आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असावे घर ते छान... साता समुद्रापार...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगाच्या पाठीवर जिथे कुठे मानव वस्ती आहे तिथे त्याच्या राहण्याचे/निवा-याचे एक विशेष ठिकाण आहे, ज्याचा कुटीर, झोपडी, तांडा, वाडा, घर, वास्तू, महाल, चाळ, फ्लॅट असा विकास होत गेलेला आपल्याला दिसून येतो. असे हे घर, तेही विदेशातले कसे असेल? तेथील लोकही असेच एकत्र राहतात का? आपल्यासारखेच त्यांचे नातेसंबंध असतात का, हे प्रश्न मनात येतात. देशविदेशातील लोक, त्यांचे राहणीमान, घरे, यांबद्दल जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. तशीच ती मलाही होती. नशिबाने इंग्लंड, अमेरिका, कॅनडा येथील जीवनमान जवळून पाहण्याची मला संधी मिळाली.


इंग्लंडमध्ये सूर्य कधी मावळत नाही असे म्हणतात. सकाळी चार वाजताच तेथे उजाडलेले असते आणि रात्री आठ वाजताही संध्याकाळचे प्रफुल्लित वातावरण असते. मात्र, ऊन-पावसाचा पाठशिवणीचा खेळ सतत सुरू असतो. हिमवृष्टी कधीही सुरू होते. त्यामुळे येथील घरे बैठी, कौलारू पद्धतीची, त्यावर बर्फ साचला तरी साठून त्याचा त्रास होणार नाही अशी असतात. घराच्या बांधकामात लाकडाचा वापर जास्त असतो. इंग्लंडमधील घरांना (रँच) म्हणतात. जी बहुमजली असतात. त्यांना काँडो (काँडोमिनियम) म्हणतात. या काँडोत अतिशय मोठी, प्रशस्त बंगल्यासारखी घरे असतात. (असे काँडो आता आपल्याकडच्या महानगरातही दिसू लागले आहेत.)


कॅनडामध्ये बर्फवृष्टी सतत असते, तर अमेरिकेचा काही भाग सतत बर्फवृष्टीचा तर काही भाग आपल्याकडच्या उन्हाळ्याप्रमाणे रखरखीत. त्यामुळे तेथील घरेही त्या त्या वातावरणास अनुकूल अशी आहेत. घरे लहान, मोठी, स्वतंत्र, बहुमजली, कशीही असली तरी तेथील सर्व सुविधा या अत्यंत आधुनिक आणि सोयीस्कर आहेत. अखंड वीज, पाणी, इंटरनेट (वायफाय कनेक्शन) गॅससह प्रत्येक घरात फ्रिज, मायक्रोवेव्ह ओव्हन, टोस्टर-ग्रिलर, एसी, रूमहीटर, वॉशिंग मशीन, ड्रायर हे असतेच. ज्या ठिकाणी वॉशिंग मशीन, ड्रायर नसेल त्यांच्याकरिता पैसे घेऊन या सुविधा देणारी केंद्रे जवळच असतात. घरात गरम आणि गार पाण्याचे नळ असतात. पाणी भरून ठेवणे, पाणी केव्हा येईल याची वाट पाहणे, हे स्वप्नातही येत नाही.
तेथील घरात प्रत्येकाच्या सुरक्षेची काळजी घेतलेली असते. घरात प्रत्येक खोलीतील छताला स्मोक अलार्म असतात. घरबांधणीत लाकडाचाच बहुतांश वापर असतो. घरात थोडाही धूर होताच हा अलार्म वाजू लागतो. त्यामुळे वेळीच सावधगिरीचे उपाय करता येतात. आपल्याकडचा स्वयंपाक जसे तळणे, भाजणे, फोडण्या, चटण्या कुटणे, हे तेथील गृहव्यवस्थेशी विसंगत आहे. घराची रचना त्यांच्या गरजा आणि सोयी लक्षात घेऊन केलेल्या असतात. त्यांच्या जेवणात उकडणे, मायक्रोमध्ये गरम करणे, कच्चे पदार्थ-सलाड खाणे, असे असते. जास्त भाजणे, शिजवणे याकरता ते घराबाहेर अंगणात बार्बेक्यू वापरतात.
