आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकक्षण सांभाळण्‍याचा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माणसाचे जीवन षड्रिपूंनी ग्रस्त आहे. यातून सुटायचे म्हटले तरी सर्वांना ते शक्य होईलच असे नाही. आध्यात्मिक क्षेत्रात उंची गाठलेले महापुरुषदेखील अशा क्षणांना बळी पडतात, तेथे सामान्यांची काय कथा! आपण चुकलो हे कळते तेव्हा फार उशीर झालेला असतो. निसटलेला क्षण जीवन उद्ध्वस्त करून गेलेला असतो. तो क्षण सांभाळण्याचा असतो. ही कला ज्याला साधली तो आयुष्यात यशस्वी होतो.


विश्वामित्रासारखा राजर्षी मोहाच्या क्षणी मेनकेच्या सौंदर्यावर भाळतो व सारी तपश्चर्या वाया घालवतो. कामविकार हाच फक्त मोहाच्या क्षणाचे कारण होते असे नाही तर लोभ, मोह, मद म्हणजेच अहंकार आणि क्रोध हेही घसरणीचे क्षण आयुष्यात आणत असतात.


षड्रिपूच कशाला, जीवनात असे काही नैराश्याचे क्षण येतात की जीवन ढवळून निघतं आणि मनुष्य दु:खाच्या गर्तेत कोसळतो. तोच हा क्षण सांभाळायचा! दु:ख प्रत्येकाच्याच जीवनात येते. त्याची तीव्रता कमी-जास्त असते व जातकुळीही भिन्न असते. अशाच प्रसंगी पराकोटीची उद्विग्नता निर्माण होते व अनर्थ होणारी कृती माणूस करून बसतो, तोच खरा क्षण सांभाळण्याचा.


उमाबार्इंच्या मुलीने स्वत:चं लग्न स्वत:च जमवलं, आंधळ्या प्रेमाने जोडीदार निवडला. उमाबार्इंना खूप राग आला. त्यांनी तिच्यावर हातही उचलला. परिणामी लेक घरातून पळून गेली. तिच्या आयुष्याचे वाटोळेच झाले. उमाबार्इंनी तो रागाचा क्षण सांभाळायला हवा होता. गोडीगुलाबीने तिला समजावून, पटवून द्यायला हवे होते. कदाचित तिची समजूत पटली असती. पुढील होणारी अधोगती टाळता आली असती.
कमी गुण मिळाले म्हणन मुलांना रागावणारे पालक आपण नेहमीच पाहतो. अर्धवट समजण्याच्या वयातील ही मुले घरातून निघून जातात, आत्महत्या करतात, व्यसनाच्या आधीन जातात, असे काहीही घडू शकते. सर्वांची बुद्धी समान नसते याचा विचार करायला हवा, तो क्षण सांभाळायला हवा पालकांनी.
श्यामलाबाई मैत्रिणींबरोबर सराफाच्या दुकानात गेल्या. त्या शांत, समंजस, सोज्वळ होत्या. पण लोभाच्या क्षणाला बळी पडल्या व एक नेकलेस पिशवीत टाकला. पकडल्या गेल्या, मानहानी झाली. समाजात तोंड दाखवायला खूप लाज वाटू लागली. परिणामी त्यांना खूप नैराश्य आलं, त्यांच्याबरोबर सा-या घराचेही आयुष्य उद््ध्वस्त झाले. एकच क्षण सारे सुख हिरावून गेला. पुष्कळशा आत्महत्यांमागे अथवा खुनासारख्या गुन्ह्यांमागे असेच घसरलेले क्षण कारणीभूत असतात.
लीलातार्इंचा मुलगा खूप हुशार पण राहणे खेड्यात. त्यामुळे त्याला शिक्षणासाठी काकाकडे ठेवावे लागले. तिथे त्याला अजिबात आवडेना. लीलाताई भेटायला गेल्या तेव्हा खूप रडला. मी घरीच येतो म्हणायला लागला. लीलातार्इंनाही क्षणभर तसेच वाटले, पण तो क्षण त्यांनी सांभाळला. त्या म्हणाल्या, ‘‘हे बघ बाळा, मी तुला माझ्याबरोबर नेणार नाही. हवे तर तू उद्या परत ये, पण आंधळ्या प्रेमाने मी तुझ्या शिक्षणाच्या आड आले तर मला ते आवडणार नाही.’’ त्या एकट्याच निघून गेल्या. रात्री विचार करून बाळूही सावरला. आज तो प्रथितयश डॉक्टर आहे. तो अतिप्रेमाचा क्षण जर त्यांनी सांभाळला नसता तर आज बाळू शेतमजूर म्हणून काम करत असता.
थोडक्यात काय तर असे क्षण सांभाळावेच लागतात. नाहीतर अत्यंत दु:खद परिस्थितीला तोंड द्यावे लागते.