आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विचारांची नवी दिशा- वानप्रस्थ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक वेगळ्याच प्रकृतीचे अप्रतिम पुस्तक! असे एका वाक्यात या पुस्तकाचे वर्णन करता येईल. डॉ. गणेश देवी यांनी वेळोवेळी लिहिलेल्या लेखांचे हे संकलन आहे. असे संकलन कधी कधी प्रत्येक लेखातील वेगवेगळ्या विषयांमुळे बोजड होण्याची शक्यता असते; परंतु हे पुस्तक वेगळे वाटते, त्यातील विचारांमुळे. त्यांच्या वेगळ्या कामामुळे. आजवर आदिवासी क्षेत्रात अनेकांनी काम केले आहे. त्यात जास्त काम राजकीय पक्षांनी केलेले आपल्याला माहीत आहे. कुठल्याही जाणीव-जागृतीचा प्रवास शेवटी राजकीय जागृतीकडे होतोच. तो लांबचा असेल व कदाचित जास्त समृद्ध करणाराही असेल. गणेश देवींनी निवडलेला मार्ग भाषेच्या वाटेने जातो. अस्तंगत होत जाणा-या आदिवासी भाषांबरोबरच त्यांची संस्कृतीही नष्ट होत चालली आहे, याची कल्पना देवींना त्या विभागात फिरताना आली. तसे सगळेच लिहीत होते. आपण वाचत होतो की, आदिवासींची एकमेवाद्वितीय संस्कृती जपायला पाहिजे. हे सर्व वाचताना मनात प्रश्न यायचा की, जपायचे म्हणजे त्यांना आहे त्या अवस्थेतच ठेवायचे? हा फारच अप्पलपोटेपणा झाला. म्हणजे आपण आधुनिक सुखसोयी उपभोगायच्या व त्यांनी तसेच अर्धपोटी-अर्धवस्त्रांकित राहायचे? मग आपण तरी आपली जातीनिहाय, प्रदेशानिहाय संस्कृती टिकवली आहे का? आपल्याला इडली-डोशापासून राजमा-छोले आपले व आवश्यक वाटतात. तेव्हा त्यांची संस्कृती हवे तर पुस्तकात शब्दबद्ध करून ठेवावी! फिल्ममध्ये जपून ठेवावी! अशा त-हेनेही त्यांच्या संस्कृतीची जपणूक करता येईल. परंतु देवींनी जो मार्ग काढला आहे, तो मात्र वेगळा व अन्यायकारक वाटत नाही. त्यांनी आदिवासी भागात जाऊन भाषा केंद्र नावाची संस्था काढली.


वयाच्या पंचेचाळिसाव्या वर्षी स्वत:च्या नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन, सर्व वेळ या संस्था उभारणीसाठी झोकून देऊन काम केले. यासाठी त्यांना आलेले कटू आणि गोड अनुभव त्यांनी या पुस्तकाद्वारे विस्ताराने नमूद केले आहेत. त्यांच्यावर नक्षलवादी असल्याचा आरोप करून, त्यांच्या कामात अडथळे आणण्याचा केलेला प्रयत्न मोदींच्या प्रशंसकांनी मुळातून वाचावा. हे केंद्र वाचले फक्त देवींच्या कामाविषयी सहानुभूती बाळगणा-या काही नोकरशहांमुळे; देवी, त्यांचे सहकारी व विद्यार्थ्यांमुळे व त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना भरघोस आर्थिक मदत करणा-या गोरधनभाई पटेल यांच्यासारख्या दानशूरांमुळे. गरज ही शोधाची जननी असते हे किती खरे आहे, हेही या केंद्राच्या उभारणीदरम्यान लक्षात येते. आदिवासी विद्यार्थ्यांनी स्वत:च इथल्या वर्गांची व सभागृहाची रचना व बांधणी केली व त्यामुळे हे केंद्र युनिक ठरले आहे.
वानप्रस्थाचा अर्थ देवी लावतात त्याप्रमाणे थोडक्यात सांगायचा झाल्यास, स्वत:साठी काम करण्यातून निवृत्ती व समाजासाठी काम करण्याची प्रवृत्ती. अर्थात, त्यांनी हे अनेक उदाहरणांतून दाखवले आहे. त्यासाठी त्यांनी धर्मग्रंथांचा अभ्यासही भरपूर केला आहे. तेही सर्व विवेचन खूप रसाळ झाले आहे. विशेषत: ख्रिस्ती धर्माची व हिंदू धर्माची तुलना त्यांनी अनेक लेखांत केली आहे. परंतु ‘हिंसेची स्वप्नसृष्टी’ या लेखात त्यांचे म्हणणे अधिक स्पष्ट होते. थोडक्यात सांगायचे झाल्यास बायबलमध्ये लिहिल्यानुसार, अ‍ॅडम व इव्हने देवाच्या आज्ञेचे उल्लंघन करून सफरचंद खाल्ल्याने माणसाला मृत्यू यायला सुरुवात झाली. हा झाला माणसाचा मूळ गुन्हा. ‘द ओरिजिनल सिन’ देवींच्या म्हणण्याप्रमाणे पाश्चात्त्य विचारवंत व वैज्ञानिक या दृष्टिकोनामुळे मृत्यूवर विजय मिळवण्याची सतत धडपड करत असतात. आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी अनेक पाश्चात्त्य विचारवंतांची साक्ष काढली आहे. हिंदू तत्त्वज्ञान मरणानंतरच्या विश्वाची कल्पना करतेच; पण पुढच्या अनेक जन्मांची हमी देते व या जन्मात मात्र निवृत्तीला प्राधान्य देते. देवींच्या मते, या दोन्ही मांडणीत व विचार करण्याच्या पद्धतीतच हिंसा आहे. ही त्यांची मांडणी वाचताना अत्यंत तर्कनिष्ठ वाटते व आपणास विचार करण्यास प्रवृत्त करते. दोन्ही धर्मांची चिकित्सा अतिशय वस्तुनिष्ठ पद्धतीने वाचताना समाधान लाभते.


