आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असेही सोवळेओवळे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

12-13 वर्षांची असताना कलकत्त्याला (आता कोलकाता) आईबाबांसोबत फिरायला गेले असतानाची ही आठवण. कोलकाता शहर तसे विभागलेले - एक भाग चकचकीत, दिमाखदार रस्ते आणि इमारतींनी सजलेला - कोलकाता सिटी आणि एक ब्लॅक अँड व्हाइट बंगाली चित्रपटासारखा दिसणारा - ओल्ड कलकत्ता. अरुंद गल्ल्या, रंग उडालेल्या, मोडकळीस आलेल्या इमारती, दमट-कुंद हवेचा उदास माहोल.


या अशा ओल्ड कलकत्त्यामध्ये एक गोष्ट मात्र अप्रतिम आहे ती म्हणजे ‘रोशोगुल्ला.’ एका हलवायाच्या दुकानासमोर उभं राहून आम्ही 4 प्लेट रसगुल्ले ऑर्डर केले. मातीच्या वाटीतून त्या हलवायाने ‘नैव्येद्यम समर्पयामि’च्या भावनेने ते वाढले. तिस-या सेकंदाला रसगुल्ले गुल्ल झाले आणि हावरटपणाने परत एक ऑर्डर गेली, ‘और चार प्लेट.’
मुंबईत पाणीपुरी खाऊन सवय झालेली की एक पुरी तोंडात टाकतानाच येणा-या पुरीसाठी ताटली पुढे करायची! इथेही आम्हाला वाटले की तो असित सेनचा ‘जुळा भाऊ’ आमच्या आधीच्याच मातीच्या वाटीमध्ये रसगुल्ले वाढेल. आम्ही वाटी त्याच्यापुढे सरसावली मात्र, त्याने अगदी गलिच्छ नजरेने आमच्याकडे पाहिले, सगळा सीपीएम पक्ष डाव्याचा उजवा होईल अशा लालेलाल आवेशात बंगालीमधून काहीतरी जळजळीत ऐकवले आणि रसगुल्ले द्यायला मानेने जोरदार नकार दिला! आम्हाला कळेना. समोर भरपूर रसगुल्ले आहेत, आम्ही खाण्यासाठी उभे आहोत, तर हा मोशाय ‘शाय’ कशाला? आम्ही आणखी अगोचरपणा करायच्या आत शेजारच्या शु-जय / शु-दीप्त अशा भालो-नाम असणा-या भालो गृहस्थाने आमच्यात हावड़ा ब्रिज बांधला. ती उष्टी वाटी आम्ही फेकून देणे अपेक्षित होते. तो असित सेन मातीच्या नव्या को-या वाटीत रसगुल्ल्यांची दुसरी फेरी वाढणार होता. मातीचे उष्टे भांडे परत वापरणे हे हीनपणाचे लक्षण मानले जाते हे आम्हाला तिथे कळून चुकले. ही ज्ञानप्राप्ती आम्ही आणखी 4 रसगुल्ले (अर्थात तिस-या नव्या वाटीत) हाणून साजरी केली! कुणा कुंभाराच्या व्यावसायिक दृष्टिकोनातून ही परंपरा रुळली असेल का? मातीचे उष्टे भांडे परत वापरायचे नाही ही खूणगाठ मात्र मनाशी पक्की बांधली आम्ही!


पुढे अनेक वर्षांनी कामानिमित्ताने सोल, दक्षिण कोरियाला जाणे झाले. आशियाई देश असल्याने आम्हा अभ्यागतांचे आदरातिथ्य अगदी साग्रसंगीत चालू होते. सकाळी ऑफिसला पोचल्याबरोबर समोर डोनट्स आणि केक्सनी भरलेला ट्रे, दुपारी चविष्ट ‘बी बीम बौप’ (कोरियन मसालेभात), मग एक मोठा कॉफी मग आणि संध्याकाळी अगदी पंगत जेवण! सोलचे क्षेत्रफळ पाहता मला वाटते 15 दिवसांत आम्ही तिथली सगळी रेस्तराँ पालथी घातली असतील. आमच्या परतीच्या दिवशी कंपनीचे 10 रथी-महारथी आम्हा दोघा डेलिगेट्सना डिनरला घेऊन गेले. जेवण मागवण्याआधीच 5-6 प्रकारची सलाड्स समोर आली. या पायघड्या होत्या टेबलवर पेश होणा-या खास पाहुणीसाठी अर्थात ‘सोजू’च्या सोबतीसाठी! सोजू या सोज्वळ नावावर जाऊ नका, ती आहे तांदळापासून बनलेली लिकर! दक्षिण कोरियाच्या आदरातिथ्यातील हा मानाचा शिरपेच! ही सोजू प्यायची छोट्या (टकिला शॉट) ग्लासातून. सूवनिअर शॉपमध्ये असे सुबक नक्षीकाम केलेले चिनी मातीच्या ग्लासेसचे सेट वेगवेगळ्या किमतीत मिळतात.


ही सोजू शेअर करणे म्हणजे मैत्रीची खात्री देणे! समोरच्या माणसाने आपल्याला त्याच्या ग्लासमधून ही सोजू द्यायची. आपल्याला देण्याआधी त्याने त्या ग्लासमधून ती स्वत: प्यायची आणि मग तो ग्लास परत भरून (हो तोच त्याचा उष्टा ग्लास!) आपल्याला द्यायचा आणि आपणही सोवळंओवळं न मानता तो ग्लास तोंडाला लावायचा! या ‘उष्टावण’ प्रथेची सुरुवात झाली कोरियन राजाच्या काळापासून. राजावर कोणी विषप्रयोग करू नये याची ही खबरदारी! कोणी जर ग्लास नाकारला तर संशयकल्लोळ आणि मानापमान!


ग्लास तोंडाला लावताना मी त्या कोलकात्याच्या असित सेनची मनोमन माफी मागितली. कुठे तो हलवायाचा स्वत:च्याच उष्ट्या सोवळ्यासाठी थयथयाट आणि कुठे हा कोरियन यजमानांचा आग्रहाचा ओवळा पाहुणचार! संस्कृती कुठलीही असो - कुठलाही ‘पेला’ वादळाला कारणीभूत ठरू शकतो हेच खरे!’