आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलामत दतांग...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘तुम्ही मंडळी गोव्याला फिरायला जाता, तेव्हा वाटेत तुम्हाला रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी ठिकाणे लागतात. परंतु तुम्ही तिथे थांबत नाहीत, थेट गोव्याला जाऊन मौजमस्ती करता. आम्ही मात्र जरा वेगळा विचार करतो. आमच्या देशात पर्यटनाला येणार्‍यांसाठी दर 200 ते 300 कि.मी. अंतरावर आम्ही पर्यटन स्थळे विकसित केली आहेत, जेणेकरून सबंध देशच पर्यटनासाठी ओळखला जाईल. तुम्ही जेव्हा आमच्या देशात पोहोचाल, तेव्हा तुम्हाला याचा प्रत्यय येईलच...’ मलेशिया टुरिझम बोर्डाचे संचालक मनोहर यांचे हे वाक्य मनात घोळवत एअर मलेशियाच्या विमानात बसलो आणि अवाढव्य अशा क्वालालम्पूर विमानतळावर दाखल झालो. बाहेर पडतो न पडतो तोच धुरकंडलेल्या क्वालालम्पूर शहराने माझे स्वागत केले. सगळे जण तोंडाला मास्क लावून फिरत होते. इतके प्रदूषण असलेले शहर पाहून माझ्या चेहर्‍यावर प्रश्नांकित भाव उमटले. त्यावर मलेशियन टुरिझम बोर्डाचा गाईड जेफरी याने लगेच उत्तर दिले, ‘तिकडे इंडोनेशियाच्या जंगलात प्रचंड मोठी आग लागल्याने मलेशियाला गेल्या दोन दिवसांपासून या प्रदूषणयुक्त धुराचा त्रास होत आहे. परंतु तुम्ही काळजी करू नका, आमचे प्रशासन या बाबतीत सक्षम आहे.’ जेफरीच्या बोलण्यात आत्मविश्वास जाणवत होता...


संध्याकाळच्या आत जेफरीचे बोलणे खरे ठरले. आठ तासांच्या अवधीत सबंध मलेशियाने या प्रदूषणापासून मोकळा श्वास घ्यायला सुरुवात केली. त्याकरिता मलेशियाच्या सरकारने सबंध शहरात कृत्रिम पाऊस पाडला, तोही मिठाचा वापर करून. या रासायनिक प्रक्रियेमुळे धुरकांडलेल्या क्वालालम्पूर शहराचे पेट्रोनास हे जगातले सगळ्यात उंच जुळे मनोरे संधाकाळी पुन्हा लखलखू लागले. शहराला पुन्हा एकदा झळाळी प्राप्त झाली. दुबई फेस्टिव्हलच्या धर्तीवर मलेशियानेदेखील गेल्या काही वर्षांपासून ‘मेगा फाम फेस्टिव्हल’ आयोजित करायला सुरुवात केली आहे. याच फेस्टिव्हलच्या उद्घाटनासाठी मलेशिया टुरिझम बोर्डाने जगभरातील प्रसारमाध्यमांना आणि ट्रॅव्हल गाइड्सना आमंत्रित केले होते.


