आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्कृष्ट अनुवादक नीता कुलकर्णी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नीता कुलकर्णी मूळच्या रत्नागिरीच्या. लग्न होऊन पुण्याला स्थायिक झाल्या. साहित्याचं माहेरघर समजल्या जाणार्‍या पुण्यामध्ये त्यांच्या लेखनाला अधिक बळ मिळालं. पुणे विद्यापीठातून र्जनलिझमचा डिप्लोमा पूर्ण केला असल्याने त्यांनी काही वर्षे मुक्त पत्रकारिता केली. एका स्वयंसेवी संस्थेच्या द्वैमासिकासाठी त्यांनी संपादनाचं काम केलं. हे मासिक केवळ लहान मुलांकरिताच होतं. त्यामुळे लहान मुलांचे विश्व डोळ्यासमोर ठेवून त्यांनी संपादन केलं. पुढे अमेय प्रकाशनासारख्या प्रतिष्ठित संस्थेत त्या संपादिका म्हणून रुजू झाल्या. पुस्तकासाठी नवीन विषय शोधण्यापासून ते पुस्तक बाजारात येईपर्यंतचं सगळं काम त्या बघतात. यादरम्यान त्यांचं स्वत:चं लेखनदेखील चालू होतं. हिंदी राष्ट्रभाषा पंडित असल्याने त्यांचं हिंदीवरही प्रभुत्व आहे. दुसर्‍या भाषेतलं साहित्य आपल्या मराठी भाषेत यायला हवं, असं त्यांना मनोमन वाटत होतं. म्हणूनच त्यांनी कथालेखनाबरोबरच अनुवाद क्षेत्र निवडलं.
रा. गो. बहल यांच्या ‘एक सुपरपॉवर’ या पुस्तकामध्ये भारत आणि चीन या दोन्ही देशांवर विवेचन केलेलं आहे. दोन्ही देशांच्या राजकीय, सामाजिक, मनोरंजन, सांस्कृतिक, आर्थिक अशा सगळ्या क्षेत्रांमधील कार्यपद्धतीचा तौलनिक अभ्यास आहे. हा व्यापक पसारा अनुवादित करणं नीता यांच्यापुढे एक आव्हानच होतं. पण प्रयत्नांती त्यांना हे जमलं. त्यांच्या या कार्याची दखल नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयानं घेतली आणि एका चांगल्या पुस्तकाचं व त्यांच्या या कामाचं कौतुक झालं. सावानाच्या 172 व्या वार्षिक समारंभात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. यानिमित्ताने आपल्यासारख्या नवोदित लेखिकेची चांगल्या पद्धतीनं दखल घेतली गेली, असं नीता यांना वाटतं.
सध्या त्या अमेरिकेतील डॉ. सिद्धार्थ मुखर्जी यांचं ‘एम्परर ऑफ ऑल मेलडीज : बायोग्राफी ऑफ कॅन्सर’ या पुस्तकाचा अनुवाद करीत आहेत. पाचशे पानांच्या या पुस्तकाचा कॅन्सर हाच हीरो आहे. पुलित्झरसारखा मानाचा पुरस्कार मिळालेलं हे पुस्तक मराठीत आल्यास अनेक वाचकांना, कॅन्सरग्रस्तांना तसेच डॉक्टरांना याचा उपयोग होऊ शकेल, असं नीता यांना वाटतं. जागतिक पातळीवर एकमेकांशी जोडलं जाणं हे साहित्याच्या माध्यमातून होणारं महत्त्वाचं काम अनुवाद करीत असतो. या क्षेत्रात भक्कमपणे उतरू पाहणार्‍या नीता यांच्या लेखनाचा झालेला सन्मान एक प्रकारे या क्षेत्राचं महत्त्वदेखील अधोरेखित करतो.