आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे सारे तुम्हीच तर मला शिकविले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लहानपणाची माझी एक आठवण आहे. आई, बाबा जवळ बसले होते. आईने हलकेच माझा कान तिच्या पोटावरील नरसाळ्याला लावला होता. माझा हात तिच्या हातात घेत, तिच्या पोटावरून फिरवत म्हटले होते, ‘बघ, पोटातील बाळ हात-पाय हलवतेय. समजले का तुझ्या हाताला? तुझ्या कानात ठक् ऽ ठक् ऽ असे ऐकू येतेय का? डोळे मीट. माझ्या पोटातले बाळ दिसते का? बघ, नक्की दिसेल.’ काही दिवसांनी एक चुनुमुनु अद्भुत, म्हणजेच माझी बहीण आमच्या घरात, माझ्या हातात आली! लहानपणी आई माझ्यासाठी ‘वाजीव रे बाळा, वेल्हाळा, रुमझुम घुंगुरवाळा’ हे गाणे म्हणायची. बहीण थोडीशी जरी रडली तरी आईचे गाणे मी म्हणत असे. आणि काय आश्चर्य, पाळण्यातली ती छोटुकली टुकुटुकु पाहायची! आईच्या गाण्यात काही तरी नक्की जादू असावी, असे मला वाटायचे. लहानपणी मी आईला मनात येईल ते विचारत असे. तिच्या पोटावरून हात फिरवल्यावर मी विचारले होते, ‘आई, मी
एवढा मोठा तुझ्या पोटात कसा मावलो?’ तसेच एकदा अत्यंत गंभीर होऊन, ‘आई आपल्या चुनुमुनुला डॉक्टरकडे न्यायला हवे. तिला शू करायला काहीच नाही आहे, मग तिला शू कशी होणार बरं?’ आता त्याचे खूप हसू येते. एवढे आठवते, आई कधीही रागावली नाही. ती नेहमी माझे समाधान होईल असे उत्तर देत असे. त्यामुळे मला कळत गेले आणि आईचा विश्वास वाटू लागला.


बहिणीला सोडून शाळेत जायला मला आवडायचे नाही. ‘शाळेत गेलास तर खेळायला मित्र भेटतील. त्यांना बब्बडच्या गमती सांग. आपली बब्बड सकाळी झोपलेली असते,’ अशी समजूत घालून आई मला शाळेच्या बसमध्ये सोडायची. आई मला छोटी छोटी कामे सांगत असे. ती करताना मला मजा यायची. बब्बडचे छोटे कपडे वाळण्यासाठी चिमट्यात अडकवले की ते वा-याने हलायचे. ते पाहून बब्बड जोरात ओरडायची आणि हात-पाय हलवायची. तिचे दोन्ही हात
धरले की ती भरभर पावले टाकायची. ‘आता तोंड उघड,’ असे म्हणून मी माझे तोंड उघडून दाखवत असे. तर लगेच ती मोठा आ ऽ ऽ करायची. तिला केळे भरवताना ही युक्ती करायला मला आईने शिकवले होते. एकदा दिवाळीच्या फटाक्यांच्या आवाजाला घाबरून ‘कोन आवाज कलतंय?’ असे विचारत कावरीबावरी होत बहीण मला बिलगली. त्यानंतर मला फटाके आवडेनासे झाले.


‘फटाक्यांच्या आवाजाला घाबरायला तू काय मुलगी आहेस?’ असे माझे मित्र मला चिडवायला लागले. मला वाईट वाटले. ‘मी तुला फटाके न उडवणा-या मुलामुलींची गोष्ट सांगते,’ असे म्हणत आईने मला त्यांची छान गोष्ट सांगितली. आता ती सर्व आठवत नाही. पण गोष्टीतल्या मुलामुलींनी फटाक्यांच्या कारखान्यात काम करणा-या मुलामुलींना भेटून त्यांना होणारे त्रास समजून घेतले होते. शिवाय आवाज आणि सगळीकडे पसरणारा दारूचा वास/धूर यामुळे त्यांनी फटाके उडवणे आपणहून बंद केले होते, एवढे आठवते.