मलेशिया हा देश उत्तर-दक्षिण असाच लांबवर पसरलेला आहे. त्या मानाने देशाची पूर्व-पश्चिम रुंदी कमीच आहे. त्यामुळे या देशातला एक्स्प्रेस वे देशाच्या दक्षिण टोकापासून म्हणजे सिंगापूरपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या ‘जोहर बारू’पासून निघतो, तो थेट उत्तरेला 772 किलोमीटर अंतरावर पार थायलंडच्या सीमेपर्यंत असलेल्या ‘बुकिट कायू हितम’पर्यंत जातो. मलेशियाला ‘ट्रुली एशिया’ का म्हणतात, हे तिथे गेल्याशिवाय कळत नाही. तमाम पर्यटकांना आकर्षित करणार्‍या मलेशियात भारताप्रमाणेच विविधतेत एकता पाहायला मिळते. येथे तीन वेगवेगळ्या संस्कृती एकत्र नांदतात. या देशाने पोर्तुगीज, डच आणि ब्रिटिशांच्या राजवटी पाहिल्या. निसर्गाने या देशाला घडवले. त्यांना समुद्र, नद्या आणि जंगलसंपत्ती दिली. रबर, लाकूड या उद्योगांमुळे या देशाने अर्थव्यवस्था उभी केली. आज त्यापुढे जाऊन त्या उद्योगांनाही मागे टाकत मलेशियाने इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल उत्पादनाच्या क्षेत्रात कौतुकास्पद मजल मारली. देशाच्या अर्थव्यवस्थेला उजाळा देणार्‍या पर्यटन या महत्त्वाच्या भागाकडे मलेशियाने त्यापेक्षाही अधिक बारकाईने लक्ष दिले. दळणवळणाच्या सर्वोत्तम सुविधा, रुंद, प्रशस्त, दर्जेदार रस्ते या देशाच्या विकासाच्या धमन्या बनले. उत्कृष्ट रेल्वेसेवा, बससेवा, प्रत्येकाच्या खिशाला परवडतील असे दर आणि गरजेनुसार तिकिटे उपलब्ध करून देण्याची सोय, यामुळेच पर्यटक या देशाकडे मोठ्या प्रमाणात आकृष्ट होत आहेत.
पोर्तुगीजांचा प्रभाव आणि पगडा असलेल्या मल्लाकाचे (आपल्याकडचे गोवा) अंतरंग बदलण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. गडद, दाट जंगलात त्यांनी क्वालालंपूर नावाचे उंच उंच इमारतींचे शहर वसवले. कॅसिनो आणि अ‍ॅम्युझमेंट पार्कच्या विश्वात नेणारे जेंटिन हायलॅण्ड्स उभे केले. लंकावी या 500 चौरस मैलाच्या बेटावर पृथ्वीवरचा स्वर्ग उभा केला. सनवे लॅगून, पुत्रजया, बटू केव्ह्ज, कलांग, फ्रेझर हिल यांनी समृद्ध केलेला सेलांगोर हा भाग औद्योगिक क्रांतीमुळे आणखी विकसित झाला. पर्यटकांना समुद्रसफर आणि गिर्यारोहण असे दोन पर्याय या राज्याने दिले आहेत. खनिज संपत्ती, रबराचे प्रचंड उत्पादन यामुळे आधीच समृद्ध असलेल्या या भागावर निसर्गानेही मेहेरनजर केली आहे. जगाशी संपर्क ठेवणारे मलेशियातील सर्वात मोठे राज्य म्हणजे मल्लाका. या राज्याने आजही आपले आकर्षण टिकवून ठेवले आहे. सिंगापूरचे प्रवेशद्वार आणि मलेशियाचे दक्षिणेकडील टोक म्हणजे जोहोर. पर्यटनापेक्षाही मलेशियाने जोहोरला शांघाय किंवा हाँगकाँगप्रमाणे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे केंद्र म्हणून विकसित करण्यास सुरुवात केली आहे. सबा आणि सारवाक या दोन राज्यांत गडद जंगले आहेत. पशुपक्ष्यांच्या अनेक जाती-जमाती पाहण्यासाठी येथे हजारो पर्यटक येत असतात.

मल्लाका परंपरा, संस्कृती आणि सुलतानशाही जपणार्‍या मलेशियाने विकासाची किरणे रोखून धरली नाहीत. मलय लोकांच्या या देशात बरीच संख्या असलेले चिनी आणि अल्पसंख्याक असलेले भारतीय गुण्यागोविंदाने नांदताहेत. स्थानिक मलय लोक बहुसंख्य ग्रामीण भागात अधिक आहेत. शहरांमध्ये चिनी लोकांनी वरचश्मा मिळवला आहे. मलेशिया हे मुस्लिम राष्ट्र आहे. तरीही हिंदू धर्मीय भारतीयांना या राष्ट्रात स्वत:ला सामावून घेता आले. चिनी लोकांनीही या देशाच्या संस्कृतीत स्वत:ला एकजीव केले. भारतीयांची चनै-रोटी मलेशियन लोकांच्या आहाराचे अविभाज्य अंग बनली आहे. मलेशियन लोकांचा भात (नासी) आणि नूडल्स (मी) प्रत्येक चिनी आणि भारतीयांच्या ताटात सापडते. तसेच मलेशियाची राष्ट्रीय ‘डिश’ म्हणून ओळखला जाणारा नारळाच्या पाण्यात उकडलेला भात, त्यावर शेंगदाण्याचे कूट, कापलेली काकडी, गोड डाळ, उकडलेली अंडी आदी पदार्थ केळीच्या पानावरून पोटात जातात आणि पर्यटकांना मलेशिया भेट सार्थकी लागल्याचे समाधान लाभते.टच अँड गो
मलेशियामधला एक्स्प्रेस वे जरी थोडा अरुंद असला तरी रस्त्यांवर टोल भरणे अगदी सोपे आहे. टोलनाक्यांवर सगळ्या महिला कर्मचारी असतात, हे या देशाचे आणखी एक वेगळेपण. टोलनाक्यावर गाडी थांबवायची व हातातले ‘टच अ‍ॅन्ड गो कार्ड’ तेथे असलेल्या यंत्राला दाखवायचे, एवढेच करावे लागते. त्यामुळे कर्मचार्‍याला पैसे द्या, मग पावती घ्या, वगैरे उपद्व्याप करावे लागत नाहीत. अवघ्या दोन सेकंदात काम होते व समोरचे बॅरिकेड उघडते.