एखादी विचारसरणी नाकारताना वा स्वीकारताना त्याचा खोलवर अभ्यास करणे, योग्य आहे. आपण मात्र एखादी विचारसरणी आपल्याला भावली म्हणून तिचा व विरुद्ध विचारसरणीचाही खोलवर विचार करत नाही. देवी जेव्हा म्हणतात, की डावाही नाही व उजवाही नाही, तेव्हा त्यांनी हे उमजून म्हटले आहे. केवळ पळपुटेपणा म्हणून म्हटलेले नाही, याची खात्री आपल्याला वाटते.
गुजरात दंगलीच्या काळात त्यांचे केंद्र उभारणीचे काम चालले होते व या दंगलीत आदिवासीही सामील झाले होते. त्यामुळे त्यांनी निष्पक्षपातीपणाने या दंगलींचा अभ्यास केला. या दंगलीचा उल्लेख दोन वेगवेगळ्या लेखांतून, तसेच इतरही लेखांत येतो. हा थोडासा विस्कळीतपणा पुस्तकाच्या स्वरूपामुळेही येतो.


म्हणजे वेळोवेळी लिहिलेल्या लेखांचा संग्रह! यात आपले फारसे नुकसान झालेले नाही, कारण कित्येकदा पुनरुक्तीमुळे
विषय समजायला सोपा होतो. त्यांच्या संशोधनानुसार दंगल आयोजित होती. कुणी ती आयोजित केली त्यांची नावे स्पष्टपणे घेतलेली नसली तरी आपल्याला अंदाज येतो. ते स्पष्ट आरोप करतात की, आदिवासींना भडकवण्यामागे त्यांचे केंद्र बदनाम होऊन बंद करता यावे, हा उद्देश स्पष्ट होता. ते असेही म्हणतात की, अहमदाबादमध्ये जो घटक दंगलींमागे होता, त्याचा उद्देश फक्त व्यापारी आस्थापनांना आगी लावून त्यावर कब्जा मिळवणे हा होता. ते कोण होते, हे नंतर कोणी कब्जा मिळवला त्याचा यावरून स्पष्ट होईलच, असेही ते म्हणतात.


आपण जरी दंगलीनंतर दहा वर्षांनी हे वाचत असलो तरी, आपल्याला आज इथे हे माहीत नाही. देवी म्हणतात, की त्यानंतरची लुटालूट प्रथम सामान्य लोक व नंतर सुपारी घेतलेले गुंड यांनी केली. आपल्याकडे भावनिक प्रश्नांवर दंगली घडवून आणणे, ही नित्य बाब झाली आहे. पुढे ‘किक्यारी’ या लेखात ते आदिवासींच्या हातात शस्त्र घेऊन दंगलीत भाग घेण्यासाठी भडकवण्याबद्दल इशारा देऊ इच्छितात. ते म्हणतात की, आदिवासींवर जुलूम पिढ्यान्पिढ्या होत आलेले आहेत. या परिस्थितीबद्दल क्षोभ त्यांच्या मनात साठून आहे. गुजरात दंगलीमध्ये त्यांचा सहभाग हा क्षोभ व्यक्त करत होता. झुंडीने ते जेव्हा चालून यायचे तेव्हा ते पोलिस, बंदुका, मिलिटरी कशालाही घाबरत नव्हते. सामान्य दंगलखोर घाबरतात. यदाकदाचित कुठल्याही कारणाने हा क्षोभ परत उसळला, तर आवरणे अशक्य होईल.


आदिवासींच्या जीवनाशी, त्यांच्या सुखदु:खाशी देवी अनेक प्रकारे समरस झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी ते आपल्या शहरी दृष्टिकोनातून विचार न करता आदिवासींच्याच दृष्टिकोनातून करतात व हे साध्य करणे प्रत्येकाला शक्य होत नाही. आपण आपल्या वर्गीय, जातीय, धर्मीय, शहरी जाणिवांतून मुक्त होत नाही. गणेश देवींचा आवाका म्हणूनच खूप मोठा वाटतो. त्यांचे काम, त्यांचे विचार हे आपल्याला स्पर्श करतात व त्याचा आनंदही खूप मोठा वाटतो.


वानप्रस्थ, लेखक - गणेश देवी
पद्मगंधा प्रकाशन, पुणे
मूल्य 150 रु. पाने 199