Home | Magazine | Rasik | thrill-dessertation-jayraj-salgawkar

वाळवंटातील थरार

जयराज साळगावकर, कालनिर्णय समूहाचे संचालक | Update - Jun 02, 2011, 12:38 PM IST

मध्यपूर्व आणि उत्तर आफ्रिकेतील देशांमधील असंतोष गेल्या दशकात पराकोटीला पोहोचला. तो इंटरनेटवरील गुगल या सर्च इंजिनमुळे आणि ट्विटर, फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइट्समुळे.

 • thrill-dessertation-jayraj-salgawkar

  मध्यपूर्व आणि उत्तर आफ्रिकेतील देशांमध्ये गेल्या काही काळात उठाव झाले. खरे तर उठावांमागील सामान्य लोकांच्या असंतोषाचे कारण तेथील दशकानुदशके असलेल्या हुकूमशाही आणि घराणेशाही राजवटी हे होते. ही घराणेशाही तेथील नवीन पिढीला अजिबात नको होती. अरबांची नवीन पिढी सुशिक्षित आणि सुजाण आहे. अल्लाने आपल्याला दिलेल्या तेलावर ताबा मिळवून हे हुकुमशाह अतिश्रीमंत आणि सुखासीन जीवन जगतात आणि सुसंस्कृत, सुशिक्षित जनतेला आधुनिक सोयी-सुविधा, सुखांपासून वंचित ठेवतात, याची जाणीव त्यांना आहे.


  राज्यकरत्याविरोधातल्या लढ्याला खरे तर टयुनिशियामध्ये तोंड फुटले. याला 'टयुनिशिया इफेक्ट' असे आता म्हटले जाते. गरिबी, भूक, बेकारी यांनी त्रस्त असलेल्या टयुनिशियात एक नवा महंमद जन्माला आला. जनतेच्या बरोबर राहून जनतेचे दु:ख उघड करण्यासाठी त्याने भर चौकात स्वत:ला जाळून घेतले. तत्क्षणी टयुनिशियात उठाव झाले. जनता रस्त्यावर उतरली. या उठावाची धग तडक येमेनपर्यंत पोहोचली.
  खरे तर पंधराव्या शतकापासून मध्यपूर्वेतील या क्रांतीची मुळे रुजायला सुरुवात झालेली होती. म्हणजे तुर्कांच्या हातात कॉन्स्टन्टिनोपॉल (आताचे इस्तंबूल) पडल्यापासून तेथे स्थापित झालेल्या ऑटोमान राजवटीने युरोपीय राजवटींना दणका दिला होता. परंतु त्यानंतरच्या चारशे वर्षांत युरोपियनांनी तंत्रज्ञान व शस्त्रास्त्र विकास तसेच ज्ञानप्रसारण यांच्या आधारे तुर्कांना नमवले. या काळात ब्रिटनने इजिप्त ताब्यात घेतले. इटलीने लिबिया तर फ्रान्सने अल्जेरिया व टयुनिशिया... हिंदुस्थानचे तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड कर्झन यांच्या काळात तल्लख बुद्धिमत्तेच्या टी. ई. लॉरेन्स याला उत्खनन शास्त्रातील तज्ज्ञ म्हणून अरेबियात पाठविण्यात आले. (इस्रायलच्या निर्मितीचे बीज याच मोहिमेत दडलेले होते.) तुर्कस्तान, फ्रान्स आणि ब्रिटन हे तिन्ही देश अरबस्तानचा ताबा घेण्यासाठी उत्सुक होते. तुर्कांना जर्मनांचा पाठिंबा होता, त्यामुळे त्यांची घोडदौड थांबवणे अरबांना शक्य नव्हते. पण ब्रिटिशांनी मुत्सद्दीपणा आणि धाडस यांच्या जोडीला शरीफ हुसेन इबन अली (आणि त्यांची चार मुले-अली, अब्दुल्ला, फैजल आणि झैद) यांच्या मदतीने लॉरेन्सने पौर्णिमेच्या रात्री अकाबा वाळवंट पार करून दमास्कस (सीरिया) गाठले. नकाशावर एक रेघ ओढून पर्शियाचे इराण आणि इराक असे दोन तुकडे करून टाकले (१९१७). तेव्हापासून सौदी अरेबियाचे प्रभुत्व जे अरबस्तानवर आहे ते आजपर्यंत... त्यात भर पडली ती इस्रायल नावाच्या नव्या देशाची... अमेरिका, इंग्लंड, इस्रायल आणि छुप्या मार्गाने सौदी अरेबिया यांनी अरबस्तानवरचा आणि पर्यायाने भूगर्भातील तेलावरचा ताबा आजतागायत कायम ठेवला आहे. त्यानंतर इजिप्त जगाच्या नजरेत आले, ते गमाल अब्दुल नासेर यांच्या काळात. १९५२ मध्ये इजिप्तमध्ये क्रांती घडवून इजिप्तची राजेशाही राजवट नासेरने संपुष्टात आणली. शेवटी इस्रायलने 'सिक्स डेज वॉर'मध्ये नासेरचा पराभव केला. त्यानंतर मोहम्मद अल सादात या नासेरच्या शिष्याने १९७ ते १९८१ या कालावधीतच इजिप्तमध्ये नवे विचार रुजवण्याचा प्रयत्न केला. सतत तीन युद्धांमध्ये इजिप्तचा इस्रायलकडून दारुण पराभव होत होता. परंतु १९७३ साली झालेल्या 'योम किप्पुर' युद्धात इजिप्तचा विजय (?) झाला. त्यानंतर त्याने इजिप्त-इस्रायल शांतता करार घडवून आणला. त्याबद्दल त्याला शांततेचे नोबेल पारितोषिकही मिळाले. परंतु हा करार अधिकतर इस्रायलच्या बाजूनेच असल्याचे अरबांना वाटल्यामुळे फितुरीची शिक्षा म्हणून सैनिकी संचलनाच्या वेळी सादातला गोळ्या घालून ठार मारण्यात आले. सत्ता होस्नी मुबारक यांच्या हाती आली. ती तब्बल तीस वर्षे टिकली.
  त्या काळामध्ये अमेरिका-इस्रायल ही लॉबी खूपच ताकदवान बनत गेली. सौदी अरेबियानेही जगाच्या राजकारणात खोलवर पाय रोवले. मध्यपूर्वेतील सगळे देश आपल्या टाचेखाली घेतले. पण याविरुद्ध पहिला आवाज उठवला तो सद्दाम हुसेन या इराकच्या लष्करशहाने... त्याने कुवेतवर हल्ला केला. हे कारण काढून अमेरिकेने सद्दामचा नि:पात केला. अमेरिकेच्या उदारमतवादी धोरणाचा अतिरेक झाला आहे, असे वाटून इस्लामिक धर्मगुरू खोमेनी यांनी इराणवर सत्ता मिळवून इराणचे इस्लामीकरण करून टाकले. न्यूयॉर्कवरील हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला चढवला.

  हे सदर दर पंधरवड्याला प्रसिद्ध होईल

Trending