आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिचय जे कृष्‍णमूर्तींचा : शाळेचे मूल्यमापन कसे कराल...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतातल्या कोणत्याही प्रयोगशील शाळेला भेट देताना किंवा प्रयोगशील शाळांविषयीचे कोणतेही पुस्तक वाचताना मी शेवटचा प्रश्न हमखास विचारतो किंवा शोधतो... तुमचे माजी विद्यार्थी आज काय करतात आणि त्यांच्यातील वेगळेपण नेमके कसे आहे... शाळेने तेव्हा केलेले संस्कार आजही टिकले आहेत हे कशाच्या आधारे म्हणता येईल... मध्यंतरी अभय बंग यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनीही हाच प्रश्न विचारला. ते ज्या बुनियादी शाळेत शिकले त्या शिक्षणपद्धतीलाही त्यांनी हाच प्रश्न विचारला. प्रयोग जर आपण म्हणणार असू तर निष्कर्षांचीही चर्चा करावी लागेल आणि हा सहसंबंध सिद्ध होत नसेल तर प्रयोगशीलतेचाच पुनर्विचार करावा लागेल.
मला वाटते कोणत्याही शाळेचे मूल्यमापन करायचे असेल तर त्या शाळेची इमारत, त्या शाळेचा निकाल यावरून ते करू नये तर त्या शाळेने जे मानवी जीवन घडविले त्या माजी विद्यार्थ्यांवरूनच मूल्यमापन करायला हवे.इतक्या वर्षानंतर प्रवाहाशी टक्कर घेताना जे हाताशी उरेल त्यालाच शाळेची पुंजी मानता येईल... शाळांचे वैशिष्ट्य असे की लौकिक अर्थाने यशस्वी ठरलेल्या शाळा एक चलाखी नेहमीच करतात की, समाजाच्या यशस्वितेच्या फूटपट्ट्या लावून तथाकथित यशस्वी झालेले विद्यार्थी आम्हीच घडविले याचे श्रेय घेऊन मोठेपणा घेतात. पण एखादा माजी विद्यार्थी गुन्हेगार झाला असेल तर त्याचे अपश्रेय मात्र कोणतीही शाळा घेत नाही.
कृष्णमूर्ती शाळा काढताना या शाळांमधून बाहेर पडणारी मुले ही मुक्त मनांची असावीत याबाबत ते अत्यंत दक्ष होत. पारंपरिक शाळांपेक्षा या शाळांमधील विद्यार्थी नक्कीच वेगळे असतात तरीही मुक्त मनांचे सृजनशील असे विद्यार्थी या शाळांमधून घडत नाही अशी खंत ते शिक्षकांशी बोलताना नेहमी व्यक्त करत. कृष्णमूर्ती शाळांच्या विद्यार्थ्यांशी बोलताना ते एके ठिकाणी म्हणतात, ‘‘या शाळेत मुले इथे आली आणि या शाळेतून गेली. कोणी अभियंते झाले, कोणी मुली गृहिणी झाल्या आणि सारेजण सामान्यांच्या गर्दीत मिसळून गेले... मला ती कधीकधी कुठेतरी भेटतात. कधी विमानतळावर भेटतात. तर कधी एखाद्या सभेला, सर्वसामान्य माणसे आहेत ती... आणि जर तुम्ही आत्ताच अतिशय काळजी घेतली नाही तर तुमचीही तीच गत होणार....माणसांसारखे असणे... त्यांच्यासारखे चिंताग्रस्त भ्रष्टाचारी, हिंसक, पशूवृत्तीचे, बेदरकार, बेपर्वा, नोकरीसाठी धडपडणे, कार्यक्षमता असो की नसो.... नोकरीला चिकटून असणे आणि नोकरी करतच मरणे यालाच सर्वसामान्य म्हणतात.... जीवनात काहीही नवे ताजे नसणे, आनंद नसणे, कसलाही चौकसपणा नसणे, तीव्र तळमळ, उत्साह नसणे, कशाचीही शहानिशा न करता मुकाट्याने रूढी पाळणे या सगळ्याला मी सर्वसामान्य म्हणतो. यालाच बूर्झ्वा असेही म्हणतात...हे यांत्रिक आणि कंटाळवाणे जगणे आहे....’’ इतक्या थेटपणे कृष्णमूर्तींनी सर्वांना सुनावले होते. कृष्णमूर्तींची सर्वसामान्याची व्याख्या मला विशेष भावली. याचे कारण आपण पैसा, सत्ता असण्याला विशेष व इतरांना आपण सर्वसामान्य म्हणतो पण कृष्णजी जीवनात काहीही ताजे नसणे, आनंद नसणे, चौकसपणा नसणे व तीव्र तळमळ नसणे यालाच सर्वसामान्य म्हणतात. चिकित्सा न करणारे मनही त्यांना असेच सामान्य दर्जाचे वाटते. हा निकष लावला तर ज्यांना आपण मोठे प्रतिष्ठित म्हणतो ते सारेच जण सर्वसामान्य आहेत असेच म्हणावे लागेल.
नकळत कृष्णजी जगातल्या सर्व शिक्षकांना मुलांच्या कोणत्या क्षमता शाळेत विकसित व्हायला हव्यात हेच सांगत आहेत. मुले शाळेत प्रचंड जिज्ञासू बनायला हवीत. ती सतत आनंदी असायला हवीत. कोणतेही काम करताना त्यांना त्यात तीव्र तळमळ वाटायला हवी. अशाप्रकारच्या आमच्या अध्यापनाची व उपक्रमांची रचना असायला हवी.हेच गुण भावी जीवनात मुलांना जगावेगळे बनविणार आहेत. आपले माजी विद्यार्थी जगावेगळे बनायला आजी विद्यार्थ्यांना चिकित्सक व जिज्ञासू व उत्स्फूर्त जगणारे बनतील असे वातावरण शाळेत निर्माण करूया....