Home | Magazine | Madhurima | tonic-for-good-health

देहसाधना - उत्तम आरोग्याचे टॉनिक

डॉ. चारुलता रोजेकर, योगतज्ज्ञ, औरंगाबाद | Update - Jun 10, 2011, 01:18 PM IST

चांगले आरोग्य टिकविण्यासाठी ही ‘देहसाधना’ सातत्याने करायलाच हवी, नाही तर आपलेच शरीर आपल्याविरुद्ध बंड पुकारेल.

  • tonic-for-good-health

    एका ज्येष्ठ डॉक्टरच्या ‘ओपीडी’त बसले होते. नेहमीप्रमाणेच रुग्णांची गर्दी होती. डॉक्टरांचा योग थेरपीवर विश्वास होता. त्यामुळे विशिष्ट रुग्णांना आवश्यकतेनुसार ‘योग’ शिकविणे हे माझे काम मी करत होते. तेवढ्यात एक स्थूल बाई ‘डॉक्टर, गुडघे, कंबर फार दुखते, चालताना धाप लागते,’ अशी तक्रार घेऊन आल्या. वजन, रक्तदाब आणि इतर तपासण्या झाल्यावर डॉक्टर म्हणाले, ‘‘औषध घेऊ नका, फक्त वजन कमी करा. कमरेचे व्यायाम केले की दुखणं आटोक्यात येईल.’’ मला म्हणाले, ‘‘मॅडम, ह्यांना कंबरदुखी कमी होण्यासाठी योगासन शिकवा.’’
    मी त्यांना केबिनमध्ये नेले, पाठीवर झोपवले आणि कंबरदुखी कमी करण्याचा साधा व्यायाम शिकविला. त्याला योगासनात ‘द्विपाद उत्तानपादासन’ म्हणतात. माझी सूचना होती - पूर्ण श्वास सोडा, श्वास घेत घेत दोन्ही पाय जमिनीपासून ९० अंश कोनात वर उचला, थोडे थांबा, स्थिती टिकवा आणि मग श्वास सोडत पाय जमिनीवर टेकवा. मावशींना पाय वर उचलता येईना (तसा नवख्या माणसाला अवघड प्रकार) मग मी त्यांच्या पायांना आधार देत पाय वर उचलून दिले, पुन्हा जमिनीवर टेकवले, असे तीन वेळा करून दिले आणि सांगितले, अशी रोज तीन आवर्तने दोन वेळा घरी करा. बघा, पाच- सहा दिवसांत आराम पडेल. मावशी डॉक्टरांकडे आल्या आणि अगदी सहज बोलल्या, ‘‘घरी आपले पाय आपणच वर उचलायचे का?’’ मला आणि डॉक्टरांना हसू आवरता येईना. डॉक्टर मिश्कीलपणे म्हणाले, ‘‘एक गडी लावा पाय खाली-वर करायला. नाही तर आपला हक्काचा गडी (नवरा) आहेच की!’’ वाचकहो, हे आपल्या आरोग्याबाबतचे अज्ञान! आपले शरीर वाकवायचे, वळवयाचे, ताणायचे नाही हा गैरसमज काढून टाका. शरीरात हलकेपणा राहण्यासाठी शरीराची सुयोग्य हालचाल आवश्यक आहे. शरीराला न हलवल्यामुळे शरीरावर चरबीचे थर जमा होतातच; पण शरीराची लवचीकता कमी होते आणि लवचीकता कमी झाली की शरीरयंत्रणा बिघडते. संचलन व्यवस्थित होत नाही. दम, लागतो, धाप लागते, रक्तातील कोलेस्टेरॉल वाढते, रक्तात गुठळ्या तयार होतात. पर्यायी गुडघेदुखी, पाठदुखी, मानदुखी असे अनेक आजार वाढतात. व्यायाम-योगासने ही शरीरासाठी ‘टॉनिक’ आहेत. आपल्याला दिवसभर ज्या शरीर-मनाकडून काम करून घ्यायचे त्या शरीर-मनासाठी सकाळी द्यायचे उत्कृष्ट टॉनिक म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने स्नायू, संध्यांना ताण, दाब, पीळ देण्याची प्रक्रिया आणि मनाची स्थिरता येण्यासाठी करावे लागते दीर्घ श्वसन आणि प्राणायाम! चांगले आरोग्य टिकविण्यासाठी ही ‘देहसाधना’ सातत्याने करायलाच हवी, नाही तर आपलेच शरीर आपल्याविरुद्ध बंड पुकारेल.

Trending