आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगणं अभिमानाचं....

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माझे आईबाबा एका मध्यमवर्गीय सर्वसामान्य महाराष्ट्रीय कुटुंबातले. माझा जन्म महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातल्या एका लहानशा गावात झाला. घरात मी, आई, बाबा आणि मोठा भाऊ असं लहानसं कुटुंब. घरात मी सर्वांत लहान, म्हणून माझे खूप लाड झाले. माझं पहिली ते सातवीपर्यंतचं शिक्षण आमच्या गावातच झालं. आठवी ते दहावीचं शिक्षण गावापासून दूर असलेल्या एका शाळेत झालं. शाळेत मित्रांमध्ये टिंगल, मस्करी करणं, अश्लील बोलणं, सेक्सबद्दल बोलणं असं बरंच काही चालायचं. दहावीनंतर अकरावीला सायन्सला अ‍ॅडमिशन घेण्याचं ठरवलं, पण आता मात्र माझ्या जीवनाचं चित्र पूर्वीसारखं साधं-सोपं नव्हतं. आता मी माझ्या किशोरावस्थेत होतो. माझ्या लैंगिक भावना मोठ्या प्रमाणात डोकं वर काढू पाहत होत्या. माझे सर्व मित्र भिन्नलिंगी लैंगिक कलाचे असल्यामुळे ते नेहमी मुलींची अश्लील वर्णनं करायचे, पण मला मात्र तसं काही वाटतच नव्हतं. उलट मला पुरुषांबद्दल आकर्षण जाणवत होतं. असं का? माझा स्वत:शीच लढा चालू झाला. या कारणामुळे मी खूप कमी मार्कांनी बारावी पास झालो.
त्यानंतर मी बीसीएसला अ‍ॅडमिशन घेतली. कॉलेजला असताना मला माझ्या वयाच्या मुलांबद्दल विलक्षण लैंगिक आकर्षण वाटायचं. ती भावना माझ्या मनात एवढी प्रखर होती की, माझं कशातच लक्ष लागत नव्हतं. मी माझ्या या भावनांविषयी कुणाशी बोलूही शकत नव्हतो. मित्रांपाशी बोलायचं म्हटलं तर मनात भीती होती की, ते आपली टिंगल करतील. मला अनेकदा वाटायचं की, मला एक आजार/रोग झाला आहे, त्यामुळे मी रोज सकाळ-संध्याकाळ देवाला प्रार्थना करायचो, ‘देवा मला बरं कर, देवा मला बरं कर.’ पण तेव्हा मला हे माहीत नव्हतं, की जो आजार/ रोग नाही; त्याला देव तरी काय करणार!
पुढील शिक्षणासाठी पुण्यात आलो. पुण्यात आल्यावर बघता बघता सारं आयुष्य बदलून गेलं. पुण्यात आल्यानंतर मी हॉस्पिटॅलिटीचा एक पार्ट-टाइम कोर्स जॉइन केला, कारण मला हॉस्पिटॅलिटीची आवड होती. सुरुवातीला मला नवीन शहरात जमवून घेणं खूप कठीण गेलं. कारण इथली संस्कृती व गावातली संस्कृती, यात खूप फरक होता. एकेदिवशी माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये समलिंगी संबंधांबद्दल आमच्या एका ट्रेनरनं चर्चा सुरू केली. त्या वेळी आम्ही अभ्यासाचा एक भाग म्हणून अमेरिकेच्या संस्कृतीचा अभ्यास करत होतो. ज्या क्षणी माझ्या ट्रेनरनं याविषयी बोलणं सुरू केलं, त्या क्षणी माझ्या हृदयाचे ठोके नेहमीपेक्षा जास्त गतीने पडू लागले. त्या वेळी ते समलिंगी संबंधांबद्दल जे वर्णन करत होते, तीच भावना माझ्या मनात गेल्या अनेक वर्षांपासून मी दाबून ठेवली होती. त्यामुळे आणखीच दडपण वाढलं. कारण समलिंगी संबंधांबद्दल मी पहिल्यांदाच ऐकत होतो. तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा दिवस. त्या दिवशी क्लासमध्ये सांगितलं ते सर्व एका कागदावर नोट््सच्या स्वरूपात लिहून घेतलं. लगेच एका क्षणाचाही विलंब न करता, पुढच्या लेक्चरचा विचार न करता तिथून पसार झालो व दुस-याच क्षणी जवळ असलेल्या एका सायबर कॅफेत जाऊन बसलो.
