आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कविता जात्‍यातून बाहेर का नाही पडत ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रस्थापितांच्या साहित्य संमेलनांमध्ये नवोदितांना फारसे व्यासपीठ मिळत नाही. त्यामुळेच लेखिका संमेलनात नवोदित कवयित्रींना अभिव्यक्त होण्यासाठी तब्बल तीन तासांचा अवधी देण्यात आला. कविता सादर करणाऱ्या महिला किशोरवयीनांपासून ते वृद्ध वयोगटातल्याही होत्या. कवितेच्या रूपाने मराठवाड्याच्या ग्रामीण व निमशहरी गावांमधल्या महिलांना व्यक्त होता आल्याचं मनस्वी समाधान वाटलं; परंतु मी स्वत: मराठवाड्यातली असल्यामुळे कविता ऐकून काहीशी अंतर्मुख झाले. मी ज्या प्रदेशात राहते, तेथील महिलांच्या कविता अजून जात्यातून बाहेर का पडत नाहीत, असा प्रश्नही पडला. म्हणजे कवितांची रुपके जात्यापेक्षा स्मार्ट किचनची असावीत ही अपेक्षा नाही. फार क्वचित महिलांनी विनोदी, राजकीय विडंबनात्मक सामाजिक आशयाच्या कविता सादर केल्या. याच मुद्द्याच्या दुसऱ्या बाजूचाही विचार मनात घोळू लागला.

पुरुष खरंच पुरुष म्हणून कविता करतो का? तो शंभर टक्के रसग्रहण करून कविता करतो का? जीवनाच्या अनुभवाला तो भिडतो का आणि म्हणूनच पुरुष रचनाकारांच्या कविता अजरामर होतात, असेही वाटले. याच्याशी कदाचित सगळेच सहमत असतील असेही नाही; पण निष्कर्ष असा की, बाईने बाईपणात गुंतून पडणाऱ्या कविता करतानाच सामाजिक भाष्य करणाऱ्या, मानसिक गुंतागुंतीवर भाष्य करणाऱ्या कविता रचायला हव्यात, हे मी विशेषत: मराठवाड्यातल्या अनुभवांतून लिहीत आहे. महदंबा, मुक्ताबाई, जनाबाई, बहिणाबाई या सर्वच कवयित्री अत्यंत अभावग्रस्ततेतून रचना करत होत्या; पण अनुभवांची प्रगल्भता त्यातून जाणवते. त्या थेट काळजात हात घालतात. ही झाली अनुभवाच्या पातळीवरून कवितेकडून अपेक्षा. आता कुठं व्यक्त होऊ लागलेल्या कवयित्रींनी प्रस्थापित कवींच्या रचनांचे अवलोकन करावे. प्रस्थापित कवींच्या किती कविता सादरीकरणात श्रोत्यांच्या मनात घर करतात याचीही आकडेवारी तर्कशुद्धतेने मांडावी. सादरीकरणाच्या बाबतीत सांगायचे तर अनेक प्रथितयश कवी, गेल्या कित्येक वर्षांत एकच एक कविता सादर करत आहेत. एखादी कविता कविसंमेलनात खूप गाजली की त्या कवीची काव्यप्रतिभा आटते का? अनुभव ग्रहणाची उत्स्फूर्तता संपते का? नव्या अनुभवांना, सामाजिक बदलांना कवी मन त्याच तरलतेने का टिपत नाही? अतिप्राचीन महाकाव्ये आजही अवीट वाटतात. काळापलीकडचे शाश्वत विचार त्यातून व्यक्त होतात. त्याची परंपरा मराठवाड्याला आहे, याचा लेखिका कविसंमेलनाच्या निमित्ताने वारंवार विचार झाला पाहिजे, अशी एक श्रोता म्हणून माझी अपेक्षा आहे. या अपेक्षेत कोणताही अभिनिवेश नाही, बौद्धिकदृष्ट्या सरस असलेल्या मराठवाड्याच्या साहित्य परंपरेला जागतिक स्तरावर स्थान मिळावे, हे स्वप्न त्यात आहे.