आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पेशींचे अंतरंग हाच माझा ध्यास...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ल्युकेमिया व मायलोमासारख्या कर्करोगांचा सामना करण्यासाठी प्रथिने थोपवणाऱ्या प्रतिरोधकांचा वापर करण्याचे ‘नोवार्टिस फार्मा’सारख्या कंपन्यांनी ठरविले असून त्याच्या प्रयोगशाळेत चाचण्या सुरू केल्या आहेत.
आपले शरीर वेगवेगळे कार्य करणाऱ्या असंख्य पेशींचे बनलेले असते. उदा. आपल्या आतड्यातील पेशी पाचक रस स्रवतात व अन्नाचे शोषण करतात; तर प्रतिरोधक पेशी अपायकारक व जीवाणूंशी लढतात. शरीरास संसर्गापासून मुक्त ठेवतात. आपली कामे करताना, या पेशींना घातक रसायने वा उष्णता यांसारख्या विविध तणावांना सामोरे जावे लागते. अशा तणावयुक्त अवस्थेत पेशी विशिष्ट स्वरूपाचा प्रतिसाद देऊन जिवंत राहतात. पेशींतर्गत प्रथिने निर्माण करून पेशी तणावापासून सुटका करतात.

उदाहरणार्थ, पेशी जेव्हा उच्च तापमानास (उदा. ताप येणे.) तोंड देतात, तेव्हा त्या ‘उष्माघात’ प्रथिनांची निर्मिती करतात. जर पेशी या तणावास सामोरे जाण्यास असमर्थ ठरल्या, तर त्या मृत वा अत्यंत कमजोर होण्याची शक्यता असते. पेशींच्या या तणाव प्रतिसादाचाच वापर करत कर्करोगाच्या पेशी यजमान शरीरात तग धरतात. जर उष्माघात प्रथिनांची निर्मिती थांबवता आली, तर कर्करोगाच्या पेशींना जिवंत राहणे शक्य नसते. ल्युकेमिया व मायलोमासारख्या कर्करोगांचा सामना करण्यासाठी प्रथिने थोपवणाऱ्या प्रतिरोधकांचा वापर करण्याचे ‘नोवार्टिस फार्मा’सारख्या कंपन्यांनी ठरविले असून त्याच्या प्रयोगशाळेत चाचण्या सुरू केल्या आहेत.

मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट, फ्रीबर्ग, जर्मनी येथील माझ्या प्रयोगशाळेत पेशींवर होणाऱ्या या तणावाचा व त्या प्रतिसादाचा अभ्यास सुरू आहे. कर्करोगाच्या पेशी शरीराच्या या बचावात्मक डावपेचांचा आपल्या फायद्यासाठी कसा वापर करतात, याचा आम्ही अभ्यास करत आहोत. त्यासाठी आम्ही कर्करोगाच्या या पेशींची प्रयोगशाळेत कृत्रिमरीत्या वाढ करतो. १९५१मध्ये हेनरिटा लॅक्स या अमेरिकन महिलेचा मृत्यू ज्या कर्करोगामुळे झाला, त्याच्या कर्करोगाच्या गाठीतल्या पेशींना आम्ही कृत्रिमरीत्या वाढवतो. कर्करोगास कारणीभूत असणाऱ्या प्रथिनांचा कृत्रिमरीत्या शरीरात संसर्ग करतो. नंतर उष्माघात प्रतिरोधके कर्करोगाच्या पेशींना मृत करून निरोगी पेशींचे संरक्षण करतात का, याच्या आम्ही चाचण्या करतो. कमीत कमी दुष्परिणामांचे कर्करोगाला थोपवू शकेल, असे तंत्र विकसित करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. कर्करोग हा आत्यंतिक भोग व मृत्यूस कारणीभूत असणारा जागतिक रोग आहे. चिकित्सेच्या दृष्टीने जगभरातले शास्त्रज्ञ, डॉक्टर्स दर्जेदार निदान व उपचाराचे तंत्र विकसित करत आहेत; तर मूलभूत वैज्ञानिक संशोधनात आम्ही कर्करोग का व कसा आकारास येतो, याचा विचार करत आहोत.

कर्करोगाची सुरुवात झाल्यानंतर, त्या पेशींच्या अनियंत्रित वाढीस शरीर अटकाव करू शकत नाही. म्हणूनच कर्करोगावर उपचार करणाऱ्या औषधांनी त्वचा, केस वा रक्तपेशींचे फारसे नुकसान न करता केवळ रोगमूलक पेशींनाच नष्ट करणे जरुरीचे असते. अशा वेळी निरोगी पेशींपासून रोगमूलक पेशी ओळखणे, हे आमच्या संशोधनातले मध्यवर्ती व प्रमुख आव्हान आहे; ते रेणूंच्या पातळीवर करावे लागते. परंतु असा अंदाज घेतल्यानंतर नवीन औषधांचा प्रयोग प्रथम प्रयोगशाळेतील प्राण्यांवर केला जातो. आपल्या शरीरातल्या पेशींची वाढ वा विकास कसा होतो, याचे मर्यादित ज्ञान असल्याने यातील यशासदेखील मर्यादा येतात. एकूणच मूलभूत संशोधन व त्याचा योग्य उपयोग, या दोहोंच्या छेद मार्गांवर सध्याचे संशोधन थबकलेले आहे. आधुनिक संशोधनात उच्च व अज्ञयावत तंत्रज्ञानाचा वापर केला जातो; त्यामुळे यात भौतिक, रसायन वा गणिताचे ज्ञान असणे आवश्यक असते. विविध वैज्ञानिक प्रवाहांद्वारे गणितांच्या साहाय्याने शरीरातल्या ऊतींचे मॉडेलिंग करून, केवळ पेशींकडे बघण्याचा एकांगी दृष्टिकोन न ठेवता, शरीर सर्वांगीण पद्धतीने कसे कार्य करते, विविध संरचना कशा सुसूत्रीकरण करतात, व रोगात हे नियंत्रण कसे बिघडते, याचा आम्ही अभ्यास करत आहोत. नवोदित व तरुण शास्त्रज्ञांना त्यासाठी प्रशिक्षण देत आहोत. पेशीतंर्गत कार्य कसे चालते, याबाबत तुम्हाला तीव्र उत्कंठा असेल, तर हे निर्विवादपणे तुमचे क्षेत्र आहे. परंतु तत्पूर्वी अभ्यासक्रमापलीकडच्या पुस्तकांचे वाचन करा; विविध शास्त्रज्ञांशी चर्चा करा; भौतिकशास्त्र, रसानशास्त्र व प्रगत गणिताचा अभ्यास करा. भारतातल्या दर्जेदार संस्थेतून पीएचडी प्राप्त करा. ईर्षेने संशोधनक्षेत्राशी जोडलेल्या स्वप्नांचा माग घ्या. जगाची कवाडे नक्कीच तुमच्यासाठी खुली होतील...
kciwtir@gmail.com
- शब्दांकन - चिन्मय बोरकर
बातम्या आणखी आहेत...