आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंबाची वीण घट्ट करा...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संपर्क स्वस्त झाला, संवाद महाग आहे
जग जवळ आले, नाते लांब आहे
मोबाइल स्वस्त झाला, भाकरी महाग आहे
जगणे नाही स्वस्त, मरणेही महाग आहे
कोसळे मूल्यव्यवस्था, कोणास जाग आहे ?
मूल्यव्यवस्थेची आयुष्यभराची कार्यशाळा म्हणून आपल्या कुटुंबव्यवस्थेकडे पाहिले जाते. आपल्या कुटुंबव्यवस्थेत ती ताकद आहे. पण आपण ती ओळखली आहे का? कुटुंबव्यवस्था डळमळीत होत आहे, म्हणून मूल्यव्यवस्था डळमळीत होत आहे आणि म्हणून एकंदरीत आपलं जगणं दिवसेंदिवस अस्थिर होत चाललंय का?
आजच्या कुटुंबव्यवस्थेतल्या प्रत्येक घटकाला समस्यांनी ग्रासले आहे. मुलांना आईवडिलांकडून पुरेसा वेळ मिळत नाही. पती-पत्नींना एकमेकांशी हितगुज करायला सवड नाही. मग आजीआजोबांशी बोलायला कुणाला सवड मिळते? त्यांचे सगळे नाते टीव्हीच्या पडद्यावरच्या पात्रांशीच त्यांना जडवून घ्यावे लागते.
मुलांच्या हातात जवळपास जन्मत:च आता मोबाइल आणि कॉम्प्युटर गेम्स पडलेले असतात. अस्वस्थ आईवडील मोबाइलवरून सतत कुणाच्या तरी संपर्कात असतात. पण या गोजिरवाण्या घरात एकमेकांशी किती संपर्क असतो? वादविवाद झाले तर ते टीव्हीचा रिमोट कंट्रोल कुणाच्या हातात असावा यावरूनही होऊ शकतात.
आपलं नाव कसंबसं सांगू शकणारा मुलगा इमोशनल ब्लॅकमेल करून आईवडील, आजीआजोबांकडून जाहिरातीत दिसणा-या खाद्यपदार्थासाठी खंडणी वसूल करतो आणि ती त्याला मोठ्या कौतुकाने दिली जाते. हा म्हातारपणी आईबाबांकडून किती वसुली करील असा प्रश्न पडतो, त्यांना सांभाळण्याची गोष्ट तर दूरच राहिली.
आजच्या कुटुंबव्यवस्थेवर परिणाम करणारे घटक कोण कोणते?
1. बालक-पालक/ मालक/ सहचर भूमिका व निर्णयविषयक समस्या 2. कुटुंबातील घटकांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच ते अतिरेक हा प्रवास 3. श्रमविभागणी, श्रमप्रतिष्ठा आणि कुटुंबव्यवस्था 4. कुटुंबाचे अर्थकारण 5. चंगळवाद/उपभोगवाद/जाहिरातबाजीचे कुटुंबव्यवस्थेवर होणारे दुष्परिणाम 6. कुटुंबातील स्त्रियांचे स्थान व त्यांच्या समस्या 7. कमावत्या पुरुषांच्या समस्या, शिक्षण, नोकरी, स्थानबदल यामुळे निर्माण होणा-या समस्या.
वरील प्रतिपादनावरून असा गैरसमज होण्याची शक्यता आहे की आपली कुटुंबव्यवस्था मोडकळीला आली आहे. पण आजच्या कुटुंबव्यवस्थेत काही सकारात्मक बदलही झाले आहेत. त्यांचाही विचार व्हायला हवा.
