आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या वयात बाशिंग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


वयाची जेमतेम पन्नाशी गाठलेल्या एका गृहस्थांच्या पत्नीचं निधन झालं. पदरी दोन मुलगे आणि एक मुलगी. पुढची जवळपास पंधरा वर्षं या गृहस्थानं मुलामुलींची शिक्षणं केली, त्यांना उद्योगधंद्याला लावलं. मुलं संसाराला लागली. वडील मात्र फक्त जबाबदारीतून मुक्त झाले नाहीत, तर अगदी एकटे पडले. या एकटेपणाच्या अवस्थेत त्यांचा एका पन्नाशीच्या पुढच्या विधवा महिलेशी परिचय झाला, ओळख वाढली आणि त्यांनी लग्न करायचं ठरवलं. बातमी परिवाराला कळली आणि समाजातही प्रसृत झाली, त्याचा केवढा बोभाटा झाला. ‘स्मशानात गोव-या जायची वेळ आली आणि तुम्ही बाशिंग बांधायला निघाला आहात, शोभत नाही,’ असे टोमणेही मारले गेले. या दोघांचं म्हणणं होतं, ‘आता आम्ही अगदी एकटे पडलो आहोत. शिरावर जबाबदा-या होत्या म्हणून एकटेपणा बाजूला सारून मुलांच्या सुखाला प्राधान्य दिलं. आता परिस्थिती बदलली आहे. उरलेली वर्षं आम्ही एकमेकांचा सहवास, सहकारात, उबेत घालवली तर काय बिघडलं?’
याचा विविध अंगांनी विचार होणं गरजेचं आहे.

या वयात एखादी व्यक्ती पुनर्विवाहाचा विचार करते तेव्हा तिथे लैंगिक भावनेचा पूर्णपणे अभाव नसेल, पण त्याचं प्राधान्य नक्कीच कमी झालेलं असतं, हे मान्य करायला हवे. इथे प्रश्न मुख्यत: व्यक्तीच्या एकटेपणाचा आहे. कुणी म्हणेल की, या वयात माणसानं मुला-नातवंडांत मन रमवावं किंवा देवदर्शन, धार्मिक कार्य इ. गोष्टींमध्ये वेळ घालवावा. ही अनुभवावाचून शिकवण आहे. सध्याच्या समाजव्यवस्थेत नातवंडं तर लांब, मुलांचंदेखील स्वत:चं वेगळं जग असतं. उतारवयातल्या आईवडिलांशी वैचारिक जवळीक राखण्याचा प्रयत्न करण्याएवढी आत्मीयता त्यांच्यापाशी नसते. त्यामुळे विवेकीपणे व्यवहार आणि सोय पाहण्याचा प्रयत्न केला जात असला तरी दोन पिढ्यांतलं अदृश्य अंतर दिवसेंदिवस वाढतच जातं. अशा परिस्थितीत वय वाढलेल्या व एकट्या पडलेल्या वडिलांना किंवा आईला समवयस्क साथीदाराची गरज भासली तर ते अवांछनीय मानण्याचं कारण नाही.