घरात अग्निप्रतिरोधक सिलिंडर असते. प्रत्येक खोली, पॅसेज, येथील छताला शॉवर असतात. काही धोका वाटला तर तळमजल्यावर असलेल्या कार्यालयात असलेले शॉवरचे बटण सुरू होते आणि घरात पाण्याची कारंजी उडू लागतात. काही नैसर्गिक अडचणींच्या वेळी जसे वादळ, चक्रीवादळ, पूर, अस्मानी संकट येण्याची सूचना मिळताच तेथील मेयर प्रत्येक कुटुंबाला एक एक तासाने मेल करून सावधगिरीच्या सूचना करतात. स्थलांतर करायची गरज असल्यास स्वत: तशी सूचना करून व्यवस्था करतात. प्रत्येक नागरिक आणि कुटुंबाची काळजी सरकार जातीने घेते. अतिशय दक्ष आणि काळजीवाहक यंत्रणेने सुसज्ज असे तेथील सरकार असून त्या सेवेत असलेला प्रत्येक जण त्या सेवासुविधा नागरिकांना वेळेवर पुरवण्यास बांधील असतो. स्कायलाइन असलेल्या ठिकाणी म्हणजे 30 ते 60च्याही पुढे मजले असलेल्या इमारतीत कधीच पाणी, वीज यांची उणीव भासत नाही. जिने, आपत्कालीन मार्ग तसेच एका वेळेस 10 माणसे आरामात हातात सामान, सोबत मुले घेऊन जाऊ शकतील इतक्या प्रशस्त लिफ्ट असतात. प्रत्येक मजल्यावर एक घरातील कचरा, टाकाऊ सामान टाकायची लहान खोली असते. त्यातून कचरा सरळ खाली मोठ्या कचराकुंडी (डेपो)त येतो. तेथून त्याची विल्हेवाट लावली जाते. घरातही लहान मूलसुद्धा साधा कागदाचा तुकडा, कचरा, चॉकलेट, बिस्किटाच्या पुड्याचे रिकामे डबे, वगैरे डस्टबिनमधेच नेऊन टाकते.
भाड्याने घर घेताना तेथील घरमालकाने वा कॉलनीच्या ऑफिसमधून दिलेल्या सूचना आणि नियमांचे काटेकोर पालन करावेच लागते. दर महिन्याचे भाडे ठरावीक तारखेस भरले नाही तर रोज जास्तीचा आकार सुरू होतो, आणि तो देणे बंधनकारक असते. खिडक्या दारांच्या पडद्यांची रंगसंगती ते सांगतील तशीच ठेवावी लागते. खिडकी, दाराच्या बाहेर घरातील काही वस्तू (प्रदर्शनीय, कपडे वळत घातलेले इत्यादी) दिसता कामा नये असा नियमच आहे. घराबाहेरील, सार्वजनिक ठिकाणच्या झाडे, फुले, फळे यांना कोणीही हात लावत नाहीत, ते तोडत नाहीत. घराचे भाडे, लीज मात्र गाव, शहर, महानगर येथे आणि कोणत्या प्रकारचे घर आहे त्यानुसार आकारले जाते. महानगरात उत्तुंग इमारतीप्रमाणेच घराचे भाडेही उत्तुंग आणि गगनाला भिडलेले आहे. रुपयाच्या भाषेत ते दरमहा लाखाच्या पुढे आहे. त्याशिवाय वीज, पाणी, गॅस, वायफाय सुविधा, केबल आणि इंटरनेट कनेक्शन, तसेच सुरक्षा सेवा यांचे चार्ज द्यावे लागतात. पण स्वर्गसुख मिळवायचे तर खर्चाचा विचार का करायचा?