आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चिंता करितो विश्‍वाची ....

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही लेखांवरून सुशिक्षित पांढरपेशा माणसाला पर्यावरणाशी काही देणेघेणे नसते, किंवा तो पर्यावरणसाक्षर नसतो; असा काहीसा संदेश मला द्यायचा आहे, अशी समजूत होण्याचा संभव आहे; पण तसे काही नाही. याला कारण, माझा शेजारी अनिल द्वारकानाथ कुलकर्णी. आम्ही त्याला एडी म्हणतो. एडी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर आहे. रात्रीचे साडेदहा-अकरा झालेले असतात. मी झोपण्याच्या तयारीत असतो, तोपर्यंत दारावरची बेल वाजते. इतक्या रात्री कोण आले? मला प्रश्न. मी दरवाजा उघडतो. दारात अनिल. बराच त्रस्त, चिंताग्रस्त.
त्याची आई बरीच आजारी असते. काही इमर्जन्सी... मला शंका येते. मी त्याला पाणी देतो. त्याच्या हातात एक अंक असतो, तो अंक तो माझ्यापुढं धरतो, ‘हे वाच.’


तो अंक ‘रीडर्स डायजेस्ट’चा असतो. इतक्या रात्री मला वाचायला लावण्याइतपत काय गंभीर प्रकरण आहे, मी ते आर्टिकल पाहतो. व्हेल माशांचे फोटो असतात. मी नुकताच अंटार्क्टिकाला जाऊन आल्यामुळे तो व्हेलविषयीचा लेख मला वाचायला देत असेल, परंतु इतक्या रात्री?
‘बाबा, सकाळी वाचतो.’ मी त्याला घालवण्याच्या तयारीत.
‘आताच वाच.’
‘काय विशेष आहे, तूच सांग.’ त्याच्यावर ढकलून मी मोकळा होतो.
‘वाच. व्हेलची संख्या कमी होतेय.’
मलाच समजायला हवे होते, अनिलला वैयक्तिक चिंता फारशा सतावत नाहीत. वैश्विक चिंतेनेच तो सतावला जातो. घरी आई अतिआजारी आहे, हे त्याच्या चिंतेचे कारण नसते. ज्यांच्याशी त्याचा कधी बापजन्मी संबंध येणार नाही, शीतसागरातल्या त्या महाकाय जलचराच्या भवितव्याच्या काळजीत तो असतो. ‘मायला मी काय व्हेलचे उत्पादन करतो? जा, शांत चित्ताने झोप. मला पण झोपू दे.’ मी त्याला घालवतो. तथापि, एडी हा खरा मातृभक्त. आजारपणात त्याने आपल्या आईची जी सेवा केली, त्याला तोड नाही. एडी मातृभक्त असला तरी भावनांच्या आहारी जाणारा नव्हता. आई गेल्यानंतर बाकी आता आपला कार्यभाग संपल्यागत तो वागू लागला. आपल्या आईचे कलेवर आपल्या भावांच्या ताब्यात देऊन तो मुक्त झाला. आईच्या अंत्यसंस्कारांवेळी तो त्रयस्थासारखाच वागत होता. त्याच्या भावाने भडाग्नी दिला. मी एडीशेजारी उभा होतो. एडी माझ्या कानात कुजबुजला,
‘बघ प्रकाश, लाकडांचा कसा नाश चाललाय...’
‘बाबा रे, हे बोलण्याची ही जागा नव्हे.’ मी त्याला गप्प बसवतोय.
लोक काय बोलतील? आपल्याविषयी त्यांचे काय मत होईल? याची एडी पर्वा करत नाही. पर्यावरण संवर्धन हा एडीचा खास विषय; बोलण्याचा नव्हे, तर कठोर आचरणाचाही.
डोळ्यांची साथ आलेली. तिला बळी पडलेला हरेक जण डोळ्याला गॉगल लावून आॅफिसात येत होता. एडी हा हटके प्राणी. मुलांचा खेळण्यातला पाच रुपयांचा रंगीत चश्मा लावून तो आॅफिसात आलेला. सर्व जण त्याला हसत होते. एडीला त्याचे काही नव्हते. त्याचे स्पष्टीकरण तयारच होते,
‘केवळ साथीच्या दिवसांत आपल्याला हा चश्मा वापरायचा असतो. त्या काळात तो प्रदूषित होतो. नंतर तो जाळून नष्ट करणे आवश्यक असते. त्या खातर महागडा चश्मा वापरणे ही ऊर्जास्रोतांची उधळपट्टी आहे.’
‘पर्यावरण संवर्धन’, ‘ऊर्जास्रोत’ त्याच्या गप्पांतले परवलीचे शब्द, तसेच त्याच्या आचरणातलेही. पर्यावरण संवर्धन म्हणजे, ऊर्जांचा किमान वापर, त्यांचे किमान शोषण. त्यावर उपाय म्हणजे, ऊर्जास्रोतांची बचत. म्हणजेच काटकसरीचे धोरण, गरजा नियंत्रित करणे. इस्त्रीचे कपडे वापरणे गरजेचे आहे का? त्याचा सवाल असे. कपड्यांना इस्त्री केली नाही तर विजेची किती बचत होईल, तो गणिताला लागतो. भारतात विजेचा होणारा वापर, पेट्रोपदार्थांवर भारताचे खर्ची पडणारे चलन वगैरे आकडेवारी त्याच्या जिभेवर रुळत असते. नित्य जीवनात विजेची बचत कशी करता येईल, काही सोपे उपाय तो सुचवतो. एडीला आता एक नवा छंद जडलाय. कच-यात टाकलेले निकामी फ्यूज तो जमा करतो. फ्यूज निकामी होतो, म्हणजे त्याची तार जळलेली असते. फ्यूजचा पोर्सिलीन बेस का टाकून द्यायचा? शक्य असेल तर अशा बेसवर तार बसवून फ्यूज वापरात आणता येतो. तयार झालेला फ्यूज तो तपासतो आणि कुणा गरजूला (शक्यतो गरीब) तो देऊन टाकतो. त्या व्यक्तीची इच्छा असेल तर फ्यूज कसा बनवायचा, याची माहितीही देतो. किमान त्याच्या घरातला निकामी फ्यूज कच-यात येणार नाही, ही त्यामागची भूमिका!