आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिवर्तनाचा वाटसरू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मसणजोगी समाजाचे रीतिरिवाज वेगळे, सण वेगळे, तसेच देवही वेगळे... तसे असताना एके दिवशी वस्तीवर त्याने जाहीर केले की, या वेळी आपण सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करायचा!
वस्तीवरच्या सगळ्यांचीच माथी भडकली, जातपंचायतीने विरोध केला...
चार बुकं शिकून लई श्याना झालाय, आपला धरम बुडवायला निघालाय, आरं देवीचा कोप व्हईल ना...
प्रत्येकाने त्याच्यावर तोंडसुख घ्यायला सुरुवात केली. परंतु तोही जिद्दीला पेटला होता. लोकमान्य टिळकांनी लोकप्रबोधन आणि राष्ट्राभिमान जागृत करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाचा उपक्रम सुरू केला होता, हे त्याला माहीत होते. तोच धागा पकडून त्यालाही काहीतरी वेगळे करायचे होते. त्याच्या डोक्यात काहीतरी भन्नाट शिजत होते...


सदासर्वकाळ मसणजोगी वस्तीतली माणसं दारू पिऊन तर्र असायची. दिवसभर भिक्षा मागून झाली की संध्याकाळी दारू ढोसायची, पत्ते कुटायचे आणि मग भांडणं, मारामा-या, बायकोला मारहाण हे सगळं रोजचंच असायचं. त्याला मात्र हा तुंबा फोडायचा होता. ‘तुम्ही माणसं आहात आणि माणसासारखं जगा’ असं त्याला प्रत्येकाला ओरडून सांगायचं होतं. म्हणूनच त्याने हा गणेशोत्सवाचा घाट घातला होता. प्रचंड विरोध होऊनही शेवटी वस्ती त्याच्यापुढे नमली आणि मग पुढची लढाई त्याच्यासाठी खूपच सोपी झाली. वस्तीवरचा जो मसणजोगी अतिशय दारू प्यायचा, त्याचीच त्याने गणपतीच्या पूजेसाठी निवड केली. ‘आता जरी आपल्या समाजाचा नसला तरी देव तो देवच... त्याच्यापुढे अस्वच्छ राहून, दारू पिऊन, मांसाहार करून कसं जायचं...’ या श्रद्धेपोटी मग वस्तीवरच्या माणसांनी गणेशोत्सवाच्या काळात दारू पिणं सोडून दिलं...
दारू तर सुटली होती, परंतु जुगाराचं काय? लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच पत्ते कुटण्याचे व्यसन. मग त्याने कसंही करून माणसं दुसरीकडे कुठेतरी गुंतली पाहिजेत, म्हणून वस्तीवरच व्हॉलीबॉल खेळण्यासाठी प्रत्येकाला राजी केले. तो तिथेच थांबला नाही, तर त्याने जातपंचायतीच्या मागे लागून नवा फतवा काढला. ‘जो कुणी वस्तीवर पत्ते कुटताना किंवा जुगार खेळताना दिसेल त्याला दहा रुपयांचा दंड आणि त्याच्या गळ्यात बायकोची एक चप्पल,’ अशी शिक्षा सुनावण्यात आली. आज उमरग्यातील मसणजोग्यांच्या वस्तीवर अपवादानेच कुणी दारू पिताना किंवा पत्ते कुटताना दिसतो. खूप मोठी गोष्ट होती ती त्याच्यासाठी. आणि त्यात तो काही प्रमाणात का होईना, यशस्वी झाला होता. जातपंचायत, दंड याविषयी त्याला जराही आस्था नव्हती. पण, याच आधाराने जर वस्ती सुधारणार असेल, तर ती सुधारणा मात्र त्याला हवी होती...
तो कुणी सामाजिक कार्यकर्ता नव्हता, शिक्षक नव्हता, समाजसुधारक नव्हता, ‘एनजीओ’वालादेखील नव्हता. मात्र तरीही हे सगळे गुण त्याच्यात ठासून भरले होते. तो त्यांच्यापैकीच एक असला तरी तो शिकला-सवरलेला होता. मसणजोगी समाजातला पहिला पदवीधर...
संजय विभुते (बी.ए./बी.एड.)...