पुढील संपूर्ण एक आठवडा माझं हेच काम की, कॅफेत जाऊन समलैंगिकतेबद्दल जास्तीत जास्त माहिती गोळा करणं.
पुढे याच प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात मला इंटरनेटवर माहिती मिळाली की, समलिंगी व्यक्तींची ‘चॅटरूम’ असते व मीही उत्सुकता म्हणून त्या ‘चॅटरूम’वर गेलो आणि बघतो तर काय, माझ्यासारखी समलिंगी असणारी बरीच मुलं तिथं मला ऑनलाइन भेटली. तेव्हापासून मला वाटतं, माझ्या आयुष्यानं एक वेगळं नि महत्त्वपूर्ण वळण घेतलं. मी त्या ‘चॅटरूम’मध्ये तासन्तास घालवू लागलो. ब-याच जणांशी लैंगिकतेबद्दल गप्पा मारल्या. यातूनच मला एक जिवाभावाचा व माझी खूप काळजी घेणारा माझ्या आयुष्यातील पहिला समलिंगी मित्र भेटला.
पुढे मला चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली. ही माझी पहिली नोकरी असल्यामुळे मनात खूप उत्साह होता, पण सोबत एक भीतीसुद्धा होती. मनावर एक दडपण होतं की, जर माझ्या ऑफिसमध्ये किंवा मित्रांना कळलं की, मी समलिंगी आहे तर काय होईल? नोकरी जाईल का? पण तसं काही घडलं नाही. मी नवीन जॉबला लागल्यावर खूप काही नवीन शिकण्यास मिळालं. एकेदिवशी माझी एका नवीन मित्राशी ओळख झाली. त्या ओळखीतून एक नवं विश्व समोर आलं. त्या विश्वात समलिंगींसाठी काम करणारी ‘समपथिक ट्रस्ट’ ही संस्था होती. या संस्थेत माझ्यासारखे अनेक समलिंगी पुरुष, ट्रान्सजेंडर, हिजडे नोकरी करत होते. योगायोग म्हणजे, संस्थेत नोकरी करणार का? अशी मला विचारणा झाली. कॉर्पोरेट सेक्टरची नोकरी सोडून एका संस्थेमध्ये नोकरी करावी का, हा माझ्यापुढचा कठीण प्रश्न होता. विचारांती मी समपथिक ट्रस्टमध्ये नोकरी करण्याचा निर्णय घेतला. त्यामागील एक महत्त्वाचं कारण म्हणजे, स्वत:ला समलिंगी म्हणून स्वीकारलं असलं तरी समलिंगी म्हणून जगासमोर अभिमानानं नोकरी करायचं माझं स्वप्न होतं. ते या निमित्ताने पूर्ण झालं. गेली तीन वर्षे मी या संस्थेत काम करतो आहे. एका प्रकल्पाचा मॅनेजर आहे. तीन महिन्यांपूर्वी मी माझ्या आई-वडिलांना मी ‘गे’ आहे, हे सांगितलं. त्याना खूप धक्का बसला, वाईट वाटलं. पण मग ते सावरले, म्हणाले, ‘तू आमचा मुलगा आहेस. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. तुला आम्ही कधीही दूर करणार नाही.’ माझे डोळे भरून आले. अजून देवाकडे काय मागायचं?