आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धागा-धागा अखंड विणूया...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

झाडं हा पशुपक्ष्यांचा निवारा असतो. मात्र चिखल-माती माणसाच्या गृहरचनेचा अजून महत्त्वाचा भाग आहे. ही माती इतर प्राणिमात्रांनाही निवार्‍यासाठी तेवढीच उपयुक्त ठरते. कच्छ रणातून भटकंती चाललेली. या रणात उथळ पाण्याचा, दलदलीचा भूभाग आहे. या दलदलीतील चिखलाचा घरबांधणीसाठी पक्ष्यांनी कल्पक वापर केलेला दिसून आला. ‘प्यारे रोहित’ म्हणजेच फ्लेमिंगोंच्या वसाहती अशा चिखलातच वसतात. त्यांची कारागिरी पाहता त्यांना कुंभार म्हणावं की गवंडी, एवढाच प्रश्न. वारुळंदेखील याच प्रकारात मोडतात. ओडिशातील छत्रपूर-गोपालपूर परिसरात चांगली पुरुष- दोन पुरुष उंचीची वारुळं पाहिली होती. तर कोळ्याचं जाळं ही एक अजब निसर्गनिर्मिती असते. ते जाळं बनवताना त्यातून निमुळत्या कपाच्या आकाराचं भांडं तयार करणं हे नवलाईचं कसब असतं.
कौशल्याबाबतीत पक्ष्यांची घरबांधणी ही प्रेक्षणीय कलाकुसर होय. काही पक्ष्यांच्या घरट्यांच्या कलाकृती तर कमालीच्या विलोभनीय असतात. पाणथळीकाठी काळ्या करकोच्याने गवत-काड्यांनी विणलेलं बाऊलच्या आकाराचं घरटं सुंदरच. ‘स्पॉटेड मुनिया’ हा चिमणीच्या चणीचा लहान पक्षी असला तरी ‘मूर्ती लहान परी, कीर्ती महान’ अशी ख्याती. गवताच्या काड्यांनी शाकारलेलं त्याचं घर ही खास कलाकृती. पिवळाधमक हळद्या भित्रा आणि लाजाळू, हृषीकेश मुखर्जी दिग्दर्शित आणि धर्मेंद्र्र-शर्मिला टागोर अभिनीत ‘अनुपमा’ (1966) चित्रपटातील नायिकेसारखा. ‘कुछ दिल ने कहा, कुछ भी नहीं...कुछ दिल ने सुना...’ हळद्या म्हटला की प्रथम आठवते त्याची सुरेल शीळ. गायनकलेत तो जसा प्रवीण, तसाच गृहरचनेतही जातीचा कलावंत. तथापि या कलेचं दर्शन सहजासहजी घडत नाही. झाडाच्या आतल्या बाजूला, फांद्यांच्या बेचक्यात कुणाच्याही दृष्टीस न पडेल, अशा ठिकाणी याचं घरटं असतं. घरटं म्हणजे गोलाकार वाटीच. बाह्यत: फारसं आकर्षक नसलं तरी आतमध्ये आच्छादलेली मऊसूत गादी म्हणजे तान्ह्यांच्या गाईगाईची ममतामय तजवीज. आई हळद्या एखादं अंगाईगीत आळवतही असेल. कुणी सांगावं? जातीची गायिकाच ती. तिची अंडी चमकदार रंगीत. मात्र त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी या भित्रट पक्ष्याला पेलवत नाही. ते काम कोतवाल पक्षी करतो आणि आपलं नाव सार्थकी लावतो.
गायनात बुशचॅट किंवा गप्पीदास पक्ष्याचा नंबरही वरचा. ‘इंडियन आयडॉल’चा किताब सहजासहजी मिळवू शकेल असा. केवळ गायक नव्हे तर बॉलीवूडचा नायकही शोभू शकेल असा रोमिओ. रंगीबेरंगी पंख फडफडवत मादीभोवती पिंगा घालणारा रंगेल हीरो. तथापि, बॉलीवूडच्या हीरोसारखा बिनकामाचा नोहे! ‘पटली रे पटली’ की दोघं मिळून लागले कामाला. कापूस, लोकर अशासारख्या उबदार चिजा जमवून शेतबंधारे, माती-दगडांचे ढिगारे यांच्या पोकळीत पिलांसाठी बिछाना तयार. हा गप्पीदासाचा ‘अरे खोप्यामदी खोपा’, ओरियल घराणं पण गायकीचंच. घरट्याबाबतीत याचं सूत्रदेखील ‘धागा धागा अखंड विणूया’ हेच. गवत, पाला यांनी विणलेलं, झाडाच्या छोट्याशा फांदीच्या आधाराने वसलेलं याचं घरटं एक अनुपम कलाकृतीच होय. दोन-चार पिलांचं जीवन या घरकुलात फुलत असतं.
फॅनटेल पक्ष्याचे नर आणि मादी एकत्र आल्यानंतर विणीसाठी योग्य अशा जागेच्या शोधास लागतात. एखादं नवपरिणीत जोडपं लागतं तसं. रसिक प्रेमिकांना गावते तशी रम्य बगिचामध्ये त्यांना भावेल अशी जागा गवसू शकते. एखाद्या झाडाची इवलीशी आडवी फांदीदेखील त्यांना यास्तव पुरेशी असते. त्यानंतर गवताच्या नाजूक तंतूंचं होणारं विणकाम म्हणजे कलाकुसरीचा अनोखा नमुना असतो. बर्‍याच वेळा घरट्याचा बाह्य भाग मऊसूत पालवींनी सजवला जातो. असं देखणं घरटं तयार झालं की, मादी त्यात दोन-तीन अंडी टाकते. अंडी उबवण्यास नरही हातभार लावतो. फ्लायकॅचर घरट्यासाठी थोडी जाड फांदी निवडतो आणि बापडा साधंसुधं लंबगोलाकृती घरटं उभारण्याच्या खटपटीस लागतो.
मॅगपाय लार्कदेखील घरट्यासाठी झाडाच्या आडव्या फांदीचा आधार घेतो. तथापि, त्याचं घरटं अधिक बळकट आणि टिकाऊ असतं. चिखल लिंपून झाडावर कपाच्या आकाराचं घरटं बांधण्याची त्याची करामत औरच म्हटली पाहिजे. आपलं को-ऑपरेटिव्ह सोसायटीचं म्हणजेच सहनिवासाचं तत्त्व मार्टिन पक्ष्याने पुरातन काळापासून अंगीकारलं आहे. खडकाचा उभा कडा दृष्टिपथात आला की शेकडो पक्षी कामाला जुंपून घेतात. छोटे खडे आणि चिखलमातीच्या लिंपण कामाला लागतात. बाटलीच्या तोंडाची बिळं ही त्यांची घरटी. मजबूती ‘जैसे फेविकॉल हो’. घरट्यांच्या ताब्यासाठी क्वचित समरप्रसंगही उद्भवतात. परंतु एकूण उद्देश हा गुण्यागोविंदाने नांदण्याचाच असतो...