आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Today Challenges Before The Classicness Of Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दर्जा मिळावाच मात्र सध्या भाषेची अभिजातता टिकवण्याचे आव्हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्याचे प्रयत्न चालू आहेत याचा आनंद वाटतो. अभिजात हा शब्द संस्कृतमधून मराठीत रूढ झाला आहे. अभिजात याचा अर्थ दर्जेदार, चांगल्या कुळात जन्मलेला असाही होतो. जी भाषा अभिजात असते ती शिष्टाचाराने युक्त असते. ती विनम्र, मधुर, सत्पात्र, सुंदर, रूपवान, विद्वान, पंडित, प्रसिद्ध अशी असते. संस्कृतच्या शब्दकोशात अभिजात शब्दाचे विस्तृत अर्थ आलेले आहेत. कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देताना ती भाषा व त्यातील दर्जा यांचा विचार व्हावा. याखेरीज भाषेची विदग्धता, गुणात्मकतेचाही विचार व्हावा. माउलींच्या अमृतानुभव ग्रंथात मराठीला अमृताते पैजा जिंकी.....असा उल्लेख आहे. विवेकसिंधू, संत नामदेव यांचे पंजाबापर्यंत पोहोचलेले मराठी शब्द यासह अनेक प्राचीन मराठी ग्रंथ मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठी पुरेसे आहेत. अध्यात्म व संतसाहित्याने मराठीला विशिष्ट असा दर्जा प्राप्त करून दिला आहे. मात्र, यासाठी पुरस्काराचे निकष लावू नये. भाषेबाबत विचार करताना त्याला जुने मानदंड लावू नयेत. कारण, भाषा ही प्रवाही असते. हिंदीत भाषेला बहता नीर म्हटले आहे. काळाबरोबर ती बदलत असते.

इतिहासातील बदलत्या राजवटींचे परिणामही भाषांवर होत असतात. मराठीत इंग्रजीबरोबरच, अरबी, फारसी, संस्कृतातील तत्सम व तद्भव शब्द आले, दाक्षिणात्य शब्दही आले. मीडियाचा भाषेवर होणारा परिणाम तुम्ही टाळू शकत नाही. सतत नवे शब्द हे येतच असतात. यामुळे भाषेचा स्तर कमी झाला, असे म्हणता येत नाही. ती बदलतच राहणार आहे, बदल हा भाषेचा स्थायीभाव आहे. प्रथम ना.सी.फडके, गदिमा, वि.स.खांडेकर नंतर शंकर पाटील, आनंद यादव यासह अनेक साहित्यिकांनी तत्कालीन भाषावैभवावर मोठाच प्रभाव टाकला. नव्या काळात भाषेवर आणखी नवा प्रभाव टाकणारे घटक निर्माण होऊ शकतात. तो प्रभाव लक्षात घेऊनही भाषेची अभिजातता टिकविणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे.

मुलाखत — अमोल अंकुलकर, सोलापूर