कोणत्याही वयात पुरुषाला स्त्रीची गरज असते आणि स्त्रीला पुरुषाची. यावर असाही युक्तिवाद होऊ शकतो की, या मुद्द्यावरून लग्नाचं वय उलटून गेल्यावर केलेल्या पुनर्लग्नानं दोघांच्याही गरजांचं कायमस्वरूपी निराकरण होईल का? मृत्यू केव्हा येईल हे कुणीच जाणत नाही. पाच-दहा वर्षांनी पुन्हा दोघांपैकी एकावर एकटं जगण्याची वेळ येईल आणि या काळापर्यंत त्याचं शरीर आणि मन दोन्ही अधिक दुर्बल झाले असतील, आता त्याच सगळ्या गरजा लक्षात घेऊन पुन्हा एकदा लग्न करता येईल? केव्हा ना केव्हा दोघांपैकी एकाला एकटेपणाच्या अवस्थेत राहावं लागणारच आहे, त्यावर काही उपाय नाही. आणखी एक मुद्दा : लग्नाचं वय ओलांडल्यानंतरचे पुनर्विवाह आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि संपन्न व्यक्तीच करू शकतील. प्रसंगी आप्तस्वकियांमध्ये अप्रिय होऊन जगण्याचे संकल्पबळही त्यांच्यापाशी हवे. सर्वांपाशी ते असत नाही. याची गोळाबेरीज इतकीच की, अशी लग्नं फार कमी प्रमाणात होऊ शकतात. पुनर्लग्नानंतरचा सहजीवनाचा काळ प्रसंगी आप्तजनांत अप्रिय होऊनही जगता येईल. मात्र, हे सहजीवन समाप्त झाल्यावर पुन्हा येणारा एकाकीपणा, वाढत्या वयाबरोबर वाढलेली दुर्बलता आणि घटलेलं संकल्पबळ या सा-या मुळे अधिकच जाचक होणार नाही का? पुनर्लग्नामुळे दूर गेलेले आप्तजनही आता अधिक टोमणे मारू लागतील, ‘काय मिळवलंत पुन्हा एकदा बोहल्यावर चढून?’ कित्येक वर्षांच्या सहजीवनानंतर जीवनसाथीच्या मृत्यूमुळे व्यक्ती एकटी पडते, धैर्याने सर्व कौटुंबिक जबाबदा-या पार पाडते आणि मग पुनर्विवाह करते. गेलेल्या साथीदाराबरोबर संपूर्ण प्रेमाने आणि निष्ठेसह जगल्यानंतरही त्याच्या मृत्यूनंतर साथीदार हवा, अशी भावना निर्माण होऊ शकते. ही गरज बव्हंशी मानसिक असली तरी त्यात लैंगिक भावनेचा अंशही नसतो, असं म्हणणं ही फसवणूक ठरेल. अशा वेळी पुनर्विवाह हा एकमात्र पर्याय उरतो. क्वचित प्रसंगी लग्नावाचून आणि लैंगिक भावनेचा लवलेशही नसलेला असा संबंध - अशी मैत्री दोन्ही पक्षांकडून विकसित होऊ शकते; पण या प्रकारच्या संबंधाला अनेक सामाजिक बंधने असतात. अशा बंधनात अप्रामाणिकपणे जगण्यापेक्षा पहिला प्रामाणिक पर्याय अधिक विचारार्ह ठरतो. पत्नी पतीच्या आधी निधन पावली तर तिला सुवासिनी म्हटलं जातं. हिरवा चुडा, मळवट लेऊन मरण येणं हे स्त्रीजीवनाचं सौभाग्य मानलं गेलं आहे. इथे एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे.

मुलाच्या संसारात विधुर बापाचं जगणं आणि विधवा आईचं जगणं यात महद् अंतर असतं. ईश्वराने जन्मत:च स्त्रीला सहनशीलता आणि जुळवून घेण्याची क्षमता दिलेली आहे. हे दोन्ही गुण पुरुष स्वभावात कमी आढळतात. त्यामुळे विधुर झालेला वृद्ध साधनसंपन्न नसेल तर घरात अडगळ बनण्याची शक्यता अधिक असते. विधवा स्त्रीवर असा प्रसंग येण्याची शक्यता कमी. परदेशात आनंदाने राहणारे कित्येक मुलगे-सुना कधी आईवडिलांना तर कधी सासू-सास-या ंना आग्रहानं परदेश पाहायला बोलावतात. तो काळ ब-या च वेळा सूनबार्इंच्या बाळंतपणाचा असतो. माझ्या एका मित्राची पन्नाशीतील पत्नी एकदा म्हणाली, ‘माझी इच्छा आहे की यांनी माझ्या आधी जगाचा निरोप घ्यावा.’ हे बोलणं झालं तेव्हा माझे मित्रही हजर होते. मला चकित झालेला पाहून बार्इंनी खुलासा केला तो असा : तुमच्या मित्राच्या सर्व गरजा मी पूर्ण करते, कपड्यांपासून जेवायला बसताना पाण्याचं लोटी-भांडं ठेवण्याचं कामही मी आपण होऊन स्वीकारलं आहे. त्यांच्या या सगळ्या सोयी पाहणं कुणालाच जमणार नाही. त्यांची अशी दयनीय अवस्था होण्यापेक्षा त्यांचं आधी जाणं माझ्या दृष्टीनं कमी दु:खद असेल. ही माया, प्रेम वा समज? काय म्हणता येईल याला?

(क्रमश:)
अनुवाद - डॉ. प्रतिभा काटीकर, सोलापूर

dinkarmjoshi@rediffmail.com