आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सारे काही मानवतेच्या कल्याणासाठी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्ञात गोष्टीत जितके मानवी कल्याण दडले असते, त्यापेक्षा अधिक कल्याण अज्ञात गोष्टीत दडलेले असते. विवेकनिष्ठ ज्ञान आणि विज्ञान हा त्या अज्ञातापर्यंत नेणारा राजमार्ग असतो. आज या मार्गावरून वाटचाल करत अनेक तरुण-तरुणी देशात-विदेशांत सुरू असलेल्या संशोधन प्रकल्पांत मोलाचे योगदान देत आहेत. निष्ठेने, संयमाने आणि कमालीच्या जिद्दीने सर्वसामान्य माणसाचे जगणे अधिकािधक सुखी आणि समृद्ध होण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. "रसिक'च्या संपर्क वर्तुळात परिचित असलेल्या अशाच गुणवान संशोधकांची युवा वाचकांसाठी प्रेरणादायी ठरणारी मनोगते...

मुंबई, माटुंग्यामधील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (पूर्वीची यूडीसीटी) येथून औषध विज्ञान शास्त्र शाखेत पदवी घेऊन मी २००७मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ डेलावेर येथे जैविक विज्ञान या शाखेत MS आणि नंतर PhDचा अभ्यास सुरू केला. औषध विज्ञान शास्त्राचा अभ्यास करत असताना अभ्यासक्रमात एखाद्या उपविषयावर स्वतंत्रपणे संशोधन करण्याचा अंतर्भाव अजून झालेला नव्हता. त्यामुळे या शाखेची पार्श्वभूमी असलेल्या आणि संशोधनाचे अबकड माहीत नसलेल्या मला ही शाखा बरीच अनोळखी, पण तितकीच आकर्षक वाटली होती.

जैविक विज्ञान शास्त्रातल्या माझ्या अभ्यासक्रमात मी संशोधनासाठी निवडलेला उपविषय होता, इन्फ्लेमेटरी ब्रेस्ट कॅन्सर (आयबीसी). अमेरिकेमध्ये आढळून येणाऱ्या एकूण स्तनाच्या कर्करोगांपैकी आठ-दहा टक्के रुग्णांमध्ये हा विशिष्ट प्रकार दिसून येतो. ही टक्केवारी जरी आकड्यात कमी वाटत असली, तरी या प्रकारामध्ये रुग्णांचा जीवितकाळ (survival rate) हा सरासरी फक्त चार वर्षे आढळून येतो. असे अत्यंत कमी जीवित दर असण्यामागची दोन मुख्य कारणे. एक म्हणजे, या कर्करोगाची विशिष्ट प्रकाराची शरीरात अति वेगाने पसरण्याची क्षमता आणि पर्यायाने त्याचे वेळेत निदान न होणे. दुसरे म्हणजे, या विशिष्ट कर्करोगाविषयी असलेली कमी माहिती आणि पर्यायाने केले जाणारे चुकीचे निदान व उपचार. नेहमीच्या स्तनाच्या कर्करोगासारखी स्पर्शाने जाणवेल किंवा मॅमोग्राममध्ये दिसेल अशी गाठ आयबीसीमध्ये आढळून येत नाही. एका किंवा क्वचित दोन्ही स्तनांचा आकार वाढून त्यांना सूज येणे, दुखणे, खाज सुटणे, लालसरपणा येणे आणि स्तन संत्र्याच्या सालीप्रमाणे दिसणे ही आयबीसीची प्राथमिक लक्षणे आहेत. हीच लक्षणे स्तनदाहामध्येदेखील (Mastitis) आढळून येत असल्याकारणाने आयबीसीचे निदान आणि उपचार बऱ्याच वेळेस स्तनदाह समजून केले जातात.

या प्रश्नांच्या अनुषंगाने विचार करताना दोन गोष्टींचा अभ्यास/संशोधन करणे मला आवश्यक वाटले. ते म्हणजे, मॉलेक्युलर पातळीवर अशा कुठल्या वेगवेगळ्या गोष्टी आयबीसी झालेल्या रुग्णांमध्ये घडत असतील, ज्यांच्यामुळे हा प्रकार नेहमीच्या स्तनाच्या कर्करोगापेक्षा अधिक भयंकर स्वरूपाचा होऊ शकत असेल, अति वेगाने पसरू शकत असेल, हे ओळखणे. दुसरे म्हणजे, असे फरक शोधून काढून रुग्णामध्ये आयबीसीची लक्षणे आढळल्यास त्या विशिष्ट रुग्णामध्ये असलेले मॉलेक्युलर मार्कर्स शोधून काढून त्या मॉलेक्युल्सना लक्ष्य करणारे उपचार नेहमीच्या उपचारांमध्ये (शस्त्रक्रिया आणि रेडिएशन) समाविष्ट करणे. हे असे केल्यामुळे रुग्णांमध्ये आयबीसीची पुनरावृत्ती कमी होऊन एकूण जीवित दर आणि जगण्याची गुणवत्ता वाढू शकते. यालाच आजच्या वैद्यक विज्ञानात वैयक्तिककृत उपचार (Personalized Treatment) असे म्हणतात.

माझ्या संशोधनामध्ये अंतर्भूत असलेल्या गोष्टींचा आणि परिणामांचा धावता आढावा पुढीलप्रमाणे देता येईल. आम्ही ज्या दोन विशिष्ट मॉलेक्युलवर अभ्यास केला, ते म्हणजे Caveolin-1 आणि PDGFR-alpha (Platelet derived growth factor-alpha आयबीसी आणि नेहमीच्या स्तनाच्या कर्करोगामध्ये या दोन्ही मॉलेक्युल्सच्या प्रमाणामध्ये लक्षणीय फरक दिसून आला. हे दोन्ही मॉलेक्युल्स आयबीसी असलेल्या रुग्णाच्या पेशीमध्ये अधिक प्रमाणात आढळून आले. यावरून पुढचे संशोधन हे दोन विशिष्ट मॉलेक्युल्स आयबीसी अति वेगाने पसरवण्यात जबाबदार आहेत का, आणि असल्यास त्यांना लक्ष्य करून त्यांची क्रियाशीलता कशी कमी करता येईल, या मार्गाने झाले.