स्त्रियांचे आर्थिक निर्णयविषयक स्वातंत्र्य व त्यांना मिळणा-या संधीत खूपच चांगले बदल झाले आहेत. आजच्या नव्या पिढीच्या उत्कर्षासाठी त्यांचे आईबाप जिवाचे रान करत आहेत. आपल्या मुलांच्या व सुनांच्या निर्णय स्वातंत्र्याचा आजीआजोबा आदर करीत आहेत. त्यांच्यासाठी बेबी सीटिंग करण्यासाठी प्रसंगी परदेशीही जात आहेत. आपल्या आईवडिलांवर पडणारा ताण हलका व्हावा म्हणून त्यांच्याशी लहान वयातच संवाद साधणारी तरुण पिढी आसपास आहे.
परिघाच्या भाषेत विचार करावयाचा झाला तर एकाच छपराखाली राहणारेआपले रक्ताचे नातेवाईक हा पहिला परीघ. त्यानंतर आपल्या नात्यातले पण आपल्या सोबत न राहणारे नातेवाईक यांचे वर्तुळ. आपल्या आसपास राहणारे आपले सख्खे अणि पक्के शेजारी यांचेही एक कुटुंब बनते. आपल्या कामाच्या जागी दररोज किमान आठ तास आपण एकत्र असतो. त्या सहका-यांचेही एक कुटुंब बनते. अशाच रीतीने आपले गाव, आपला देश व आपले विश्व यांच्या कुटुंबाचे आपण एक सदस्य असतो आणि त्या त्या परिघात सक्रिय राहून आपल्याला परिस्थितीनुरूप एक सक्रिय भूमिका पार पाडावयाची असते. त्यासाठी या विविध भूमिका निभावण्यासाठी आपली रास्त तयारी आपल्या मूळ कुटुंबातूनच करायला हवी.
आपल्या कुटुंबव्यवस्थेत जबाबदार लोकशाही असावी. वयानुरूप, अनुभवानुरूप त्यात बदलती भूमिका घेण्याची आपली तयारी असावी. म्हणजे बालकांचे पालकत्व स्वीकारणा-या आईवडिलांनी वृद्धावस्थेत आपले पालकत्व व आपल्या जबाबदा-या आपल्या मुलांकडे/ मुलींकडे नि:संकोचपणे सोपवाव्या. त्या अर्थाने आपण दुहेरी पालकत्व स्वीकारण्याची तयारी ठेवावी.
मुले मोठी होत गेल्यावर त्यांच्यावर आपल्या पालकत्वाचं ओझं त्यांना वाटणार नाही अशी आपली वागणूक असावी. आपल्या आईवडिलांना वयस्कपणी आपला आधार वाटेल यासाठी आपण त्यांचे पालकत्व स्वीकारावे. त्यांना हे मान्य करण्यासाठी राजी करावे.
वाढत्या आयुर्मानामुळे एकाच कुटुंबात चार चार पिढ्या नांदण्याचे दिवसही आता दूर नाहीत. अशा परिस्थितीतील नातवंडांना एकाच वेळी आजी, आजोबा आणि आई, वडील या दोघांच्या पालकत्वाच्या भूमिकेत शिरावे लागेल. तो दिवस दूर नाही. त्यासाठी आपल्या पुढच्या पिढीला तयार करण्याची जबाबदारी आपल्यावरच आहे. ज्या कुटुंबात उत्तम संस्कार होतात ते त्यांची सामाजिक कुटुंबातील जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडतात. मग ती बाब निवडणुकीत मतदानाची असेल, पाणी, वीज वाचवण्याची असेल, सार्वजनिक नीतिनियम पाळण्याची असेल किंवा संकटसमयी धावून जाण्याची असेल.
हे सगळं अशक्य कोटीतील व स्वप्नवत वाटतंय ना? रोज येणा-या आत्महत्यांच्या, ऑनर किलिंगच्या, दंगलीच्या, भ्रष्टाचाराच्या बातम्या वाचून जेव्हा अस्वस्थ व्हायला होतं, तेव्हा आपल्या कुटुंबाची उसवत जाणारी वीण घट्ट करण्याचा प्रयत्न सर्वांनाच करावा लागेल. कारण आपल्या कुटुंबव्यवस्थेतच आपल्याला पडणा-या असंख्य प्रश्नांची उत्तरे दडलेली आहेत.