आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थँक्यू शादी.कॉम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘शादी डॉट कॉम’ या आघाडीच्या मॅट्रिमोनियल संकेतस्थळाच्या एका राष्ट्रव्यापी सर्वेक्षणात असा निष्कर्ष निघाला आहे की, ६४.१% मुलींना, तर ४३.९% मुलांना स्वत:चा वेगळा संसार थाटायला आवडेल. महत्त्वाचे हे की, केवळ मुलींनाच वेगळा संसार थाटावा वाटतो असे नाही, तर मुलांनाही स्वतंत्र संसाराची आवड आहे. नवविवाहित जोडप्याने वेगळा संसार थाटला रे थाटला की लागलीच मुलींची उणी-दुणी काढली जातात की, आजकालच्या मुलींना सासरची मंडळीच संसारात नको असतात. आई-वडिलांच्या संस्काराचा उद्धार केला जातो तो वेगळा.
बहुतांश मुलींना आपला वेगळा संसार थाटण्याची आवड असते, हे सत्य नाकारायचे नाही. पण प्रत्येकच वेळेला सून नवऱ्याला वेगळे घर करण्याचा आग्रह करते, हा एक सोयीस्कर गैरसमज वाटतो. बऱ्याचदा मुलांनाही वेगळ्या इच्छा-अपेक्षा असतात. त्या घरातील वडीलधाऱ्यांच्या आग्रहामुळे पूर्ण करण्याची संधीच मिळत नाही. शिवाय मुलांकडे वृद्धापकाळातील एक आधार म्हणून पाहिले जाते. त्यामुळे या भावनिक बंधाला तोडणे-सोडणे मुलांनाही सहज शक्य नसते. बऱ्याचदा मुलांचे घरातील ज्येष्ठांशी वैचारिक, तात्त्विक मतभेद असतात. मुले त्यांच्या विरोधातही वागू शकत नाही की, त्यांच्यानुसार आपले आचरणही ठेवू शकत नाहीत. त्यामुळेच लग्नानंतर नवऱ्याने पत्नीच्या साहाय्याने किंवा तिच्यामार्फत आपले मनोरथ पूर्ण केले तरी नाव नेहमी सुनेचेच वाईट होते. इतके दिवस आपल्यात राहणारा, प्रत्येक गोष्ट एेकणारा मुलगा लग्नानंतर इतका कसा बदलला? तो बदल खरे तर लग्नानंतरचा नसतोच मुळी, ती आधीचीच विचारसरणी असते. शादी डाॅट काॅमच्या सर्वेक्षणामुळे मुलांनाही मोकळेपणाने आपल्या भावना व्यक्त करता आल्या. कारण बरेचदा पुरुष आपल्या आई-वडिलांच्या आदरातून किंवा जबाबदारीच्या जाणिवेतून आपल्या अशा काही इच्छा-अपेक्षा उघडपणे बोलून दाखवू शकत नाही. परंपरेचा आणि सामाजिक बांधिलकीचा जणू एक बोजा त्यांच्या मनावर असतो. त्यामुळेच एका वेगळ्या पण सर्वव्यापी विषयावर झालेल्या या सर्वेक्षणाचे आभारच मानायला हवे. त्याने लग्नानंतर वेगळा संसार थाटणाऱ्या जोडप्याकडे विशेषत: मुलींकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची दिशा तर दिलीच. शिवाय मुलांनाही आपले विचार-भावना ‘या’ विषयांवर व्यक्त करण्याची अपूर्व संधी दिली. त्यामुळे खरे चित्र सुजाण वर्गापुढे आले आहे.