या संशोधनाअंति असे लक्षात आले की, caveolin-1 molecule आयबीसी अधिक दाहक (invasive) आणि अति वेगाने पसरवण्यास जबाबदार आहे, तर (PDGFR-alpha) हा मॉलेक्युल आवश्यक अशा पोषक द्रव्यांचा आयबीसी पेशींना पुरवठा करून त्यांना जिवंत ठेवतो. या दोन मॉलेक्युल्सपैकी आम्ही PDGFR-alpha मॉलेक्युल लक्ष्य करणारे औषध (क्रेनोलानिंब) वापरून त्याचा आयबीसीच्या पेशींवर किती आणि कसा परिणाम आढळून येतो, त्याचा अभ्यास केला गेला. आमच्या संशोधनाद्वारे क्रेनोलानिब हे औषध प्रथमच वापरले जात होते. या प्राथमिक अभ्यासाअंति असे निदर्शनास आले की, क्रेनोलानिब हे औषध आयबीसी पेशींना मारण्यास (invitro study) तसेच प्राथमिक स्वरूपावर केलेल्या animal study (invivo study)मध्ये आयबीसीच्या गाठींची वाढ रोखण्यास बऱ्याच अंशी यशस्वी ठरते. या अभ्यासाची पुढची पायरी म्हणजे, हेच प्रयोग अधिक विस्ताराने करून त्यांची वैधता प्राण्यांची (उंदीर) अधिक संख्या घेऊन आणि नंतर क्लिनिकल ट्रायल्सच्या द्वारे आयबीसी रुग्णांमध्ये पडताळून बघणे. या घटकेला वैश्विक स्तरावर कर्करोगावर आज प्रचंड प्रमाणावर संशोधन सुरू आहे. तरीदेखील दिवसेंदिवस कर्करोगाचे प्रमाण वाढतच आहे. असे असताना मग हा विरोधाभास कसा, असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. माझ्या मते, हा विरोधाभास एका अर्थी प्रगतीच दर्शवतो आहे. आज ज्या मोठ्या प्रमाणावर कर्करोगावर संशोधन सुरू आहे, त्यामुळे आयबीसीसारख्या कित्येक कर्करोगांची माहिती (ज्यांचे रुग्ण संशोधनाअभावी पूर्वी दगावत होते), त्यांचे अचूक निदान आणि त्यावर योग्य ते उपचार आज होऊ शकत आहेत. हीच बाब थोड्या मोठ्या प्रमाणावर सगळ्याच रोगांना लागू होऊ शकते. त्यामुळे संशोधनाची आवड असलेल्या आणि त्यामध्ये कारकिर्द करण्याची इच्छा बाळगणाऱ्या तरुणांना आज अनेकविध संधी उपलब्ध आहेत आणि अर्थातच जितके कराल तितके कमीच पडेल, अशी परिस्थिती संशोधन क्षेत्रात आहे. कुठल्याही विषयावरचे संशोधन करत असताना एक मात्र लक्षात ठेवले पाहिजे की, नुसते प्रयोगशाळेतले संशोधन करून आज भागणार नाही, तर त्या जोडीला आज गरज आहे ती ते संशोधन सामान्य लोकांपर्यंत आणून त्यांच्यामध्ये अशा विविध रोगांची, त्यांच्यावरच्या औषधांची जागृती निर्माण करण्याची. तसे झाले तर संशोधक हे रुग्ण आणि डॉक्टर यांमधला एक अत्यंत उपयुक्त दुवा ठरू शकतील, असे मला वाटते.
भारतात हृदयरोगानंतर कॅन्सर हाच धोकादायक आजार
दि जर्नल ऑफ दि अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या वतीने नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या जागतिक अहवालानुसार, २०१३ या वर्षात भारतात जवळपास ११ लाख ७० हजार लोकांना कॅन्सर असल्याचे निदान झाले. तर त्याच वर्षी ६ लाख ७५ हजार रुग्ण कॅन्सरमुळे मरण पावले. याच वर्षी जागतिक स्तरावर १.४ कोटी, नव्या केसेस नोंदल्या गेल्या तर, ८२ लाख लोक कॅन्सरमुळे मृत्यु पावले. संस्थेने, भारतात कॅन्सरमुळे मृत्यु होण्यामागची महत्त्वाची कारणे नोंदताना, पोट, यकृत आणि अन्ननलिकेचा कॅन्सर असे सुचित केले. पुरुषांमध्ये फुफ्फुस, यकृत आणि पोटाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण अधिक आहे, तर महिलांमध्ये स्तन, पोट आणि ग्रीवा या जागेत कॅन्सर होण्याचे प्रमाण मोठे आहे. जागतिक स्तरावर कॅन्सरमुळे मृत्यु होण्याची कारणे आहेत, फुफ्फुस, पोट आणि यकृत. पुरुषांमध्ये या तीन कॅन्सरमुळे सर्वाधिक मृत्यु ओढवतो, तर महिलांमध्ये स्तन, फुफ्फुस आणि मोठ्या आतड्याला होणाऱ्या कॅन्सरमुळे सर्वाधिक मृत्यु ओढवतो.
madhurajavadekar@gmail.com
बातम्या आणखी आहेत...