Home »Magazine »Madhurima» Today At Home ?

अरे आज घरी ?

अदिजी मोघे | Feb 22, 2013, 08:01 AM IST

  • अरे आज घरी ?

परीक्षा कधी? मग दहावीनंतर काय करणार आता? मुलगा कुठे नोकरी करतो हो? मुलीचे दोनाचे चार कधी करताय? आम्ही कधीपासून वाट पाहतोय, गुड न्यूज कधी देणार? असे प्रश्न तुम्हाला अनेकदा विचारले गेले असतील. तुम्हीही अनेकदा प्रश्न विचारणा-याच्या भूमिकेत असाल. मला ह्या प्रश्नांची कायम गंमत वाटत आलीय.
माझे घर वसईला, आणि मी मुंबईत राहते माझ्या कामाच्या स्वरूपामुळे. मग वेळ असेल तसं वसईला जाणं होतं. मी जेव्हा अशी जायचे घरी तेव्हा तेव्हा आमच्या सोसायटीत राहणा-या एक काकू मला कायम विचारायच्या, ‘अरे, आज घरी?’ म्हणजे सोमवार, गुरुवार, रविवार कुठल्याही दिवशी मी त्यांना दिसले की त्या हाच प्रश्न विचारायच्या.
‘अरे, आज घरी?’

एक दहा-बारा वेळा सुरुवातीला मी सोडून दिलं. आणि नंतर पुन्हा कधीतरी त्यांनी विचारल्यावर मी वैतागून म्हणले, ‘माझंच आहे घर, मी नको असू का मग घरी?’ त्या गडबडल्या. मी पुढे माझ्या वाटेला लागले. मला खात्री आहे, ‘फारच आगाऊ आहे ही,’ असं त्या नक्की म्हणल्या असणारेत.

‘कसे आहात? मजेत असा, काळजी घ्या ’ ह्यापलीकडे मी माझ्या आईला कधीच कोणाला काहीही विचारताना ऐकलेले नाही. ती कायम म्हणते की माणसाकडे जेव्हा सांगायला असते तेव्हा तो आपणहून सांगतोच. ती स्पेस त्याला द्यायला हवी नं?

पण सलमान खानच्या आयुष्यात काय चालले आहे, सचिनने कशी आधीच रिटायरमेंट घ्यायला हवी होती, शेजारच्यांची मुलगी कसे कपडे घालते आणि पंतप्रधानांनी कसे निर्णय घेतले आहेत ह्याबद्दल आपली मतं असतात, त्यांच्या आयुष्यात ते काय करत आहेत, रादर काय चुकीचे करत आहेत, हे ऐकायला कदाचित खटकेल, पण जास्त इंटरेस्ट असतो आपल्याला. थोडासा विचार करून बघा आपला आपल्याशीच, कोणाची काही चांगली बातमी कळली तर होणारा आनंद जास्त असतो की वाटलेली असूया जास्त असते?

असे होते का तुमचे, की अनेक गोष्टी आपल्याला हव्या तशा होत नसतात आणि मग का माहीत नाही, आपण विचारलेल्या ‘काय चाललंय’चं उत्तर खूप छान मिळालं की आणखी थोडं अस्वस्थ व्हायला होतं? नि त्याच्या उलट कोणाचं तरी थोडेसं बिघडलंय, बिनसलंय हे कळल्यावर बरं वाटतं?

‘थ्री इडियट्स’मध्ये एक खूप छान आणि लक्षात राहणारं वाक्य होतं आर. माधवनच्या तोंडी, ‘उस दिन ह्यूमन बिहेविअर के बारे में हमे एक बात पता चली के अगर दोस्त फेल हो जाये तो बुरा लगता हे, लेकिन दोस्त अगर फर्स्ट आ जाये तो उससे भी बुरा लगता है.’

तसंच, दुस-याच्या आयुष्यातही फार काही बरं नाही घडतंय, हे ऐकल्यावर जास्त बरं वाटतं? घरोघरच्या मातीच्या चुली पडताळून पाहायला मग हे काय चाललंय? किती मिळाले? हवी तिथे मिळाली का अ‍ॅडमिशन? काय आहे हो पॅकेज? लग्न करणार कधी? असे प्रश्न फार सोयीचे पडतात.

कुठल्याही निमिताने जेव्हा आपण चार लोक एकत्र येतो, मग कामाच्या निमित्ताने असो किंव्हा सण, समारंभ असोत, विषय आपोआप मग कुठला तरी माणूस, कोणाचा तरी स्वभाव, कोणाचा तरी निर्णय ह्यावर घसरायला लागतो. गॉसिप असंच सुरू होतं. दुस-यांच्या आयुष्यात घडणा-या चांगल्या गोष्टींचा आनंद शेअर करणं आणि घडलेल्या वाईट गोष्टींबद्दल वाईट वाटणं ह्याच्या बरेच पुढे जातो आपण नकळत. आणि ‘जो जे वांछिल तो ते लाहो’ विसरतोच. काळजीपोटी केलेली चौकशी आणि अवाजवी उत्सुकता ह्यात कायम अंतर असतं आणि ते सांभाळायला हवं. कारण कधीतरी आपल्याही मनाविरुद्ध गोष्ट घडलेली असते, कधीतरी आपल्याकडे सांगायला काही खास नसतं. अशा वेळी कोणीतरी येऊन काय चाललंय तुमच्या आयुष्यात असं विचारलेलं नाही आवडत की आपल्यालासुद्धा! माणूस हा सामाजिक प्राणी आहे, चार लोक भेटणार, गप्पा होणार, विचारपूस होणार. पण कुठे थांबायचं हे कळलं की आपल्याला आपली स्पेस जपता यायला लागते आणि दुस-यांना देत यायला लागते.

aditimoghehere@gmail.com

Next Article

Recommended