मेगा फाम फेस्टिव्हल - मलेशियाचे पर्यटन, पर्यटन विकासाचे वेगवेगळे उपक्रम, स्थानिक उत्पादने, हस्तकला, शिल्पकला, एअर मलेशिया या विमान कंपनीची गरुड भरारी, खरेदीसाठी सरकारने दिलेली सवलत योजना, आणि मलेशिया पर्यटन विभागाचे आदरातिथ्य हे सगळ्या जगासमोर मांडण्यासाठी मलेशिया सरकारने गेल्या काही वर्षांपासून ‘मेगा फाम फेस्टिव्हल’ सुरू केला आहे. या फेस्टिव्हलच्या उद्घाटनाला जगातल्या 19 देशांची प्रसारमाध्यमे उपस्थित होती. पारंपरिक आणि आधुनिक संस्कृतीचा मिलाप असलेल्या एका शानदार सोहळ्यात या फेस्टिव्हलचे उद्घाटन झाले.

जोहार बारू - लंकावी, जेंटिन हायलॅण्ड्स, पेनांग मलेशियातल्या या ठिकाणांना पर्यटकांची पहिली पसंती असते. मात्र जोहार बारू आणि मल्लाका या दक्षिणेकडच्या शहरांनाही मलेशियाने आता पर्यटनाच्या दृृष्टीने विकसित केले आहे. लेगोलँड, पुट्टेरी हार्बर फॅमिली थिम पार्क, डंगा वर्ल्ड थिम पार्क, अँग्री बर्ड थिम पार्क आणि शॉपिंगसाठी असलेले जोहर फॅक्टरी आऊटलेट (जेपीओ) यामुळे जोहरच्या दिशेनेही आता पर्यटक आपली पावले वळवत आहेत. जगभरातले सगळे नामांकित ब्रँड्स जेपीओमध्ये पर्यटकांना खुणावत असतात. मलेशियाने बच्चेकंपनीसाठी किंबहुना पूर्ण कुटुंबाच्या आनंदासाठी तब्बल 76 एकर जागेवर लेगोलँड उभारले आहे आणि आशिया खंडातले हे पहिलेवहिले थीम पार्क आहे. 40 वेगवेगळ्या राइड्स हे या लेगोलँडचे आकर्षण.

मल्लाका - मलेशियाचे एक लोभसवाणे शहर. गोव्याप्रमाणेच मल्लाकामध्येही पोर्तुगीज राजवटीच्या खाणाखुणा दिसतात. उंच टॉवर नाहीत की रोषणाई नाही. लाल लाल छपरांची छोटी छोटी घरे असलेले अतिशय देखणे शहर. वळणे घेऊन वाहात असलेली व भरपूर पाणी असलेली मल्लाका नदी आणि तिच्या काठी वसलेले मल्लाका शहर. क्रुझमधून रात्रीचा एक फेरफटका मारलात की, लगेच या शहराची समृद्ध संस्कृती नजरेत भरते. या शहराला लागून असलेला समुद्र मल्लाकाची सामुद्रधुनी म्हणून ओळखला जातो. या सामुद्रधुनीच्या पलीकडे म्हणजे पश्चिमेला इंडोनेशियातले सुमात्रा बेट लागते. सुमात्रा आणि मलेशिया यांच्यामधल्या सामुद्रधुनीचा आकार एखाद्या नरसाळ्यासारखा आहे. मल्लाकाच्या जवळपास ही सामुद्रधुनी फक्त 1.7 मैल एवढीच रुंद आहे. परंतु या चिंचोळ्या सामुद्रधुनीतून वर्षाला 50 हजार मालवाहू जहाजे प्रवास करतात. दीड कोटी बॅरल तेलाची वाहतूक इथून होत असते. चीनला लागणारे 70 टक्के तेल याच सामुद्रधुनीतून आयात होते. असे म्हणतात, की हा मार्ग जर काही कारणांनी बंद झाला तर जगातल्या निम्म्या मालवाहू जहाजांना त्यांचा प्रवासमार्ग बदलण्याची वेळ येईल. मल्लाकाचे स्थानमाहात्म्य केवढे मोठे आहे, हे यावरून दिसून येते.