आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विचारांचा साचा बदला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


स्त्रियांवर वर्षानुवर्षे जुन्या प्रथा- परंपरांचा प्रभाव आहे. त्यातून आलेल्या रूढींचा त्यांच्या मनावर जबरदस्त पगडा आहे. या सर्वांचा त्यांच्या कृतीवर आणि विचारपद्धतीवर परिणाम होणे स्वाभाविक आहे. म्हणूनच महिलांनी स्वत:च्या विचारांचा साचा बदलणं आवश्यक असल्याचा आग्रह ज्येष्ठ लेखिका सिसिलिया कार्व्हालो आजच्या स्त्रीला करतात. महिलांनी विचार करण्याची पद्धत बदलल्याशिवाय समाजाचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलणार नाही असंही त्यांना वाटतं.

विकास झाला, वाढ नाही प्रत्येक क्षेत्रातल्या स्त्रियांच्या समाधानकारक सहभागाला तिच्यावरच्या वाढत्या अत्याचारांचंही गालबोट लागलेलं आहे. आधुनिक स्त्रीविषयी बोलताना, तिच्याकडे पाहताना आजही पारंपरिकतेचा चष्मा चढवला जातो. महिलांना त्यात वावगं वाटत नाही, कारण त्यांची स्वत:विषयीची विचारसरणी अतिशय संकुचित आहे. आजची स्त्री फक्त आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झालीय. त्यामुळे महिलांचा विकास झाला असं म्हणता येणार नाही. त्यांची केवळ वाढ झालीय. घर, लग्न, नवरा, कुटुंब, प्रेम अशा ठरावीक विषयांभोवतीच तिच्या विचारांचं विश्व एकवटलं आहे. त्याच-त्याच मुद्द्यांभोवती ती सतत घुटमळते आहे. त्यामुळेच महिलांविषयक इतरांनी केलेल्या आणि स्वत: महिलांनी केलेल्या लिखाणामध्ये तोचतोचपणा जाणवतो.

जोडीला प्रसारमाध्यमे, चित्रपटातून स्त्रीचं भलतचं रूप दाखवलं जातंय. हे चित्र बदलण्यासाठी महिलांनी खूप शिकायला हवं. भरपूर वाचन करायला हवं. बाहेरचं जग पाहायला हवं. व्यावहारिक जगातले अनुभव घ्यायला हवे. कारण याशिवाय तिचं भावविश्व समृद्ध होणार नाही. आणि भावविश्व समृद्ध झाल्याशिवाय लिखाणात वैविध्य येणार नाही. चौकटीपलीकडच्या विषयांवरचं स्त्री साहित्य निर्माण होणार नाही. काळानुरूप बदलते स्त्रियांचे प्रश्न, त्यांच्या समस्यांचा व्यापक पातळीवर विचार व्हायला हवा. साहित्यक्षेत्रातील प्रस्थापित परंपरा मोडून नवे संदर्भ आणि मिथकं देण्याचं काम महिलांकडूनच होईल असा विश्वासही सिसिलिया यांना वाटतो.

माणूस म्हणून वागवा
देशात शेकडो वर्षांपूर्वी मातृसत्ताक पद्धती अस्तित्वात होती. आजच्या इतकी भौतिक समृद्धी त्या काळी नव्हती. मात्र स्त्री सुरक्षित होती. कारण तिचा माणूस म्हणून विचार केला जायचा. पण आता पुरुषातला पशू जागा झाल्याने पुरुषप्रधान संस्कृती असल्याची खात्री पटते. परिणामी दिल्लीसारख्या घटना घडताहेत. मात्र लोकलज्जेस्तव सहनशीलता कवटाळणा-या स्त्रिया अन्यायाला वाचा फोडण्यासाठी धीटपणे पुढे येत आहेत. दिल्लीतल्या घटनेनंतर झालेली निदर्शनं हे सकारात्मक फलित असल्याचंही सिसिलिया यांना वाटतं.

ज्येष्ठतेनुसार द्यावे अध्यक्षपद
साहित्य संमेलनावरून निर्माण होणा-या वादाबाबतही या वेळी सिसिलिया यांनी मत व्यक्त केलं. आजकाल भरवल्या जाणा-या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून लोकांना बौद्धिक मेजवानी मिळण्याऐवजी, चॅनलवाल्यांना 24 तास चघळायला विषय मिळतात. संमेलनाचं व्यासपीठ लेखकांऐवजी राजकारण्यांनीच भरलेलं असतं. संमेलनातील राजकीय प्रचार, अनावश्यक जातीय वाद, अवास्तव खर्च यापासून स्त्री साहित्यिक दूर राहणेच पसंत करतात. अशा गोष्टीत त्यांना रस नसतो. म्हणूनच आतापर्यंत केवळ चारच महिलांना साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्याची संधी मिळाली आहे. संमेलनाचं अध्यक्षपद ज्येष्ठतेनुसार देण्यात यावं असंहीं त्यांना वाटतं. ज्येष्ठतेचा निकष लावल्यास अरुणा ढेरे, शिरीष पै यांसारख्या महिला साहित्यिक संमेलनाचं अध्यक्षपद भूषवू शकतील.

vandana.dhaneshwar@gmail.com