आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Trupti Mulmule Article About Fasting For A Good Husband

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हरतालिकेच्या उपवासाची धमकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या वर्षी आपण हरतालिकेचा उपवास किंवा पूजा करायची नाही, असा माझा अगदी ठाम निर्णय झालाय. कुमारिकांनी चांगला नवरा मिळवा याकरिता हा उपवास करावा, असे म्हटले जाते. मीदेखील वयाच्या दहाव्या वर्षापासून हा उपवास गेली तेरा वर्षे अखंड करत आलेय. पण गेल्या दोन वर्षांत माझ्या अगदी जवळच्या चार-पाच मैत्रिणी त्यांच्या नवऱ्यांमुळे अक्षरश: उद््ध्वस्त झाल्यात, त्यामुळे हा उपवास आता करावासाच वाटत नाहीये.
एकीचा नवरा तिला मारझाड करतो, एकीचा बदफैली निघाला. एकीच्या नवऱ्याला दारू, गुटखा, सिगारेट अशी सारीच व्यसनं आहेत. एकीचा नवरा चांगल्या पगाराची नोकरी सोडून घरी बसून बापाची कमाई खातोय आणि आपल्या या निठल्ल्या मुलाच्या पार्श्वभागावर लाथ मारून त्याला वठणीवर आणायचे सोडून सासू-सासरे सुनेलाच दोष देत आहेत. एकीच्या घरात तर जणू मोगलाईच आहे. कुठे इच्छेने जाणे-येणेदेखील तो तिला करू देत नाही.
माझ्या या मैत्रिणींनी लग्नाआधी चांगला नवरा मिळवा म्हणून हा उपवास अगदी निष्ठेने केला आणि त्यांच्या पदरी हे कपाळकरंटे पडलेत. या चौघी-पाच जणी माझ्या अगदी जवळच्या आहेत आणि त्यांचे आयुष्य त्यांच्या नवऱ्यांमुळे उद््ध्वस्त झाले म्हणून केवळ मी हा निर्णय घेतलाय असे नाही, तर अशा कितीतरी महिला दाखवून देता येतील ज्यांच्या आयुष्याची ससेहोलपट ‘नवरा’ या एका व्यक्तीमुळे झालेली आहे. शिवाय जोडीदार कसा मिळतो हे ज्याचे त्याचे भाग्य आहे, तर मग कशाला उगाच या एकदविसीय व्रताचा घाट? केवळ रीती-परंपरा जपण्यासाठी या मनाविरुद्ध गोष्टींना का लावून धरायचे? मुलांना नाही करावा लागत उपवास चांगली बायको मिळण्यासाठी. माझ्या मैत्रिणी ‘धरवतही नाही अन्् सोडवतही नाही’ अशा कात्रीत सापडल्यात. घटस्फोट घेऊनच त्यांना आता या घुसमटीतून बाहेर पडता येईल, पण त्या तयार नाहीत. आजवर लग्नानंतर सारे आयुष्यच उद््ध्वस्त झालेल्या कितीतरी स्त्रियांविषयी मी ऐकले होते. पण दुर्दैवाने या मैत्रिणींच्या िनमित्ताने प्रत्यक्ष अनुभवास आले. तसेच, गेल्या दोन वर्षांपासून या व्रतकथेतील एक बाब फारच खटकत आहे. या कथेत म्हटलंय, जी स्त्री या दविशी आहार करील तिला प्रत्येक जन्मी वैधव्य प्राप्त होईल, दारिद्र्य येईल, पुत्रशोक होईल. जी स्त्री उपवास करणार नाही, ती भयंकर नरकात पडेल. बापरे! काय आहे हे? इतकी जबर दमदाटी. जो देव शुद््ध अंत:करणाने केलेल्या साध्या भक्तिभावाचा भुकेला आहे, त्याच्या नावे या धमक्या कशाला? बऱ्याच स्त्रियांच्या नशिबी दारिद्रय आणि पुत्रशोकही आला आहे. त्यांनीदेखील कधीतरी हा उपवास निष्ठेने केला होता आणि करतही आहेत, त्यांचं काय? एक उपवास करण्यासाठी धाक-दपटशाहीचा किती अवलंब केला जातो, त्यांच्या संवेदनशील मनाला धार्मिक पातळीवर किती भयंकरपणे छेडले जाते. समानतेच्या भावनेने प्रेरित माझ्या मनाला तर या वर्णनाची चीडच आलीये. कारण एक स्त्री विधवा होऊ शकते तर पुरुषही विधुर होऊ शकतो. अर्थात पत्नीच्या मुत्यूनंतर पुरुषाचे दुसरे लग्न समाज स्वीकारार्ह असते, पण स्त्रीबाबत तसे होत नाही. विधवा पुनर्विवाहाला समाजात आजही फारशी प्रतिष्ठा नाही. दारिद्र्य, पुत्रशोक, स्वर्गनरक या गोष्टी काही एकट्या स्त्रीपुरत्या मर्यादित नाहीत, स्त्री-पुरुष दोघांसाठी आहेत. मग या उपवासाची धमकी एकट्या स्त्रीलाच का?