंग्रजी भाषा ज्ञान मिळवण्याची खिडकी आहे; पण खिडकी म्हणजे घर नसते. मातृभाषा हे मायेचं छत असतं. त्याला विश्वासाच्या मजबूत भिंती असतात’, असं विधान वि. वा. शिरवाडकरांनी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यावर केलं आहे. त्यांचं हे विधान भाषेच्या अभ्यासकांनी, संशोधकांनी नजरेसमोर ठेवले पाहिजे. नुसतं हे विधान समोर ठेवून चालणार नाही, तर ते समाजमनाच्या नसानसांत भिनायला हवं. त्याची सुरुवात प्रत्येकाने आपल्या घरापासून करून मातृभाषेत बोलण्याचा आग्रह धरावा. आपण इंग्रजीत बोललो म्हणजे समाजात वेगळं वलय निर्माण होतं, हा गैरसमज असून तो वेळीच दूर केला पाहिजे.


* अभंग, विराण्या, शाहिरी वाङ्मय, गवळणी, पोवाड्यातील रस उलगडून सांगण्याची कला अन्य भाषांमध्ये नाही.
साहित्य कलाकृती ही समाजाचा आरसा असते. कथाकथन, अभंग, विराण्या, शाहिरी वाङ्मय, गवळणी, पोवाडे यातील रस उलगडून सांगण्याची जी कला मराठीत आहे, ती अन्य भाषांमध्ये नाही. मराठीतील समृद्ध साहित्यामुळे भावनांचा निचरा होण्यास मदत होते. माय मराठीतील ‘पोर खाटेवर मृत्यूच्या दारा, कोणा गरिबाचा तळमळे बिचारा’ ही कविता जेव्हा शिक्षक अभिनय कौशल्याचा वापर करून शिकवतात तेव्हा आपल्या मराठी भाषेसारखी दुसरी भाषा होणे नाही, असा विचार डोक्यात आल्याशिवाय राहात नाही. ब्रिटिश राजवटीत कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांनी लिहिलेल्या ‘किचकवध’ नाटकातील रूपक हे गुलामीचे जोखड तोडून फेकण्याचा संदेश देणारे होते. हे रूपक ब्रिटिशांना कळाल्यामुळे त्यांनी या नाटकावर बंदी आणली होती. मराठी भाषेची ताकद ब्रिटिशांना कळू शकते. मात्र, स्वकीयांना कळत नसल्याने अभिजाततेची ‘मोहोर’ उमटवण्यासाठी भाषा तज्ज्ञांना शासनाचे दरवाजे ठोठवावे लागताहेत, हीच एक शोकांतिका आहे.


* शाहिरी वाङ्मय, बखरींचा अभ्यास-संशोधन व्हावे, ताम्रपट, शिलालेखांचा संशोधनात्मक अभ्यास व्हावा.
मराठी माणसाने मराठीशी बांधिलकी ठेवून काही तरी करण्याची उमेद ठेवावी. वामन पंडित, रघुनाथ पंडित, दासोपंत यांनी लिहिलेले पंडिती काव्य, बखरी, शाहिरी वाङ्मय, अमृतराज यांची काव्यरचना चिकित्सकपणे अभ्यासण्याची आज नितांत गरज आहे. साहित्यनिर्मितीची प्रक्रिया कळावी आणि नवोदित लेखकांना मातृभाषेत लिखाणाला उत्तेजन मिळावे, म्हणून तालुकास्तरावर चर्चासत्रे, साहित्य संमेलनांवर भर दिला पाहिजे. मोडी भाषेतील दुर्मिळ ताम्रपट, शिलालेखांचा संशोधनात्मक अभ्यास व्हावा.