उमरगा येथे भटके-विमुक्त विकास परिषद संचालित मसणजोगी समाज विकास संस्थेमार्फत संजयनं खूप मोठं कार्य करून ठेवलंय. परंतु त्यासाठी त्याने ज्या खस्ता खाल्ल्या आहेत, ते ऐकून अंगावर शहारा येतो. दिवसभर घागरी विकून दोन-चार रुपयांची कमाई करून झाली की रात्रभर चिमणीच्या प्रकाशात संजय अभ्यासाला बसायचा. ते बघून वस्तीवरची सगळी माणसं घाबरायला लागली. त्यांच्या मनात वेगळाच संशय यायला लागला. रात्रभर जागून हा भानामती-जादूटोण्याची विद्या शिकतोय, म्हणून शेवटी पंचायतीने संजयवर बहिष्कार टाकला. त्याला वाळीत टाकले. संजयने आपली बाजू मांडायचा खूप प्रयत्न केला, मात्र वस्ती मानायलाच तयार नव्हती. चार महिन्यांपर्यंत बहिष्कार सोसलेल्या संजयने थोडे पैसे जमा करून शाळेचा गणवेश विकत घेतला आणि गणवेशात रात्रभर अभ्यास करू लागला, तेव्हा कुठे पंचायतीला विश्वास बसायला लागला आणि मग त्यांनी बहिष्कार मागे घेतला.
जन्म मसणजोगी समाजात झालेला असला तरीही संजय मात्र मसणजोगीची संकल्पना वेगळ्या शब्दांत मांडतो. ‘आम्ही मूळचे भिल्ल समाजातले. मसणजोगी हे नंतरचे नाव. खरे तर आम्ही स्मशानातले योगी. ब्रिटिशांनी गुन्हेगारी जमातीचा शिक्का मारल्यामुळे आम्ही जंगलातच राहायचो. त्यामुळे वनौषधींचे खूप चांगले ज्ञान आमच्या समाजाला होते. आता ‘पोस्टमार्टेम’ म्हणतात ना, ती कला आमच्या समाजाकडे पिढ्यान्पिढ्या होती. प्रेत उकरून आम्ही तो कसा मेला, कोणते औषध दिले असते तर तो वाचला असता, याची अचूक माहिती सांगायचो. प्रेताशी संबंध, गळ्यात हाडं-कवट्यांची माळ असा भुतासारखा पेहराव, त्याच पेहरावात गावात भिक्षा मागायला जाणं, स्मशानात वास्तव्य आणि भाषाही सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडची; त्यामुळे साहजिकच आमच्या समाजाबद्दल लोकांच्या मनात भीती पसरली, अंधश्रद्धा पसरल्या गेल्या आणि म्हणून मग आमचे नामकरण मसणातले जोगी म्हणजे ‘मसणजोगी’ असे केले गेले...’
शंभर वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशातील श्रीशैलम या ठिकाणाहून संजयचे आजोबा भटकत भटकत महाराष्ट्रात आले, परंतु त्यानंतरही भटकणं काही संपलं नाही... एका गावात महिन्या-दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ मसणजोग्यांना कोणी थांबू देत नव्हतं. त्यांनी पालं टाकली रे टाकली की महिनाभराच्या आतच त्यांचा मुक्काम पुन्हा दुस-या गावात. तब्बल पाच ठिकाणी संजयची पहिली इयत्ता पूर्ण झाली. यावरून त्यांच्या भटकंतीचा अंदाज येऊ शकेल. संजयला शाळेची पहिल्यापासूनच आवड. शाळेत जायला मिळाले नसले तरी तो शाळेच्या खिडकीत उभा राहून ते सगळं बघायचा, मनातल्या मनात पाढे म्हणायचा. शिक्षकांच्या ते लक्षात आलं आणि मग संजयचा शाळेत रीतसर प्रवेश झाला. दारुडे आणि मारहाण करणारे वडील, भावाचे आणि कालांतराने दोन्ही बहिणींचे झालेले निधन, त्यामुळे वेडसर होत जाणारी आई, यामुळे संजयवर फार पूर्वीपासून जबाबदारीचे मोठे ओझे... काही झाले तरी शिकायचेच, हा निर्धार पक्का केल्याने मग अपार कष्ट घेऊन त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. मग कधी पाव, आइस्क्रीम, घागरी विकायचा; तर कधी आठवड्याच्या बाजारात कंदमुळे आणि वनौषधी विकायचा. हाताला काम नसेल तर मसणजोग्यांचा पारंपरिक भेसूर वेष घालून भिक्षा मागणे ठरलेलेच होते. त्याच्या वर्गातली मुलं त्याला चिडवायची, छळायची. परंतु ‘ते देवाचं असतंय, करावं लागतंय’,असं खोटंच उत्तर देऊन संजय दुर्लक्ष करायचा. असे करता करता संजयने त्याचे बारावीपर्यंतचे शिक्षण कसेबसे पूर्ण केले. पुढे मुक्त विद्यापीठातून तो पदवीधरदेखील झाला.
