आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Trupti Mulmule Article About Married Woman's Father Home

आता तरी जाऊ का माहेरा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुलाबायांच्या वेळी म्हटले जाणारे एक गाणे आहे. ‘कारल्याचं बी पेर गं सूनबाई, मग जा आपल्या माहेरा-माहेरा.’ आपल्या माहेरी जाण्यास उत्सुक असणा-या सुनेस सासूबाई हा आदेश देतात. मग सूनही उत्तर देते की, ‘कारल्याचं बी पेरलं हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा-माहेरा.’ पण सासूबाईंचं इतक्यावर काही समाधान होत नाही. त्या तिला पेरलेल्या बीला पाणी घाल, त्याला कोंब फुटू दे, मग त्याला वेल धरून तो वाढू दे, त्याला कळ्या, फुलं धरून कारली येऊ दे, मग त्याची भाजी करून ती खाऊन त्याची भांडी घासेपर्यंत कारल्याची री ओढतात. कारल्याचं बी पेरून त्याची भाजी खाईपर्यंत ती सून प्रत्येक वेळेला आपल्या सासूकडे माहेरी जाण्याविषयी विचारणी करते. आता तरी सासूने हो म्हणावेना! पण नाही, सासूबाई तिला सास-याची, दिराची, नणंदेची अशी सर्वांची परवानगी मागायला लावतात. या सर्वांच्या परवानग्या काढत सरतेशेवटी ती आपल्या नव-याजवळ येते आणि मग नवरा तिला माहेरी जाण्याची एकदाची परवानगी देतो.

सुनांनी माहेरी जायचे म्हटले की, त्यांच्या जाण्यात, आनंदात किती क्षुल्लक कारणे करून धोंडा घातला जातो याचे अत्यंत मार्मिक वर्णन या गाण्यात आले आहे. जे सदासर्वकाळ अगदी तंतोतंत लागू पडणारे आहे. सध्या आपण कितीही आधुनिकीकरणाचे धोंगडे पांघरले असले तरी सुनांच्या माहेरी जाण्याविषयीची आपली मानसिकता मात्र आजही ‘त्या’ भुलाबाईच्या गाण्यातच गुरफटलेली दिसते. ब-याच ठिकाणी असे अनुभवास येते की, सासरची मंडळी खरोखरच अगदी अनावश्यक मोडते सुनांनी माहेरी जायचे म्हटल्यावर घालीत असतात. काही सुनांना चार दिवसांत किंवा आठ दिवसांतच परत ये, या धमकीवजा आदेशाने पाठवले जाते. काही सुनेला म्हणतात की, तुला येथे खायला, प्यायला, राहायला आहे, मग कशाला माहेरचा ओढा? अशी मते ऐकली, की हसावे की रडावे तेच कळत नाही. माहेरचा ओढा का? जिथे तिचा जन्म झाला, आयुष्याची २०-२५ वर्षे तिने तिथे काढली, तिचे चालणेबोलणे, सुखदु:ख, मित्रमैत्रिणी, यश-अपयश हे सारे काही सर्वप्रथम माहेरी आईवडिलांसोबत, बहीणभावंडांसोबत अनुभवलेले असते. त्यांचे महत्त्व, ओढा लग्न झाल्याने कमी कसा होणार? पण याचा अर्थ असा मुळीच नाही की, मुलींना आपल्या सासरच्यांविषयी काही ओढा किंवा प्रेम वाटत नाही म्हणून. एकेठिकाणी तिच्या आयुष्याची सुरुवात झालेली असते तर एकेठिकाणी आयुष्याच्या अखेरपर्यंत तिला राहायचे असते. ही दोन्हीही ठिकाणे तिला सारखीच प्रिय असतात.
काही सासवांचे म्हणणे असते की, आम्हाला कुठे वेळच्या वेळी माहेरी जायला मिळायचे? म्हणजे तुम्हाला जायला मिळाले नाही म्हणून तुम्ही सुनेलाही जाऊ देणार नाही. तिची तशीच मानसिक कुचंबणा कराल, जशी तुमचीही कधी झाली होती. किती संकुचित मनोवृत्ती आहे ही. काही जण म्हणतात, की सुना माहेरी गेल्यावर नातवंडांशिवाय करमत नाही. पण ही मंडळी हे विसरतात की, मुलीची मुलं तिच्या आईवडिलांनाही प्रिय असतात. काही घरी मुलगा नसतोच. तेव्हा मुलीची मुलं हीच त्यांच्यासाठी नातवंडे म्हणून असतात. त्या नातवंडांमध्ये रमण्याचे किमान आठ-दहा दिवसांचे सुखही सासरची मंडळी देऊ शकत नाही. सुनांनी आपल्या घरच्या जबाबदा-या टाकून वरचे वर माहेरी जाऊ नये. पण सुनेला तिच्या इच्छेनुसार माहेरी जाऊच द्यायचे नाही, हे मात्र अमान्य. सुनांच्या माहेरी जाण्यात कुठलीही आडकाठी न घालणारी सासरची मंडळी निश्चित काही सुनांच्या नशिबात असतीलही.सुनेने माहेरी जाण्याविषयी विचारल्यावर तिला कुठल्याही अडवणुकीशिवाय आनंदाने परवानगी देऊन तर बघा. अशी बिनशर्त परवानगी मिळाल्याने जो आनंद होईल त्यापेक्षाही अधिक आदर तुमच्याविषयी वाटेल. कुठलेही नाते टिकण्यात तोच अत्यंत महत्त्वाचा आहे. नाही का?