आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परंपरा, परंपरा, परंपरंप रंपरा...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औद्योगिक समाजात साहित्यिक जाणिवेची मक्तेदारी निवडक लोकांच्या हाती होती. माहिती तंत्रज्ञानावर आधारित समाजात ही मक्तेदारी संपून साहित्यिक जाणीव सामुदायिक झाली. हेच साहित्याचं लोकशाहीकरण. ते होण्यासाठी वंचितांचं आर्थिक सशक्तीकरण आवश्यक होतं. आज आपण जे भोवताली बघतोय आणि ज्याचा आपल्यापैकी काही जण खासगीत संताप व्यक्त करतात, ते सशक्तीकरण चोरपावलाने येऊ लागलंय. म्हणून आपला आर्थिक आणि नैतिक परिसर झपाट्याने बदलतोय. बुद्धिवान माणूस तंत्रज्ञान विकसित करतो. त्यामुळे परिसर बदलतो. तो बदलला की माणसं अंतर्बाह्य बदलतात. सबब, साहित्यिक परंपराही बदलतात.


बदल हे एकमेव स्थिर सत्य आहे. पण ते कोणाला पटत नाही. त्यामुळे बदल घडूच नये, किंवा घडले तर ते परतवून कसे लावायचे, यावर भारतासारख्या पारंपरिक समाजाची भावनिक आणि बौद्धिक ऊर्जा खर्च होते. आज साहित्याची गोष्ट सांगताना जागतिकीकरणाचे संदर्भ अटळ ठरतात, आणि जागतिकीकरणाची गोष्ट सांगताना नव्या परंपरेची गोष्ट अध्याहृत ठरते. परंपराघातासाठी आज बरेच साहित्यिक आणि गैरसाहित्यिक लोक जागतिकीकरणाला दोषी ठरवतात. जागतिकीकरणाने श्रेष्ठ परंपरा नष्ट झाल्यात, शोषण वाढलं, चंगळवाद वाढला, माणूस देहाभिमानी झाला, स्वार्थी झाला, त्याच्या आयुष्यात बाजाराने थैमान घातलं, इत्यादी आरोपांच्या फैरी सुरू आहेत. गंमत म्हणजे एकीकडे परंपराविलयाबद्दल शोक करायचा आणि दुसरीकडे जागतिकीकरणाचे फायदे लाटायचे, ही दुविधा आपली सामुदायिक ओळख झालेली आहे. जागतिकीकरण चांगलं की वाईट? हा प्रश्न अवैध ठरला असून जागतिकीकरणाला आपण साध्य म्हणून की साधन म्हणून वापरणार आहोत, हा कळीचा प्रश्न आहे. केबल टीव्हीवर सर्वांगसुंदर ‘पाथेरपांचाली’ बघता येतो किंवा श्रीशांतचे ‘स्पॉट फिक्सिंग’ असणारे आयपीएल सामनेसुद्धा बघता येतात. चाकूने भाजी चिरता येते आणि माणसंही भोसकता येतात. निर्णय विवेकनिष्ठ माणसाने करायचा आहे. थोडक्यात, निर्णयस्वातंत्र्य नव्या माणसालाही चुकलं नाही.