हे लहानपण कसे संपले समजले नाही. मी आणि बहीण उच्च शिक्षणासाठी घर सोडून लांब गेलो. आईचे मेल यायचे, ‘तुझी अनुपस्थिती खूप जाणवते. बाबा स्वयंपाकात सर्व मदत करतो, पण सर्व साग्रसंगीत करण्यातला तुझा उत्साह काही औरच आहे. मला नेहमी वाटते तू जिला जोडीदार म्हणून निवडशील ती तुझ्या या उत्साहाने खूप खुश होईल.’ आईला माझी खास मैत्रीण आहे याची कुणकुण तर लागली नसेल ना? खास मैत्रीण यावरून एक लहानपणची गोष्ट आठवली. मी आठवीत होतो. मला माझ्या वर्गातील एक मुलगी खूप आवडायची. तिच्याशी मला बोलावेसे वाटायचे. तिच्याकडे पाहावेसे वाटायचे. ती खूप पुस्तके वाचायची. माझ्याकडेही खूप पुस्तके होती. आम्ही पुस्तके एकमेकांना देऊन त्यावर बोलत असू. यावरून मित्रमैत्रिणी आम्हाला चिडवत होती. ते मात्र आवडायचे नाही. एकदा मी आईबाबाला सांगितले, ‘मी जिच्याकडून पुस्तके आणतो ती मैत्रीण मला फार आवडते. माझे तिच्यावर प्रेम आहे...’ पुढे मी काय बोललो आठवत नाही; पण बाबा आईकडे पाहत होता, आई प्रेमाने, खट्याळ हस-या डोळ्याने माझ्याकडे पाहत म्हणाली होती, ‘हो का, हरकत नाही. तुझे तिच्यावर प्रेम आहे ही गोष्ट मात्र आपली सिक्रेट हं. ती जर तू तिला सांगितलीस तर तिला उगाच अवघडल्यासारखे वाटेल. तिला तू खेळायला, गप्पा मारायला घरी बोलाव.’ यानंतर तिचे, तिच्या कुटुंबाचे आणि आमचे जाणे - येणे सुरू राहिले. आम्ही मिळून सहलीलाही जात होतो. मला हळूहळू प्रेम, मैत्री, खास मैत्री अशा गोष्टी समजत गेल्या. त्या कुटुंबाशी आमची अजून मैत्री आहे. तिला तिचा खास मित्र मिळाला आहे हे नुकतेच तिने मला कळवले आहे. आताची ही मैत्रीण मात्र नक्की खास आहे. तिला आईबाबाला भेटवायचे आहे. ती संधी मला लवकरच मिळाली. शिक्षण संपवून मला लवकर नोकरी लागणार होती. ‘आई, बाबा, माझी खास मैत्रीण आज आपल्या घरी तुम्हाला भेटायला येणार आहे,’ तिची माझ्या मोबाइलवरील छबी दाखवत मी जाहीर केले. दोघेही मोबाइलवर वाकले. त्या आधी बाबाने आईकडे पाहिले. आई प्रेमाने आणि हस-या खट्याळ डोळ्याने माझ्याकडे पाहत म्हणाली, ‘म्हणजे आज खास पोहे तू करणार असशील, हो ना? ती कोण आहे, कशी आहे, काय शिकलीय, कोठे राहते हे सर्व जाणण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत; पण ती तुला आवडलीय ही गोष्ट महत्त्वाची.’ मी पोहे करायचे ठरवले होतेच. आई मनकवडी आहे, याचा पुन्हा एकदा सुखद अनुभव आला.


तिचा फोन आला. ठरल्याप्रमाणे मी तिला आणायला स्टेशनवर गेलो. आम्ही ब-याच वेळा बाहेर भेटलो होतो. आज घरात ती आई-बाबाबरोबर असताना मला वेगळाच आनंद वाटत होता. पोहे खाताना तिने माझ्याकडे एक कटाक्ष टाकला. आईने तो टिपला. बाबा माझ्याकडे पाहत होता. मी लहानपणाच्या आठवणीत हरवून गेलो. आईच्या हाताचा स्पर्श, तिचा वास, तिच्या पोटातील बाळाची हालचाल, बाळाचा तो आवाज मला ऐकू यावा म्हणून चाललेला आईचा प्रयत्न. हे सर्व सूक्ष्म तरल संवाद माझ्या भेटीला आले. मी मनात म्हटले, ‘आई-बाबा, जिला मी जोडीदार म्हणून निवडले आहे तिच्यावर कसे प्रेम करावे ते मला माहीत आहे. माझ्यावर आणि आपल्या लाडक्या बब्बडवर प्रेम करत करत तुम्ही दोघांनी ते मला शिकविलेत.’ आईच्या डोळ्यांतून तेच ओळखीचे आर्जव ओसंडून वाहत होते.


बुद्धा...
आई रोज अंगणात रांगोळी घालायची. तिच्या बोटांच्या चिमटीतून रांगोळीची रेष कशी बाहेर पडायची याची मला मजा वाटत असे. पुढे मला चित्रं काढायला आवडायला लागलं. मी रांगोळीतून चित्रं काढायलादेखील शिकलो. ‘कसं गं माझं बाळ गुणाचं!’ असे म्हणत आई माझे खूप कौतुक करत असे. मग खास दिवशी माझीच रांगोळी दारात असायची. ती सर्वांना ‘माझी’ म्हणून ओळखू यायची. एकंदर माझा हात लागल्याशिवाय सजावट पूर्ण व्हायचीच नाही. मला यात फुशारकी मारायला मिळायची. कधी कधी आई आणि बाबालाही ऑफिसमधून यायला उशीर व्हायचा. ‘आपण आज भेळ करूया,’ असे बहीण म्हणायची. तिला जमायची नाही. ती मला मदत करायची. एकदा आम्ही केलेली भेळ खाताना आई-बाबा परत आले. आमच्या ताटलीतील थोडी थोडी त्यांना दिली. आम्ही सर्व जण बागेत बसलो आहोत, असे मला तेव्हा वाटले होते. आई नेहमीसारखे म्हणाली, ‘किती गुणाची आहेत माझी बाळं!’ आमच्या घरी कामात मदत करणा-या रेणुकाताई रजा घ्यायच्या तेव्हा आम्ही सर्व मिळून कामे करत असू. काम करताना पाण्यात खेळायला आम्हाला मजा यायची. कधी कधी माझे आणि तिचे भांडण व्हायचे. तेव्हा आई म्हणायची, ‘माझी गुणी बाळं भांडतातसुद्धा!’ मग म्हणायची, ‘भांडा, पण प्रेमाने, हो की नाही?’ असे म्हटल्यावर भांडण विसरून आम्ही हसायला लागत असू. आम्हाला जवळ घेऊन आई म्हणायची, ‘माझी बुद्धा आहेत बुद्धा...’ ती आम्हाला ‘बुद्धा’ का म्हणायची हे मी बुद्धिझम शिकलो तेव्हा थोडे कळले!


aruna.burte@gmail.com