आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इन्टंट प्रेमाचा पंचनामा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेक्स एज्युकेशनपेक्षा
प्रेमाचं शिक्षण गरजेचं

* डॉ. मोनाली देशपांडे
(कन्सल्टिंग सायकिअॅट्रिस्ट, वेलनेस एक्स्पर्ट)
सात वर्षांपूर्वी महाविद्यालयात २०० विद्यार्थ्यांपैकी १० प्रेमप्रकरणं चर्चेत असायची. आता मात्र १९० जणांचे अफेअर असतेच. ज्या १० जणांचे नसते त्यांच्याकडे अॅबनॉर्मल म्हणून पाहण्याचा ट्रेंड आलाय. सगळ्यांचं आहे म्हणून माझंही कोणावर तरी प्रेम असावं, असा प्रेमाचा अजब फंडा शाळा-महाविद्यालयांमध्ये दिसून येतोय. मानवी भावनांचा हा ट्रान्झिशन पिरियड मानला तरी प्रेमभावनेचं नेमकं काय होतंय, हा प्रश्नच आहे. सातवी-आठवीपासून हे प्रकार घडताहेत. वास्तवात मानसशास्त्राप्रमाणे प्रेम म्हणजे ‘टू गिव्ह’ची भावना. प्रेमात साध्य काय करायचं यापेक्षाही काय द्यायचं, हे महत्त्वाचं आहे. मी विशेष प्रयत्न करून एखाद्या व्यक्तीसाठी विशेष काही तरी करणारच, हा निश्चय जेव्हा मनात होतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या आपण प्रेमात आहोत, हे निश्चित होतं. अनेकदा काम करून थकले भागलेले दोन जीव परस्परांच्या आनंदासाठी पुढाकार घेतात, त्यात हे प्रेम जाणवतं. शालेय मुलांना खरंच हा अर्थ कळलेला नसतो. अगदी महाविद्यालयातही ते कळतं, असा दावा नाही करू शकत. सगळ्यांचं आहे म्हणून माझं असावं, या भावनेने प्रेम करू नका. माझ्याकडे काही केसेसमध्ये कॉलेजात बोअर होतं म्हणून अफेअर करणारी मंडळीही दिसून आली. त्याच्याकडून नोट्स मिळतात, बोअर झाल्यावर बाइकवर फिरता येतं, अशी कारणांसाठी रिलेशनशिप स्वीकारणाऱेही आहेत. इंडिया टुडेने नुकत्याच प्रकाशित केलेल्या अंकात भारताच्या मेट्रो सिटीजमध्ये १४ वर्षांखालील ७४ टक्के मुलांनी लैंगिक संबंधाचा अनुभव घेतल्याचे म्हटले आहे. महानगरीय संस्कृती सर्वत्र पसरण्यास फार काळ लागतो, या भ्रमात राहू नये. ही आकडेवारी तथ्यात्मक मानली तर सेक्स एज्युकेशनपेक्षा प्रेमाची साक्षरता वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे, असे म्हणावे लागेल. शॉर्ट टर्म रिलेशनशिपचं मुख्य कारण इमोशनल इन्व्हेस्टमेंटपासून दूर राहण्याची प्रवृत्ती वाढत आहे.
त्याग व परस्पर सन्मान ठेवण्याची भावना महत्त्वाची
*रंगकर्मी मंजुल भारद्वाज
दि एक्सपेरिमेंटल थिएटर फाउंडेशनचा संचालक म्हणून शालेय व महाविद्यालयीन मुलांसोबत थिएटर वर्कशॉप करत असताना मुलामुलींच्या मनाची तरलता मी अनुभवली आहे. भारतीय दृष्टिकोनातून व्हॅलेंटाइन डे हाच प्रेमाचा दिवस असावा, असं मला तरी वाटत नाही. हॉटेल्स फुल बुक असणे, हॉटेल्समध्ये केवळ तरुण जोडप्यांनाच प्रवेश देणे हे प्रकार या दिवशी घडतात. मग प्रेमात या दिवसाचे योगदान काय? नातं टिकवणे व त्याची समज यानिमित्ताने वाढते, असं दिसून येत नाही. यात तरुणाईला दोष देण्यापेक्षा वाढत्या ग्राहकवादाला चालना देण्या-या व्यवस्थेची ही विकृती आहे. प्रेमासारख्या नैसर्गिक भावनेला बाजारपेठी प्रलोभने दाखवली जातात. या दिवशी ९० टक्के बॉडी अफेअर व ३ टक्के प्रेम व्यक्त होतं, असं माझ निरीक्षण आहे. चिक्कार माध्यमे मुलांच्या हाती आल्याने प्रेमाच्या भावनेचा बॉम्बारडिंगच यानिमित्ताने होतं. ही व्यवस्था तरुणाईने निर्माण केली आहे का? या प्रेमाचा दिवसच साजरा करायचा तर त्याग, परस्परांचा सन्मान या अभिव्यक्ती जाणवायल्या हव्यात. आज सुशिक्षित व प्रचंड स्वातंत्र्य मागणारी तरुणाई अशा दिवशी पुरेपूर सेलिब्रेट करते. जरूर करा; पण तुम्ही स्वतंत्र व शिकलेले आहात. मग त्याने किंवा तिने मला इमोशनली छळले, शारीरिक शोषण केले म्हणून तक्रारी घेऊन येऊ नका. स्वातंत्र्य हवे तर ते पचवण्यास शिक्षित तरुणाईने सक्षम असावे, ही अपेक्षा आहे. व्हॅलेंटाइन डे वेस्टर्न म्हणायचा तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने लिव्ह इन रिलेशनशिपवर जो निकाल दिला आहे, त्यालाही अभारतीयच म्हणावे लागेल. सर्वोच्च न्याययंत्रणेने नात्यांच्या नव्या संकल्पनांना अधिष्ठान दिल्यावर संस्कृती कोणत्या दिशेने रुजत आहे, हे प्रगत भारताने स्वीकारलेल्या व्यवस्थेचे फलित आहे.