‘जे सुरू आहे आणि जे कधीही थांबणार नाही किंवा परतवून लावता येणार नाही, ते जागतिकीकरण’ ही जागतिकीकरणाची वास्तववादी भूमिका आहे. ती स्वीकारल्याने साहित्यिकांचं आणि गैरसाहित्यिकांचं, दोघांचंही जगणं सुसह्य होण्याची शक्यता आहे. ज्युडोमध्ये प्रतिस्पर्ध्याची शक्ती वापरून त्यावर मात करतात. जागतिकीकरणाच्या विरोधकांनी जर ही ज्युडोची स्ट्रॅटेजी आत्मसात केली तर जागतिकीकरणामुळे आपल्या परंपरा नष्ट होतायत असं न म्हणता, जागतिकीकरणोत्तर परंपरेचा शोध नवे साहित्यिक घेतील.जागतिकीकरण वाईट कारण त्यामुळे सामाजिक आणि वैयक्तिक नैतिकतेची पातळी घटली, असा एकूण लेखक आणि कवींचा रोख असतो. हा मान्य केला तर जागतिकीकरणपूर्व समाज नैतिक होते, असा निष्कर्ष काढता येतो आणि जागतिकीकरणाची प्रक्रिया नष्ट केल्याने माणसं आहेत त्याहून अधिक नैतिक होतील, अशीही थिअरी मांडता येते. पण जागतिकीकरणाचा आणि नैतिकतेचा कार्यकारणभाव प्रस्थापित करणं तार्किक (logical)नाही. या तर्काला अनुसरून असंही विचारता येईल, की 1985चा महाराष्‍ट्रसामुदायिक आणि व्यक्तिगत नैतिकतेच्या मोजपट्टीवर खरोखरच उच्च पातळीवर जगत होता का? तो तसा होता हे सिद्ध करण्यासाठी लेखक स्वत:च्या रम्यस्मृतीचा (nostalgia) वापर करतात आणि गेलेला काळ जिवंत करतात. ‘काल सगळं छान होतं, आज सगळं बिघडलं’ अशी या नोस्टॅल्जिक ब्रिगेडची मांडणी असते. ती बहुसंख्य वाचकांना भुरळ घालते.


जागतिकीकरणाने जर नैतिकता घटली असेल तर ती नैतिकता खरोखरच नैतिक होती का? असं गमतीने विचारता येईल. आधुनिक मानसशास्त्र समजतं तितकी मानवी नैतिकता बाह्य गोष्टींवरच अवलंबून नाही. तिचा स्रोत खूपदा आतून वाहत असतो आणि तिचं ‘मेन स्वीच’ही आपल्या आतच असतं. हे स्वीच निर्धार केला तर प्रलयकाळातसुद्धा वापरता येतं. हाच खरा माणूस होण्याचा अर्थ आहे. आणि हेच खरं माणूस होण्याचं स्वातंत्र्य आहे. अपेंडिक्सचं आॅपरेशन करून ते माणसाच्या पोटातून काढून टाकतात, तशी जागतिकीकरणोत्तर समाजात माणसाची नैतिकता त्याच्या हृदयातून काढून टाकता येत नाही. जागतिकीकरण नसेल तरच नैतिकता असेल आणि नैतिकता असेल तर जागतिकीकरण नसेल, हे तर्कट चूक आहे. जागतिकीकरणामुळे ज्याला ‘पॅराडाइम शिफ्ट’ म्हणतात असे युगप्रवर्तक बदल नवोत्तर साहित्यिक जाणिवेचा कब्जा घेतील, असा अंदाज आहे.


