आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंबाखू सेवनामुळे वाढतोय उच्चरक्तदाबाचा धोका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तरुणांच्या हृदयाची स्पंदनं कितपत निरोगी आहेत हे कदाचित त्यांना सांगता येणार नाही. आजच्या स्पर्धात्मक काळात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी चाललेला आटापिटा तरुणाईच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करणारा आहे, हे आपण सगळ्यांनीच आणि खासकरून तरुणांनी लक्षात घेतले पाहिजे. कोणत्याही शारीरिक व्याधीपेक्षा त्याच्यामध्ये हायपरटेन्शन म्हणजेच उच्चरक्तदाब मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. त्यातही तरुणांमध्ये वाढते तंबाखूसेवन किंवा धूम्रपान किती हानिकारक ठरत असल्याची माहिती डॉ.संतोषकुमार डोरा यांनी जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त दिली आहे.
डॉ. डोरा म्हणाले की, विविध अभ्यासांद्वारे प्राप्त झालेल्या सध्याच्या उपलब्ध आकडेवारीनुसार 20 ते 40 या वयोगटातील तरुण व्यक्तींमध्ये उच्चरक्तदाबाचा विकार होण्याचे प्रमाण 4 ते 20 टक्के इतके आहे. त्यात तंबाखूमिश्रित गोष्टींचे सेवन केल्याने हे प्रमाण अधिक वाढत आहे. तरुणवर्गाला आपले आरोग्य उत्तम असल्याची खात्री वाटत असल्याने वैद्यकीय तपासण्या वगैरे करून घेण्याचे प्रमाणही फार क्वचित असते. त्यामुळे बराच काळ हा विकार दुर्लक्षित राहून उच्चरक्तदाबावर दीर्घकाळ उपचार केले गेले नाही तर स्ट्रोक, मायोकार्डियल इन्फार्क्शन, रिनल फेल्युअर, इरेक्टाइल डिस्फंक्शन आणि आॅप्थल्मिक यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्याचे परिणाम विविध अवयवांवर होण्याची शक्यता टाळता येऊ शकत नाही.

एका अभ्यासातील निष्कर्षांनुसार उच्चरक्तदाब असलेल्या जवळजवळ एक तृतीयांश तरुण रुग्णांमध्ये हे विकार आढळत असल्याची माहिती डॉ. संतोषकुमार डोरा यांनी दिली आहे. ते मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये कन्सल्टंट कार्डिओलॉजी पदावर कार्यरत आहेत. पान, तंबाखू विक्रेत्या दुकानांवर ठळक अक्षरात 18 वर्षांखालील मुलांना धूम्रपान, मद्यसेवन करण्यास सक्त मनाई असली तरीही या पदार्थांचे सेवन करणाºयांत त्यांचा आकडासुद्धा वाढत आहे. सध्या लोकांमध्ये स्थूलपणा, व्यायामाचा अभाव, बैठ्या कामावर आधारित जीवनशैली, कॅलरीजचे भरपूर प्रमाण असलेला आहार, त्याशिवाय मानसिक ताण यासारख्या गोष्टींचे प्रमाण वाढत असल्याने भारतीय रुग्णांविषयी अभ्यास केला असता मिळालेल्या माहितीनुसार प्री-हायपरटेन्शन ही स्थिती 50 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या 80 टक्के तरुणांमध्ये आढळली.

हा आजार टाळण्यासाठी पुढे काही टप्पे दिलेले आहेत, जे तरुण व्यक्तींसाठी उपयोगी आहेत.

वजन कमी करणे
व्यक्तीचे वजन सामान्य श्रेणीनुसार असावे. तसेच बॉडी मास इंडेक्स 25 पेक्षा कमी असावा. बॉडी मास इंडेक्स म्हणजेच बीएमआय काढण्यासाठी वजनास (किलोग्रॅममध्ये) उंचीने (मीटरमधील उंचीचा वर्ग) भागण्यात येते.

आहार
रोजच्या आहारामध्ये फळे, भाज्या यांचे प्रमाण भरपूर असावे. तसेच चरबीयुक्त घटक आणि कॅलरीजचे प्रमाणही आहारामध्ये कमी असायला हवे. त्याशिवाय रोजच्या जेवणामध्ये 5 ग्रॅमपेक्षा अधिक मीठ खाऊ नये. मद्यसेवन करायचेच असेल तर ते खूप कमी असावे. प्रमाणित नियमांनुसार बिअर 12 औंसपेक्षा कमी, वाइन 5 आउन्सपेक्षा कमी आणि 80-प्रूफ स्पिरिट 1.5 औंसपेक्षा कमी घेणे अपेक्षित आहे.

व्यायाम
आठवड्यातील अधिकाधिक दिवस, रोज 30 ते 45 मिनिटे इतका वेळ एरोबिक्सचा व्यायाम करायला हवा.

मानसिक ताण
घर, कामाच्या ठिकाणीही मानसिक ताण कमीत कमी घेतला जाईल याकडे लक्ष द्यावे. धूम्रपान तर पूर्णपणे बंदच केले गेले पाहिजे.