आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वजनाची भीती: किती खरी, किती खोटी !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वजन कोणी किती कमी करावे? कोणी करू नये? किती कमी केले पाहिजे? कसे केले पाहिजे? याला काही नियम आहेत. काही जन्मत:च, काही आनुवंशिकतेने तर काही प्रांतात उदा. पंजाबमध्ये स्थूल व्यक्ती दिसतात. हे सर्व प्रकार स्थूल प्रकृती म्हणून नैसर्गिक आहेतच. विशेष त्रास नसताना वजन कमी करण्याचे प्रयत्न करू नयेत. अशा व्यक्तींचे वजनही कमी होत नाही. उलट हसे होते. निसर्गात कधी कृ श हत्ती पाहिलाय काय किंवा स्थूल शेळी आढळते काय? जर हे नैसर्गिक असेल तर त्याच्याविरुद्ध उपचार का करावा? खरे तर वजनाला काही नियम लावता येणार नाहीत. त्यात वैविध्यता आढळून येते तरीही काही लक्षणांवरून मात्र निश्चितच वजनाकडे लक्ष द्यावे लागते. चालताना दम लागणे, फार घाम येणे, उत्साह नष्ट होणे, गुडघे दुखणे, मासिक पाळीच्या तक्रारी जाणवणे ही लक्षणे जाणवतात. या वेळी मात्र वजन कमी करण्याचा प्रयत्न करावा.
रक्ताच्या कमतरतेमुळे विशेषत: स्त्रियांमध्ये चेह-यावर व शरीरावर सूज आढळते. त्यामुळे ती स्त्री स्थूल दिसू लागते. त्यांनी वजन कमी करण्याचे प्रयत्न न करता रक्तवाढीकडे लक्ष द्यावे. पचन सुधारून रक्त वाढले की सूज ओसरते. आपोआपच वजन कमी होते. तरुण मुलींनी वजनासाठी उंची व वजन यांचा ताळमेळ घालून गरज असेल तरच वजन कमी करावे, अन्यथा कमी आहार घेतल्याने थकवा, चक्कर येणे, पाळीच्या तक्रारी उद्भवतात.
चाळिशीच्या आसपास स्त्रियात गर्भाशयाचे आजार किंवा गर्भाशय काढल्यावर साधारणत: नंतरच्या वर्षभरात 10 ते 15 किलो वजन वाढलेले दिसते. अशा वेळी वजन योग्य प्रकारे कमी केले नाही तर हाडांची झीज वाढून मणक्यांचे आजार संभवतात.
थायरॉइड्समध्ये वजन झपाट्याने वाढते. यावर योग्य औषधी व व्यायामाने वजन कमी करावे औषधी न घेता केवळ व्यायामानेसुद्धा त्रास होऊ शकतो.
पित्त प्रकृतीच्या स्थूल व्यक्ती वजन कमी करण्यासाठी तहानभूक मारत असतील तर त्यांना त्रास होऊन नको ते आजार मागे लागतील.
मिठाचे पदार्थ, गोड पदार्थ याने वजन वाढते. या वेळी वजन कमी करावे, परंतु पूर्णत: काही घ्यायचेच नाही असे करणे चुकीचे आहे. हायपोग्लासेमिया (शर्करेची कमतरता) भासल्यास त्यांचा वापरही आवश्यक ठरतो. व्यायाम व सकाळी फिरणे महत्त्वाचे आहे. याचा अतिरेक त्रासदायक ठरतो.
दिवसा जेवण करून झोपल्याने वजन वाढते. यामुळे रात्री जागरण वा दिवसा झोपणे आरोग्यास हानिकारक ठरते. बालपणीचा काळ वाढीच्या दृष्टीने आवश्यक व वृद्धापकाळी झीज होऊ न देणे आवश्यक असल्याने या दोघांनी वजनाचा बागुलबुवा करू नये. वजन विशिष्ट मर्यादेतच कमी करावे, अन्यथा हाडांची झीज, रक्तदाब कमी होणे, रक्ताची कमतरता इथपासून बरेच आजार होतात.
वजन हळूहळू वाढत गेलेले असताना ते घटवताना तोच क्रम ठेवावा. लवकर जास्त वजन कमी करण्यासाठी अनैसर्गिक गोष्टी केल्यास त्याचा त्रास होतो. ते वजन झपाट्याने परत वाढते. (उदा. उपासमार करणे किंवा डाएटिंगचा अतिरेक) गर्भारपणी वजन वाढणे बाळाच्या वाढीस आवश्यक असते. त्या वेळी वजनाची भीती बाळगू नये. प्रसूतीनंतर ते पूर्ववत घटते. तज्ज्ञ व्यक्तीच्या सल्ल्याशिवाय, कुठेतरी वाचून किंवा ऐकून वजन कमी करणे घातक ठरू शकते.
शेवटी वजन किती कमी किंवा जास्त करावे, यापेक्षा काम करण्याचा उत्साह, शरीराचा हलकेपणा, योग्य वेळी भूक लागणे, योग्य वेळेस झोप, मन प्रसन्न असणे. निरोगी जीवन जगत असाल तर वजनाची भीती बाळगू नका. पण वजन वाढणार नाही याचीही काळजी घ्या.