आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाषांतरकारांचा डाटाबेस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात किती भाषांतरकार? त्यांचे कोणत्या भाषेवर प्रभुत्व, आता मिळणार तपशील :
संगणकाच्या युगात संपर्क माध्यमांच्या कक्षा रुंदावल्या आहेत. विचारांचे आदान-प्रदानही वाढले आहे. विविध भाषा, त्या भाषेच्या अनुषंगाने त्या त्या क्षेत्रातील संस्कृतीप्रवाह जाणून घेण्याकडेही कल वाढला आहे. अन्य भाषांमधील दर्जेदार राहित्य, ज्ञान, संदर्भ आपल्या भाषेत कळावे ही सामान्य गरजही तीव्र होत आहे. या अनुषंगाने राष्‍ट्रीय आणि आंतरराष्‍ट्रीय स्तरावर भाषांतरकारांचे महत्त्व वाढत आहे. किंबहुना भाषांतराला आज स्वतंत्र ओळख मिळाली आहे, पण आपल्या देशात किती भाषांतरकार आहेत? त्यांचे कोणत्या भाषेवर प्रभुत्व आहे? इंग्रजीसह इतर देशातील भाषांची जाण असणारे कितीजण आहेत, कुठे आहे? आदींबद्दलचा तपशील आपल्याला सहज मिळत नाही, पण येत्या काळात ते शक्य होणार आहे. वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्‍ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाने यासाठी सकारात्मक पुढाकार घेतला आहे. भाषांतरकारांचा डाटाबेस तयार करण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवातही झाली आहे. विविध भाषांमधील संशोधन हिंदी आणि इतर भारतीय भाषांत उपलब्ध होण्यास यामुळे मदत होईल.


हा प्रकल्प दोन
भिन्न संस्कृतींना जोडण्याचे माध्यम :

मुळात संस्था किंवा संघटनात्मक पातळीवर भाषांतराच्या क्षेत्रात व्यापक प्रमाणात प्रयत्न आपल्या देशात होताना दिसत नाही. भाषांतर हे दोन भिन्न संस्कृतींना जोडण्याचे माध्यम आहे. भाषांतराच्या माध्यमातून परस्पर संबंध वृद्धिंगत करून हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार केला जातो, हे विद्यापीठाने ओळखले. या गरजेतून भाषांतरकारांचा डाटाबेस तयार करण्याची संकल्पना पुढे आली. भाषांतराच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना घडवायचे आणि सोबतच देशभरातील भाषांतरकारांना एका सूत्रात जोडायचे ही मूळ संकल्पना. यासाठी विश्वविद्यालयाचे कुलगुरू विभूती नारायण राय यांनी पुढाकार घेतला आणि अनुवाद विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रो. देवराज यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली.


महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे भारतीय भाषा विदेशी भाषेशीही जोडल्या जाणार :

या अनुषंगाने भारतातील अन्य भाषांसोबतच विदेशातील विविध भाषा जोडल्या जाणार असल्याने या पुढाकाराचे महत्त्व अधिक आहे. विद्यापीठाने मशिनी भाषांतर प्रणालीचा विकास करणे, भाषांतराला आंतरशाखीय शोध अभ्यासक्रमाद्वारे विकसित करून आधुनिक प्राधोणिकीनुरूप करणे, भाषांतराला भाषाशिक्षणाच्या, संशोधनाच्या व अध्यापनाच्या अनुरूप करणे, तुलनात्मक आणि आंतरविद्याशाखीय संशोधनासाठी ज्ञानाधारित अभ्यासक्रम व साहित्य उपलब्ध करून देणे, अनुवादक आणि निर्णायकांच्या कौशल्याचा विकास घडवून आणण्यासाठी प्रशिक्षण, कार्यशाळा आयोजन


विविध प्रकारचे शब्दकोश निर्माण करणे :
आणि अनुवादासाठी विविध प्रकारचे शब्दकोश निर्माण करणे, असे बहुलक्षी उद्देश ठेवले आहेत. या उद्देशातून पदव्युत्तर अभ्यासक्रम तयार केले आहेत. या नव्या अभ्यासक्रमांना येत्या सत्रापासून सुरुवातही होत आहे. या माध्यमातून विद्यापीठाने भाषांतरकारांची फळी निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले आहे. भाषांतरकार घडविण्यासाठी साधने-संसाधने उपलब्ध करून दिली आहेत. यासाठी कॉम्प्युटर लॅबही सज्ज झाली आहे.