प्रेम फॅशन स्टेटमेंट व
डिस्प्लेची वस्तू नाही

*डॉ. रचना पोळ
(कन्सल्टिंग सायकिअॅट्रिस्ट)
माझ्याकडे येणा-या ब-याच केसेसमध्ये अल्पवयीन मुलींच्या पालकांचा मनस्ताप मला दिसून आला आहे. कमी वयात प्रेमात पडल्यावर व्हॅलेंटाइन दिनानिमित्त ते प्रेम मिरवण्याचा ट्रेंड शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यामध्ये आलाय. मुळात प्रेम ही प्रदर्शनाची वस्तू नाही. भांडण, हिंसा या घटनांनी समाजात अस्थिरता आहे. त्यात असा दिवस चांगल्या व शाश्वत भावना असलेल्या प्रेमासाठी देणे चांगलेच आहे. पण तुमच्या जीवनात जे सर्वोत्कृष्ट आहे, परमानंद देणार आहे ते तुम्ही परस्परांशी शेअर करू इच्छिता का? परमोच्च आनंद व दारुण दु:खात जी व्यक्ती जवळ असावी वाटते, त्या व्यक्तीवर आपल प्रेम असत. ज्यांच्यासोबत तुम्ही हा दिवस साजरा करताय, त्यात ही भावना आहे का? नसेल तर तुमच्या प्रेमाची उंची तपासून पाहा. किती तरी अल्पवयीन तरुण-तरुणी स्वेच्छेने संबंध प्रस्थापित करतात. या वयात खरंच नात्यांचा अर्थ कळलेला असतो का? फारच उथळ प्रलोभनांमध्ये तरुण पिढी गुंतत आहे. एकमेकांना सायकॉलॉजिकली कसं हँडल करायचं, हे विचारण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांकडे मुलं येतात, यावरून वास्तव समजेलच.
स्वीकारण्यासाठी वेळ द्यावा लागतो
*डॉ. अमोल देशमुख
(कन्सल्टिंग सायकिअॅट्रिस्ट)
प्रेम ही चिरकाल टिकणारी भावना आहे. व्हॅलेंटाइन डे साजरा करतानाच प्रेमाला समजून घ्या. निर्विवाद एखाद्या व्यक्तीला स्वीकारणे, म्हणजे प्रेम. तिच्यातील सकारात्मक गोष्टी आवडत असतील तर नकारात्मकही स्वीकारल्या पाहिजेत. एखादी व्यक्ती आहे तशी स्वीकारणे, निर्विवाद स्वीकारणे म्हणजे प्रेम असतं. आज गॅजेट्समुळे कनेक्टिव्हिटी वाढली आहे. परस्परांच्या टचमध्ये राहणं सहज शक्य झालंय. यातून आकर्षणं निर्माण होताहेत. तंत्रज्ञान स्वीकारताना भावनिक नात्यांत अस्थिरता निर्माण होत आहे. मात्र, हा तंत्रज्ञानाचा दोष नाही. ते परफेक्शन नाही मिळालं की प्रेम लगेच ब्रेकअपच्या स्टेजला जात. ब्रेकअपची कारणंही शुल्लकच असतात. ग्लॅमरस बाबींना न भाळता नाते जपता येणं महत्त्वाचं. हे कळले की मग व्हॅलेंटाइन दिवस साजरा करायला खरा अर्थ आहे.