मसणजोगी समाजातला पहिला पदवीधर म्हणून संजयचे कौतुक नाहीये तर आपला समाज सुधारला पाहिजे, या जाणिवेपोटी त्याने आजवर जे कार्य केले, त्याबद्दल संजयचे कौतुक करावे तितके थोडे आहे. त्याच्याच वस्तीवरचा तुळशीराम इवतोळे तापाने फणफणत होता. पाच दिवस उलटले तरीही त्याचा ताप कमी होत नव्हता. त्यामुळे मसणजोगी समाज मात्र खुश होता. कुणी आजारी पडला की मरणाची चांदी मिळत असेल, तर हे आजारपण आनंददायी नाही का? तुळशीरामला खूप मोठ्या भुताने झपाटले आहे, त्याच्या अंगात शिरलेले भूत उतरवले नाही तर हा ताप उतरणार नाही आणि त्यासाठी सात हजार रुपयांची मागणी वस्तीने केली होती. तुळशीरामचा ताप हा
मलेरियाचा ताप आहे, हे एव्हाना संजयच्या लक्षात आले होते आणि तो त्याला दवाखान्यात घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता. वस्तीच्या लोकांचा विरोध पत्करून संजयने तुळशीरामला दवाखान्यात नेले. पाच दिवसांनी तुळशीराम हसत-खेळत वस्तीवर आला. मात्र वस्तीने संजयविरुद्ध मोर्चेबांधणी सुरू केली. संजयमुळे वस्तीचे मरणाचे जेवण बुडाले, याचा त्यांना प्रचंड राग आला. आपल्या समाजाशी संजयने घेतलेला हा पहिला ‘पंगा’.
पुढे भटके विमुक्त परिषदेने वस्तीवर उमाकांत मिठकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पालावरची शाळा’ सुरू केली. ती शाळा चालवण्याची जबाबदारी परिषदेने संजयवरच टाकली. दरम्यान, वस्तीत एक दुर्घटना घडली. वस्तीवरचा एक लहान मुलगा खेळता खेळता जरा लांब गेला आणि एका हौदात बुडून मरण पावला. सबंध वस्तीने हंबरडा फोडला. रात्रभर संजयचा डोळा लागला नाही. सकाळ झाली तेव्हा संजय नव्या विचाराने पेटून उठला. काही झाले तरी वस्तीवरच्या मुलांना शाळेत गुंतवायचेच आणि म्हणूनच संजयने पालावरच्या शाळेत स्वत:ला झोकून दिले. परिषदेचे कार्यकर्ते मिठकर आणि संजय यांच्यात खूप फरक होता. मिठकरांनी थोडाफार विश्वास निर्माण करून मसणजोग्यांना आपलेसे केले होते. पण संजयचे तसे नव्हते. त्याला स्वत:ची प्रतिमा स्वत:च उभी करायची होती. या वस्तीत स्वत:बद्दल विश्वास निर्माण करून काम करायचे होते. आपल्या जिवाची पर्वा न करता संजयने नंतर समाजाशी असे अनेक पंगे घेतले आणि परिणाम साध्य झाल्यावर प्रत्येक वेळी त्याचे मनोबल उंचावत गेले. कोणतेही सामाजिक परिवर्तन एका क्षणात होत नाही. त्यासाठी अनंत काळ प्रतीक्षा करावी लागते, हे संजय जाणून होता. म्हणूनच छोटे छोटे प्रयोग करून तो वस्तीत परिवर्तन घडवू पाहत होता. (क्रमश:)