ते नेमके कसे असतील, हे आजचे अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ आणि परंपरातज्ज्ञसुद्धा निर्णायकपणे सांगू शकणार नाहीत. पण त्यांच्याबद्दल अंदाज व्यक्त करता येतो. आपल्या(च) मुळाशी इमान राखणारी, आपल्या(च) भूमीचं गीत गाणारी, आपली(च) परंपरा श्रेष्ठ म्हणणारी जुनी साहित्यिक परंपरा नव्या काळात गैरलागू ठरेल. त्याऐवजी नव्या भूमीची वर्णनं करणारी, नव्या मुळांचा शोध आणि भान असलेली नवी परंपरा रुजू शकेल, कदाचित.
पण हे केव्हा? तर जेव्हा लेखक आणि कवी नोस्टाल्जियात न रमता जागतिकीकरणाचा ज्युडो स्टाइलने प्रतिवाद करत निखळ आत्मभानात जगतील तेव्हाच. कुठल्याही भाषेतल्या लेखकाकडे आत्मभानाशिवाय देण्यासारखं फारसं नसतंच. ते न देता, वाचकांचा अनुनय करणं, निव्वळ करमणूकप्रधान लिहिणं, चारचौघांना रुचेल आणि पचेल असं लिहिणं, साहित्यिक पारितोषिकांवर नजर ठेवून विशिष्ट फॉर्मुल्यानुसार आपलं लिखाण घडवणं म्हणजे साहित्याचं ‘हौशीकरण’ (amaturization) आहे. साहित्याची नवी परंपरा या हौशीकरणाचा विरोध करते. मराठीत वाचनाची नवी परंपरा काय राहील? या प्रश्नाचं उत्तर मराठीत लेखनाची नवी परंपरा काय राहील? यावर अवलंबून असेल. पोस्टमॉडर्निझममध्ये ‘डिसकोर्स’ म्हणजे ‘सामुदायिक चर्चा’. अशा चर्चेतून समूहाचा वैचारिक पोत कळतो. मराठीपुरतं बोलायचं झालं तर, जर हा डिसकोर्स पुराणकथा, मिथककथा, ऐतिहासिक पराक्रम आणि चातुर्वर्ण्यावर आधारित वैदिक संस्कृतीच्या शिळ्या कढीला उकळी आणणाराच असेल, तर मराठी साहित्यात नवं काही उगवणार नाही. कवी अरुण कोलटकरांनी ‘परं परं परंपरं परंपरं परंपरं परंपरं परंपरं परंपरा’ असं परंपरागीत लिहून ठेवलं आहेच. परंपरेचं वेड मराठी साहित्यातच नाही तर इंग्रजी साहित्यातही भरपूर आहे. ‘आजचा साहित्यिक नवं काही सांगत नसतो, तो काल सांगितल्या गेलेल्या सत्यातच सुधारणा करत असतो’, असं टी. एस. इलियटने सुमारे 80 वर्षांपूर्वी सांगितलं. इलियटच्या काळात जागतिकीकरण झालं नव्हतं. त्यामुळे परंपरेची संचयशीलता मान्य करण्यासारखी होती. नव्या काळात परंपरेच्या संचयशीलतेवर प्रश्न उपस्थित करता येतो. नैतिकतेच्या पतनाबद्दल शोक करणा-या साहित्यिकांना नैतिकता एक सामाजिक परंपरा म्हणून मंजूर होती, की एक अंतर्यामी प्रेरणा म्हणून जवळची वाटत होती? हा प्रश्नही महत्त्वाचा आहेच. परंपरेला ‘नवता’ म्हटल्याने मराठी साहित्यातला सनातन परंपरेचा डिसकोर्स खोडता येणार नाही. आणि तो खोडल्याशिवाय मराठी साहित्याचा ‘हुलिया’ बदलता येणार नाही. आपली परंपरा म्हणा किंवा कोलटकरांची ‘प्रंपरा’, दोन्हीमुळे मेनस्ट्रीम मराठी साहित्याची ऊर्जा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेला घासून पुसून स्वच्छ करण्यातच खर्च झाली.
साहित्य म्हणजे वाचक आणि लेखकांच्या परस्पर सहमतीवर आधारित, दोघांनाही खुश करणारी रंजक व्यवस्था ठरली. अशा व्यवस्थेत सांस्कृतिक श्रेष्ठत्वावर आधारित साहित्यकारण होतं. आपण ज्या संस्कृतीत जन्माला आलो आणि वाढलो; ती किती श्रेष्ठ आहे, हे त्याच संस्कृतीत जन्माला आलेल्या आणि वाढलेल्या वाचकांना सांगण्यात मतलब नाही. आपलंच श्रेष्ठत्व एकसारखं एकमेकांना बिंबवून दिल्यामुळे नवे वाचक वैचारिकदृष्ट्या फोफशे आणि आळशी होतील. त्यांची चिकित्सक बुद्धी झोपलेलीच राहील. नवी परंपरा या चिकित्सक बुद्धीची गोष्ट लावून धरणारी आहे. पण या परंपरेची अंमलबजावणी कवी आणि लेखकांना आत्मघातकी वाटू शकेल. आपली संस्कृती खरोखरच आपले पूर्वसुरी म्हणतात तशी श्रेष्ठ आहे का? हा प्रश्न जेव्हा लेखक स्वत:ला विचारेल आणि हा लेखक सांगतोय तशी आपली संस्कृती खरोखरच ग्रेट आहे का, असा प्रश्न जेव्हा वाचक स्वत:ला विचारेल, तेव्हा साहित्याच्या भूमीत नवी परंपरा रुजू लागेल. मग नवं परंपरागीतही लिहावं लागेल. पण तोपर्यंत जुनंच चालू द्या... प्रंपरंपरंपरा!


vishram.sharad@gmail.com