भाषांतराच्या माध्यमातून ‘ज्ञान सर्जन केंद्र’ निर्मितीचे ध्येय, भाषांतरकारांच्या वर्षातून दोन ते तीन कार्यशाळा, नियमित संवाद :-
आज कॉम्प्युटरच्या माध्यमातून भाषांतर सहज शक्य होते. पण त्यास मर्यादा आहेत. शिवाय ते मशीनच्या माध्यमातून मानवी मदतीने झालेले भाषांतर ठरते. मानवाच्या माध्यमातून मशीनच्या मदतीने झालेल्या भाषांतराची खरी गरज आहे. हिंदी विद्यापीठाचे सर्वात महत्त्वाचे ध्येय ‘ज्ञान सर्जन केंद्र’ स्थापन करणे हे आहे. विद्यापीठाला हे भाषांतराच्या माध्यमातूनच साध्य करावयाचे आहे. केवळ डाटाबेस करून ही ध्येयपूर्ती शक्य नाही. म्हणूनच भाषांतरकारांच्या वर्षातून दोन ते तीन कार्यशाळा,नियमित संवाद घडवून आणला जाणार आहे.
भाषांतराला स्वतंत्र विद्याशाखा म्हणून विकसित करणार, भाषांतरकारांना संधी, रोजगार देण्याचा प्रयत्न विद्यापीठ करणार :
भाषांतरकारांना विविध संधी उपलब्ध करून देण्याचे, रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे माध्यमही हे विद्यापीठ ठरणार आहे. प्रकाशक आणि अनुवादक यांच्यात एका मर्यादेपर्यंत मध्यस्थाची भूमिकाही विद्यापीठाकडून पार पाडली जाणार आहे. भाषांतराला व्यावसायिक रूप देण्याचा आणि भाषांतराला गुणवत्ता प्राप्त व्हावी यासाठी विद्यापीठाचा एक मूल्यांकन कक्षही कार्यरत होणार आहे. यातूनच विद्यापीठाचे भाषांतराला एक स्वतंत्र विद्याशाखा म्हणून विकसित करण्यासाठीचे हे एक पाऊल निश्चितच महत्त्वाचे आहे.


प्रकल्प पुढे कसा जाणार, पाच
विशेष क्षेत्रे :

विश्वविद्यालयाने अभ्यासक्रमाची पाच विशेष क्षेत्रे निश्चित केली आहेत. यामध्ये
1) भाषांतर प्राद्योणिकी आणि मशिनी भाषांतर
2) फिल्म-मीडिया भाषांतर
3) प्राद्योणिक आणि निर्वचन
4) भाषा व्यवस्थापन
5) साहित्य भाषांतर यांचा समावेश आहे. भाषांतराच्या विद्यार्थ्यांमध्ये भाषांतराच्या वर्तमानातील सर्व अंगांना स्पर्श करण्याची सक्षमता निर्माण व्हावी, हे उद्दिष्ट आहे. भाषांतरकार घडविण्यासंदर्भातील हा पुढाकार विद्यापीठ स्तरावरील भाषांतराच्या अंगाने आहे. मात्र, त्याला भाषांतरकारांचा ‘डाटाबेस’ तयार करण्याच्या प्रकल्पाची जोड देण्यात आल्याने विद्यापीठाचे हे धाडस महत्त्वाचे ठरते. भाषांतरकारांचा डाटाबेस तयार करण्याचे काम देशात अद्याप झालेले नाही. खरे तर आजचे वाढते बहुभाषिक आदान-प्रदान आणि माहिती-तंत्रज्ञानाचे सुलभीकरण बघता भाषांतरकारांचा डाटाबेस ही मोठी गरज आहे. यापूर्वी म्हैसूर येथील राष्‍ट्रीय भाषांतर आयोगाने 20 वर्षांपूर्वी हा मर्यादित आणि स्वत:च्या गरजेपुरता प्रयत्न केला, परंतु त्यात सातत्य नव्हते. निश्चित धोरणाचा अभाव होता. त्यामुळे तो प्रयत्न अल्पजीवी ठरला.