आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रश्‍न म्‍हणजे कटकट?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी डिस्लेक्सिया थेरपिस्ट आणि बालरोगतज्ज्ञ असल्यामुळे विविध शाळांमध्ये पालक शाळा, शिक्षकांचे प्रशिक्षण आणि मुलांचे वर्कशॉप्स घेण्यासाठी नेहमीच बोलावणे येते. असाच एका अत्यंत नामांकित शाळेत जाण्याचा योग आला. त्या शाळेत हुशार विद्यार्थी निवडून 20-25 मुलांचा खास वर्ग केला होता. मला तिसरी व चौथीच्या मुलांशी बोलायचे होते. त्यांच्याबरोबर आलेला मजेशीर अनुभव मुद्दाम येथे सांगावासा वाटतो.
ती मुले अत्यंत शिस्तबद्ध व चुणचुणीत होती. त्यांनी गेल्या गेल्या माझे नाव, मी कोण, कशासाठी आले विचारण्यास (अर्थात इंग्रजीतूनच!) सुरुवात केली. मग त्यांच्यातील एक मुलगी सर्वांना हाताने शांत बसण्यास सांगून पुढे आली. तिने मला बायोडेटा देण्याची विनंती केली. तो तिने सर्वांना स्वत:च्या शब्दांत सांगितला.
दुस-या एका शाळेत मुलांची शारीरिक तपासणी करताना एका दुसरीच्या वर्गातील पाच-सात मुले एका मुलाला घेऊन माझ्याकडे आली. तो स्पेशल, मेंटली चॅलेंज्ड मुलगा होता. ती सर्व मुले त्याची मनापासून काळजी घेत होती.
1984मध्ये मी नवीन प्रॅक्टिस सुरू केली तेव्हाच्या मुलांपेक्षा आजची पिढी अत्यंत हुशार, हजरजबाबी, दक्ष आहे. भीती, रडणे यापेक्षा जिज्ञासा, कुतूहल, निर्णयक्षमता असे गुण मुलांमध्ये दिसून येतात.
आताची बुद्धिमान मुले मोठी करणे हे पालकांपुढे एक मोठे आव्हानच आहे. हीच मुले सर्वत्र अशीच धिटाईने बिनधास्त वागत असतात. असेच एक पालक माझ्याकडे मुलाच्या खूपशा तक्रारी घेऊन आले होते. त्यातील महत्त्वाची तक्रार म्हणजे, तो पालकांना प्रश्न विचारून भंडावून सोडतो. आईबाबांना एखादी गोष्ट येत नाही हे पकडून त्यांचा अपमान करतो, अशी त्यांची तक्रार होती. त्यांचा संवाद आपण पाहू -
बाब : डॉक्टर, अमोलने आमचे जगणे नकोसे केले आहे.
आई : तो कोणासमोरही असे काही बोलतो की आमचे अगदी नाक कापून टाकतो.
बाबा : मला त्याने विचारले, तू मेकॅनिकल इंजिनिअर आहेस तर पटकन हा मेकॅनो जोडून दाखव. माझे सर्व मित्र बसलेले होते. त्यांच्यासमोर माझी उडवत होता. मला येत नाही पाहिल्यावर त्याने ते सर्वांना जोडून दाखवले.
आई : अगदी खोटारडा पण आहे बरं का तो. त्याच्याशी बुद्धिबळ, पत्ते, कॅरम खेळताना चीटिंग करतो.
बाब : कटकट नको म्हणून जरा शांतता मिळेल या विचाराने टीव्ही लावला, तर हा दोन मिनिटं काही शांततेने तेथे बसत नाही. सारखा तबला वाजवू दे म्हणतो. अगदी डोके दुखायला लागते.
हा अमोल आहे मात्र आठ वर्षांचा.
आता अजून एका राजीवची कहाणी पाहू.
बाबा : राजीव सारखा जोक्स करून वैताग देतो.
आई : या मुलाला कशाचा सिरियसनेस नाही. आठवीत गेला. आता अभ्यास वाढला. त्याला जरा स्विमिंग बंद कर म्हटले तर ऐकत नाही.
बाबा : आता मोठ्या वर्गांमध्ये अभ्यास जास्त करायला हवा. हा खुशाल सारखा स्पर्धांमध्ये भाग घेत राहतो आणि वेळ वाया घालवतो. आठवीत असे, तर दहावीत काय होईल! मला तर वाटते तो नापासच होईल. अगदी नाकच कापणार असे दिसते.
आता अमोल आणि राजीव ही दोन्ही मुले खूपच हुशार आहेत. मुलांकडून हरणे हा अपमान नाहीच मुळी. मुलांशी खेळताना त्यांना जिंकू दिले तरच त्यात मजा! दुसरे म्हणजे अमोलला आपल्या वडिलांचे शिक्षण या छोट्या वयात माहीत आहे ही किती कौतुकाची गोष्ट आहे.
त्यापेक्षा सर्वात गंभीर गोष्ट म्हणजे पालक मुलाच्या बुद्धिमान प्रश्नांना कटकट समजून ते प्रश्न टाळतात. त्याचा त्रास वाटून घेतात. त्याहीपुढे जाऊन त्यातून सुटका म्हणून टीव्हीचा वापर करतात.
इतक्या बुद्धिमान मुलांना तेवढेच बुद्धीला पोषक काम देणेही महत्त्वाचे आहे. या केसमध्ये तो मुलगा टीव्ही पाहायला तयार नसताना पालक बळेच त्रास नको म्हणून टीव्ही पाहण्यास सांगतात. यात धोका असा आहे, की त्या मुलाला टीव्हीचे व्यसन जडायला वेळ लागणार नाही. खरे तर विविध खेळ, तबला हे त्याला आवडते आणि येते यासाठी पालकांनी अभिमान बाळगला पाहिजे.
राजीवच्या केसमध्ये तो पोहायला जातो ही चांगलीच गोष्ट आहे. मोठ्या वर्गात गेल्यावर खूप पालक खेळ पूर्ण बंद करायला लावतात. या उलट मैदानी खेळ किंवा पोहणे हे एकाग्रता वाढवण्यासाठी उपयुक्तच आहे. टीव्ही पाहण्यापेक्षा कैक पटीने उत्तम आहे.
बुद्धिमान मुलांची बुद्धिमत्ता ओळखून पालकांनी त्यांच्याशी वागायला हवे. मिश्कील मुलांचा तिरस्कार करण्यापेक्षा त्यांच्या विनोदबुद्धीची दाद द्यायला हवी. अभ्यास चांगला होण्यासाठी त्यांच्या खेळालाही परवानगी आणि पोषक वातावरण देणे गरजेचे आहे.