आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आंतर शाखीय संशोधनाची झिंग न्यारी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आंतरशाखीय विज्ञानाची दिशा पत्करल्याने मूलगामी स्वरूपाचे संशोधन करणे शक्य होते. परंतु त्यासाठी आपल्या मूळ शाखेतल्या ज्ञानाच्या पलीकडे जाणे गरजेचे असते.
मुंबई विद्यापीठातून एमएस्सी भौतिक शास्त्राची पदवी घेतल्यानंतर, गेली अकरा वर्षे मी अमेरिकेतल्या मॅसेच्युसेट्स विद्यापीठात कार्यरत आहे. येत्या जुलैपासून मी अमेरिकेतील येल विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू होईन. जीव व भौतिकशास्त्राचा संगम असलेले जैवभौतिकशास्त्र(बायोफिजिक्स) माझ्या संशोधनाचा विषय आहे. भौतिक शास्त्रज्ञ मूलभूत संकल्पनांच्या आधारे वा विविध वैज्ञानिक उपकरणांच्या साहाय्याने जैविक प्रक्रिया वा सजीव संस्थेचे परीक्षण व आकलन करण्याचा प्रयत्न करतात. माझ्या संशोधनात मी या दोन्हींचा वापर करत आहे.

डीएनएची संरचना, एक्स-रे उपकरणापासून ते एमआरआयपर्यंत भौतिक शास्त्रज्ञांचे जैवविज्ञानातले योगदान खूप महत्त्वाचे आहे. आपल्या मूळ शाखेपासून संपूर्णत: भिन्न आंतरशाखेत संशोधन करणे, हा वर्तमानातील प्रवाह आहे. माझे अधिकृत शिक्षण भौतिकशास्त्रातले असले, तरी वीज तयार करू शकणाऱ्या जीवाणूंत मला रस निर्माण झाला. अशा जीवाणूंना शरीरबाह्य इलेक्ट्रॉन निर्यात कशी करता येते, हा यातील मूलभूत प्रश्न होता. भौतिकशास्त्रातील साधनांचा वापर करून मला असे दिसले की, हे जीवाणू आपल्या सूक्ष्म केशनलिकांच्या(लॅटिन भाषेत यास Pili असे म्हणतात.) साहाय्याने इलेक्ट्रॉनचे शरीरबाह्य संक्रमण करू शकतात. असे बाहेर पडलेले इलेक्ट्रॉन्स पंखा वा अन्य विद्युत उपकरणं सुरू करण्यासाठी वीज म्हणून उपयोगात आणता येऊ शकतात. भौतिकशास्त्राच्या ज्ञानाधारे मला हे लक्षात आले की, हे इलेक्ट्रॉन विशिष्ट प्रकारे या वाहिकांमध्ये गतिमान असतात; अगदी रेणूंशी संलग्न न होता मुक्त पद्धतीने सर्वसाधारण धातू (तांबे) वाहिकांसारखे. अशा मुक्त गतिमानतेची शक्यता जीवशास्त्रात या अगोदर अशक्य मानली जात असे. माझ्या भौतिकशास्त्राच्या पार्श्वभूमीचा ‘धातूसदृश वाहकता’ (मेटालिक लाइक कंडक्टिव्हिटी) या घटनेचा शोध घेण्यात हातभार लागला.

नॅनो तंत्रज्ञानाचे अद्ययावत शोधनिबंध प्रसिद्ध करणाऱ्या ‘नेचर नॅनो’ या नियतकालिकात २०११मध्ये माझा हा शोधनिबंध प्रथम प्रकाशित झाला. २०१४मध्ये या जीवाणूंच्या विद्युत क्षेत्राचे अंकन करून त्यांचे प्रत्यक्ष छायांकन करण्यात मला यश आले. विज्ञानाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहे; परंतु त्याचबरोबर जीवस्रोतांपासून वीज निर्माण करणे, विषारी घनकचऱ्याचे जैविक पृथक्करण करणे आणि समुद्रात सांडणाऱ्या तेलाचा दुष्परिणाम रोखणे यासाठीदेखील या जीवाणूंचा उपयोग होतो. या जीवाणूंपासून मी विद्युत विजेरी(बॅटरी) बनवण्याच्या प्रयत्नात आहे.
अशा आंतरशाखीय क्षेत्रांत काम करणे, हे अत्यंत उत्कंठापूर्ण तसेच परिपूर्ण समाधान देणारे असते. सृजनता, संशोधन आणि धोके हे वैज्ञानिक प्रगतीचे महत्त्वाचे टप्पे आहेत. सृजनता व संशोधन यांना नेहमीच मान्यता मिळते, परंतु त्यातील जोखीमसुद्धा आपण समजून घेतली पाहिजे.

हे खरे की, आंतरशाखीय विज्ञानाची दिशा पत्करल्याने मूलगामी स्वरूपाचे संशोधन करणे शक्य होते. परंतु त्यासाठी आपल्या मूळ शाखेतल्या ज्ञानाच्या पलीकडे जाणे गरजेचे असते. तो धोका मी पत्करला. रसायनशास्त्रातील नोबेल विजेते अमेरिकी शास्त्रज्ञ अॅलन हिगर यांच्या विचाराने मनोगताचा समारोप करतो. “आगामी नोबेल विजेत्यांनो - सृजनास जोपासा. धीट व्हा आणि धैर्याने शोधांचा ध्यास घ्या. आणि सर्वात महत्त्वाचे हे लक्षात ठेवा की, सर्जनशील व उन्मेषांत अंगभूत धोका असतो. ती जोखीम त्या थराराचा एक भाग असतो आणि विज्ञानमय आयुष्यातले समाधानसुद्धा!”

smnikhil@gmail.com
- शब्दांकन - चिन्मय बोरकर
बातम्या आणखी आहेत...