आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजची कविता बाह्यरूप दर्शवणारी

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दोन दशकातील जागतिकीकरण, उदारीकरण व खासगीकरण यामुळे माणसांच्या जगण्याचे गणित आमूलाग्र बदलले. उजळलेला इंडिया आणि काजळलेला भारत यामधील दरी दिवसेंदिवस रुंदावते आहे. संपर्काची साधने वाढली; पण माणसांच्या मनाचे रुंदीकरण झालेले नाही. त्यामुळे माणसे समीप असूनही दुरस्थ बनली. माणूस जसजसा प्रगत होत गेला तसतसा एकेकटा राहण्याची, स्वत:तच रमण्याची व्याधी मागे लावत गेला. त्यामुळे कालचा सामूहिक कृती करणारा माणूस सुटा-सुटा बनून स्वत:पुरता विचार करणारा, व स्वत:तच मग्न असणारा ‘आॅटिस्टिक’ बनला आहे. बेताच्या उत्पन्नातही परवा-परवापर्यंत सुखी व समाधानी वाटणारी माणसे आज आर्थिकदृष्ट्या भक्कम होऊनही एकेकटी झाल्याने अस्थिरता, अशांतता, व असुरक्षितता यांनी घेरलेली दिसतात. ‘अपना सपना मनी-मनी’ झाल्याने उपजीविका हेच आयुष्याचे एकमेव ध्येय मानून सकाळ-पासून संध्याकाळपर्यंत सिमेंट काँक्रिटच्या जंगलात धाप लागेपर्यंत धावणारे माणसांचे लोंढे अशांत, उद्विग्न आणि ताणग्रस्त वाटतात. त्यांच्या गळेकापू स्पर्धेतून उफाळणारा तीव्र मत्सर आणि अहंकार यांचा दर्प जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात दरवळतो आहे.
एका आकडेवारीनुसार जगातील 34 कोटी लोक नैराश्येने ग्रासलेले आहेत. म्हणजे आजचा आधुनिक माणूस एकीकडे बेफाम धावणाºया स्पर्धेतील घोड्याप्रमाणे बनून असताना, दुसरीकडे माहितीचं, नैराश्येचं, अहंकाराचं, ताणतणावाचं, आढ्यतेचं आणि मत्सराचं ओझं वाहणारा गाढव बनत चालला आहे. उजळलेल्या इंडियातील माणसाची अवस्था ही असताना काजळलेल्या माणसाची अवस्था ही असताना, काजळलेल्या भारतातील माणसाच्या जगण्यातील कुतरओढ तर फारच भयावह व जीवघेणी आहे.
1990 नंतर बदलेल्या कवितेच्या वळणाने माणसाच्या जगण्याचे हे पापुद्रे उलगडले आहेत का? या प्रश्नाच्या उत्तराचा शोध मला या निमित्ताने अपेक्षित आहे. नव्वदीनंतरची कविता जागतिकीकरणाचा वेध घेत असली तरी, तो वेध खूपसा पृष्ठस्तरीय आहे. माहिती, ज्ञान आणि शहाणीव या जाणिवेच्या टप्प्यातील पातळीवरचा आहे. साहित्य हे तळठावाचा वेध घेऊन शहाणीवेच्या पातळीवर पोहोचणारी असते. साहित्य हा समाजाचा आरसा असतो, असे विधान देखील खूप पृष्ठस्तरीय वाटते. आरसा केवळ बाह्यरूपाचे दर्शन घडवत असतो. साहित्य किंवा कविता इतकी वरवरची नसते. माणसाच्या जगण्याचे उभे आडवे अंतच्छेद घेऊन सूक्ष्मदर्शक यंत्राखाली न्याहाळण्याची प्रक्रिया साहित्यात किंवा कवितेत अपेक्षित असते. वेगवेगळ्या पातळ्यावर छेद घेऊन अंत:दर्शन घडवणाºया सी.टी स्कॅनसारखे साहित्याचे स्वरूप असते.
जागतिकीकरणामुळे घडलेल्या बदलांची जंत्री तयार करणारी आजची बहुसंख्य कविता आरशाप्रमाणे बाह्यदर्शन घडवणारी वरपांगी कविता आहे. त्यामुळे ती कवींची जागतिकीकरणाबाबतची भूमिका मांडणारी विधाने करते व घोषणाबाजी करून व्यासपीठावरून किंवा दिवाळी अंकांतून मिरवित चमकोगिरी करणारी कविता आहे. भूमिका रक्तांत मुरवून बाह्य वास्तवतेचे अनुभवांचे आंतरिकीकरण करणे व सार्थ शब्दांतून संयततेने व सूचक तेने अभिव्यक्त होणे या कवितेत फारसे आढळत नाही.
केवळ जागतिकीकरणातील परवलीचे शब्द किंवा उपयोजित संज्ञा पेरल्याने जागतिकीकरणावरची कविता होत नसते. कवितेतील सकस व सच्च्या अनुभवातून जागतिकीकरणाची प्रक्रिया व भूमिका श्वासासारखी सहज फुलावी लागते. जागतिकीकरणाने बदललेल्या वास्तवाचे पापुद्रे अलगद व हळूवारपणे उलगडणारी अशी कविता या कवितेच्या गदारोळात अभावानेच वाचायला मिळते. जागतिकीकरणाची कृत्रिम प्रावरण घालून विविध समारंभातून डामडौलाने मिरवणारी कविता मात्र सभोवारात विपुल वाढते आहे.