आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Trupti Jadhav Article About A Helping Third Gender Person

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मानसिकता बदलायला हवी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबादला येण्यासाठी रेल्वे स्थानकानवर गाडीची वाट पाहत होते. सोबत माझा लहान मुलगाही होता. दुसर्‍या प्लॅटफॉर्मवर नांदेडला जाणार्‍यांची लगबग सुरू होती. त्या प्लॅटफॉर्मवर गाडी प्रथम आली. मग चढणारे आणि उतरणार्‍यांची एकच गडबड उडाली. बसायला जागा मिळावी म्हणून लोक जीव धोक्यात घालून प्लॅटफॉर्मच्या विरुद्ध बाजूने चढतात आणि याच प्रयत्नात एक 60-65 वयाची वृद्ध स्त्रीदेखील होती. एका हातात काठी, दुसर्‍या हातात जड मोठी पिशवी, चष्मा, पाठ वाकलेली. या सर्व धक्काबुक्कीत या बाजूने तिला चढणे कठीण झाले होते. तेवढ्यात एक तृतीयपंथी झपकन गर्दीत घुसला आणि तिच्यावर दटावत मोडक्यातोडक्या मराठीत तिला म्हणाला, ‘आजी, मरायचं का तुला? प्लॅटफार्मवरून चढायला काय झालं तुला?’ सरक जरा बाजूला, असे म्हणत तिची काठी व पिशवी एका हातात खसकन ओढून घेतली, दुसरा हात आजीच्या कमरेभोवती घातला आणि एखाद्या बाळाला उचलावे असे अलगद तिला उचलले. बाजूची गर्दी सरकवली आणि तिला सहजपणे गाडीत चढवले. स्वत: पदर खोचून तिच्या मागे चढला. सरका सरका असे लोकांना दटावत त्याने तिला तुडुंब भरलेल्या डब्यात बसायला जागा करून दिली, पाणी पाहिजे का विचारले व हसत हसत टाळ्या वाजवत लोकांना सवयीप्रमाणे रेटत गाडीतून उडी मारत गर्दीत दिसेनासाही झाला. एरवी रेल्वेचा प्रवास नकोसा करणार्‍यांमध्ये तृतीयपंथीयांचा हातभार अगदी मोठा आहे यात वादच नाही; पण हा अनुभव अगदी वेगळा आणि विचारात पाडणारा. आपला बाडबिस्तरा सोडून दुसर्‍यांची पंचाईत कशाला याच आविर्भावात प्रवास करणारे आम्ही सर्व हा प्रसंग बघत होतो. दुसर्‍यांचे कशाला यात मीपण तर होतेच. माझे सामान, माझा मुलगा, कशी हो मदत करायची दुसर्‍याला? मात्र निसर्गाने अन्याय केलेला हा ना धड पुरुष ना धड स्त्री असा माणूस मदतीला पुढे आला.

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच याविषयी ऐतिहासिक निकाल दिला आहे. स्वत:ला स्त्री किंवा पुरुष यापैकी काहीही म्हणवून न घेता तृतीयपंथीयांना एक म्हणून प्रथमच मान्यता मिळाली आहे. आता गरज आहे ती आपली मानसिकता बदलण्याची.

truptijadhav232@gmail.com