आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Manisha Patole\'s Artical On Total Health Aid

संपूर्ण सशक्त आरोग्यसखी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूएकदा म्हणाले होते, एखाद्या राष्ट्राची ओळख त्यामधील स्त्रियांच्या स्थितीवरून लक्षात येते.उत्तरोत्तर टेक्नोसॅव्ही होत असलेल्या आपल्या देशामध्ये एका बाजूला महिला स्वत:च्या उत्कर्षासाठी धडपडत असताना दुसरीकडे मात्र ती अन्याय-अत्याचारांना बळी पडत आहे. अजूनही हुंड्यासाठी, संशयावरून, वासनापूर्तीसाठी तिचा सहजपणे मानसिक-शारीरिक छळ केला जातो, प्रसंगी हत्याही केली जाते. याशिवाय धर्मांध शक्तींचाही तिला दुर्बल करण्याचा कार्यक्रम अखंडपणे चालू असतो. अशा वेळी माझ्या कानांमध्ये ‘महिला सशक्तीकरण’ हा एक आणि एकच शब्द घुमत असतो.


उस्मानाबाद येथील ‘स्वयंशिक्षण प्रयोग’ नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेमार्फत चालणा-या आरोग्यविषयक प्रकल्पावर काम करताना प्रशिक्षण देण्यासाठी विदर्भातील वाशीम जिल्ह्यामध्ये जाण्याचा ब-याचदा योग आला. हेल्थ वर्कर अर्थात आरोग्यसखींसाठी असणारे हे प्रशिक्षण माझ्या दृष्टीने सहजसोपे होते; परंतु महिलांच्या दृष्टीने विचार केला तर ते अगदी नावीन्यपूर्ण होते. कारण या सर्व महिला ग्रामीण भागातील होत्या. कधीचीच लिहिण्या-वाचण्याची सवय मोडलेल्या आरोग्यसखींना आता केवळ अभ्यासच नाही, तर यंत्रेही हाताळायची होती.


प्रशिक्षणाअंती हे सर्व काही त्या आत्मसात करतील यावर पूर्ण विश्वास होता, परंतु त्यांच्यातील टप्प्याटप्प्याने होत गेलेला मानसिक-भावनिक बदल मलाच जणू एक प्रकारे सशक्त करत होता. बहुतांश आरोग्यसखी कमी शिकलेल्या, शेतमजूर, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील होत्या. जोडीला सांसारिक जबाबदा-या, घरातील अतिश्रमाची कामे होतीच. अशा प्रकारे जगण्याची लढाई लढत-लढत, वाहतुकीच्या समस्येवर मात करत भरपावसातही आरोग्यसखी वाशीम शहरातील कार्यालयात प्रशिक्षणासाठी वेळेवर येत होत्या. वीस दिवसांच्या या प्रशिक्षणत ज्ञानदान, प्रात्यक्षिकासोबतच मनोरंजक खेळ, सामाजिक संदेश देणारी आरोग्यविषयक गाणी यांचा समावेश असल्याने हळूहळू महिला शारीरिक, मानसिक व भावनिकदृष्ट्या खुलतही होत्या. त्याद्वारे अभ्यासाच्या ताणाचा निचरा होत असल्याने त्या ख-या अर्थाने सर्व काही विसरून स्वत:साठी थोडा वेळ का होईना जगत होत्या.


पूजाताई ही ऐन पंचविशीत विधवा झालेली तरुणी. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी धडपडणारी, प्रगल्भ, संयमी अशी आरोग्यसखी. तसेच मोठे कुटुंब, हातावरचे पोट असलेली, रोज मोलमजुरी केली तरच हातातोंडाची गाठ पडणार अशी परिस्थिती असलेली शाहिदाताई. त्यातच तिचा आंतरधर्मीय विवाह. अशा जटिल परिस्थितीत यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण करणारी शाहिदा मलाच अंतर्मुख करून गेली. याशिवाय नव-याने सोडलेली छायाताई, आपल्या मुलीसोबत हिमतीने एकटी राहणारी. प्रशिक्षणाच्या ‘अनुभवकथन’ सत्रामध्ये ढसाढसा रडली आणि ब-याच काळापासून रुतून बसलेल्या आपल्या दु:खांना तिने वाट करून दिली. मध्यमवयीन, हसतमुख असणारी नंदाताई, दोन मुलांची आई, दारूच्या नशेत नव-याने सहजपणे गळफास घेऊन आत्महत्या केली. मुले लहान असतानाच विधवा झालेली नंदाताई आज मानसिकदृष्ट्या सक्षमपणे समाजात उभी आहे.


प्रौढ देविकाताई, तरुण ललिता, कौटुंबिक ताणामुळे विचारशून्य झालेल्या. मात्र, प्रशिक्षणाच्या अखेरीस इतक्या बदलल्या की, मलाच त्यांनी प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करून सुखद धक्का दिला.
अशा एक ना अनेक आरोग्यसखींनी मलाच जणू जगण्याचे, प्रतिकूल परिस्थितीशी लढण्याचे प्रशिक्षण दिले. मग प्रश्न पडतो की, एकापाठोपाठ एक आत्महत्या करणारे शेतकरी ‘पुरुष’ मानसिकदृष्ट्या सबल की या आरोग्यसखी? किरकोळ कारणावरून आत्महत्या करणा-या, आपल्या लाडक्या लेकरांसकट इमारतीवरून उडी टाकणा-या आर्थिकदृष्ट्या सुस्थिर महिला मानसिकदृष्ट्या सबल की या माझ्या आरोग्यसखी? मानसिक स्थैर्यासाठी आधुनिक बुवा-महाराजांच्या सत्संगात गर्दी करणा-या सुशिक्षित महिला सशक्त की या आरोग्यसखी? माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वावरणा-या उच्चशिक्षित, आर्थिकदृष्ट्या सुसंपन्न, जीन्स घालणा-या, इंटरनेटवर गणपतीची आरती करणा-या तरुणी सशक्त की या साडीचोळीतल्या माझ्या आरोग्यसखी?


याची उत्तरे शोधताना महिला सशक्तीकरणासंदर्भात वाचनात आलेले एक विधान आठवते. ते म्हणजे ‘स्त्री सक्षमीकरण ही अशी एक संकल्पना आहे की, ज्यामध्ये स्त्रियांना त्यांच्या आवडीनुसार सामाजिक, आर्थिक व प्रजननाचे अधिकार दिले जातात व त्यातून त्यांचा दर्जा उंचावला जातो. तसेच लोकसंख्यावाढीस आळा घालून सर्वांगीण विकास साधला जातो.’
या विधानानुसार काही प्रमाणात का होईना महिला निश्चितच सक्षम होत आहेत; परंतु या चंगळवादी युगात शहरी आणि ग्रामीण भागातील महिलांचा तुलनात्मक विचार केल्यास आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक व मानसिक ताणतणाव असूनही संघर्षमय जीवन जगणा-या या आरोग्यसखी मला निश्चितच उजव्या वाटतात आणि म्हणूनच त्या ‘कम्प्लीट वुमेन’ आहेत, असे मनापासून वाटते.