आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदलाची अपेक्षा स्त्रीकडूनच का ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुनयना खरंच सुनयनाच आहे, फारच बोलके डोळे आहेत तिने. काजळ लावल्यानंतर तर सुरेख वाटतात; पण लग्नानंतर तिने काजळ लावणे बंद केले. कारण नव-याला आवडत नाही काजळ लावलेले.
नेहाला आपली कामे आटपून शेजारी नव्यानं मिळालेल्या मैत्रिणीशी गप्पा मारायला आवडायचे; पण नव-याला पटत नव्हत म्हणून तिने ते बंद केले. वीणाला बोरं फारच प्रिय, पण तिच्या नवरोबाला त्याचा वास आवडत नाही. मग काय वीणाचं सीझनल असणारं आवडतं फळ खाणं बंद झालं.अशी एक ना हजार उदाहरणे देता येतील जिथे बायका फक्त त्यांच्या नव-यांना अमुक एक गोष्ट केलेली, घेतलेली, घातलेली इतकंच नव्हे, तर पाहिलेलीदेखील आवडत नाही म्हणून ते बंद करतात. नवरे मात्र या सर्व गोष्टींना बांधील नसतात. बहुतेक बायकांना गुटखा खाणे, सिगारेट ओढणे पसंत नसते. पण किती नवरे आपल्या पत्नीसाठी म्हणून असल्या सवयी बदलतात? अपवाद म्हणून लाखात एखादं उदाहरण जरी देता आलं ना तरी पुरे.
स्त्रीवर तिच्या नव-याला न रुचणारी एखादी गोष्ट बदलण्याची सक्ती केली जाते, ती नव-यावर कधीच केली जात नाही. तोदेखील पुरुषी अहंपणात ‘त्या’ सवयी बदलण्याची तसदी घेत नाही. उदा.एका नवरोबाला आपल्या बायकोने साधा केरकचरा टाकायलादेखील घराबाहेर आल्याचे आवडत नव्हते. ती क्वचितच जरी बाहेर आली की, तो तिला मारहाण करायचा. पण त्यांच्यात समझोता घडवून आणताना घरचे काय अन् दारचे काय, ‘तिला’च समजावयाचे, की ‘त्याला’ आवडत नाही तर तू कशाला बाहेर येतेस. हे ,ऐकून एक संतप्त सवाल मनात उठला, की ‘तिला’ हे शहाणपण शिकवणारे हे पुरुषी समाजाचे ठेकेदार ‘त्याला’ तिच्यावर विश्वास ठेवायला, तिला मोकळीक द्यायला का नाही शिकवत? ती काय बंदीवान आहे? तिने कामोकामीदेखील घराबाहेर पडू नये? आणि तेही त्या नव-याला आवडत नाही म्हणून?
ही एकाच स्त्रीची समस्या आहे असे नाही, किती तरी स्त्रिया या किंवा यापेक्षाही भीषण मानसिक अन् शारीरिक जाचाला नेहमीच सामो-या जातात; पण बदलाची अपेक्षा ही स्त्रीकडूनच केली जाते.
नव-यांच्या विशिष्ट सवयीने त्रासलेल्या कितीतरी स्त्रिया दाखवून देता येतील. कित्येक स्त्रियांसाठी नव-याचे उशिरा घरी येणे ही मोठीच समस्या आणि तक्रारीचे कारण असते. पण बहुतांश पुरुष त्यात कधीच बदल करीत नाहीत. स्त्रियांनाच त्यांच्याशी जुळवून घ्यावे लागते. दारू, सिगारेट आणि गुटखा ही तर जणू स्त्रियांची एक सार्वत्रिक समस्याच झाली आहे. विशेषत: दारूने कित्येक संसार उद्ध्वस्त झालेत आणि अजूनही होत आहेत. पण पुरुषांना केवळ दारू सोडण्याचा सल्लाच दिला जातो, आग्रह कधीच केला जात नाही. तेच एखाद्या स्त्रीची कितीही क्षुल्लक सवय असली तरी तिच्यावर मात्र ती सवय सोडण्याची अथवा बदलण्याची सक्ती अगदी सर्व स्तरांतून केली जाते. कारण एकच, नव-याला आवडत नाही.