आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जोडशब्दाची जादू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सीनियर सिटिझन - ज्येष्ठ नागरिक हा जोडशब्द गेल्या दोन दशकांपासून खूप वापरात येऊ लागला आहे. हे दोन शब्द वेगवेगळ्या स्वरूपात नवीन नाहीत. पण त्यांना एकत्र जोडल्यावर त्यातून जी अर्थछटा प्रकट होते, ती कोणत्याही देशाच्या संस्कृती आणि संस्कारांना अधिक सुंदर बनवते.

कालपरवापर्यंत ज्येष्ठ नागरिकांना आपल्याकडे काका किंवा मावशी म्हटलं जायचं, काही ठिकाणी म्हातारा-म्हातारी किंवा आजोबा-आजी म्हणत. आपल्यापैकी साठी उलटलेल्यांना आठवत असेल, की त्यांना उद्देशून पहिल्यांदा जेव्हा यापैकी एखादे संबोधन वापरले गेले, त्या वेळी कोपराच्या हाडावर मार लागल्यासारखे वाटले असेल. ही भावना यथावकाश कमी होत जाते आणि हे संबोधन पचनी पडून जाते. असे झाले तरी अशा प्रकारचे संबोधन आपल्यासाठी न वापरले गेले तर बरे, ही भावना मनात असतेच! ‘सीनियर सिटिझन’ला ‘ज्येष्ठ नागरिक’ असा चपखल प्रतिशब्द असूनही तो इंग्रजी शब्द भारतातील बहुतेक सगळ्याच भाषांनी स्वीकारला आहे.

मात्र आता पन्नासाव्या वर्षीही कुणाला वृद्ध म्हणता येणार नाही. सरासरी आयुर्मान 63-64च्या घरात पोहोचलेय. संशोधन आणि वैद्यकशास्त्राच्या विकासामुळे ही 63-64ची मर्यादा अगदी नजीकच्याच काळात 70 किंवा त्यापुढे गेली तर नवल वाटायला नको. मात्र नवल या गोष्टीचं वाटतं की सरकारी नियम आणि धोरणाप्रमाणे सीनियर सिटिझन कुणाला म्हणायचं हे अजूनही आपल्याला नेमकं ठाऊक नाही. आंध्र प्रदेश सरकारने काही वर्षांपूर्वी सरकारी नोकरांचं निवृत्ती वय 58 वरून 55 वर आणलं होतं. तसं पाहिलं तर 58 ही वयोमर्यादा सर्व ठिकाणी स्वीकारली गेली आहे. बँकांमधून काही कर्मचारी वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षी निवृत्त होतात, तर काही साठाव्या. इंडियन एअरलाइन्स किंवा एअर इंडियासारख्या काही आस्थापनांतून ही मर्यादा 62 आहे. असं असूनही केंद्र सरकारच्या आयकर विभागाच्या कायद्याप्रमाणे सीनियर सिटिझन म्हणून आयकर भरताना मिळणारे फायदे वयाची पासष्टी पूर्ण केल्यावरच मिळतात. ही विसंगती समजण्यापलीकडची आहे. नोकरीतील वयोमर्यादेमुळे 55 पूर्ण झाल्याबरोबर निवृत्त होणारा नागरिक आयकर धोरणाचा लाभ आणखी एक दशकभर घेऊ शकत नाही. सर्वांची 63-64 ही सरासरी आयुर्मर्यादा लक्षात घेता याचा अर्थ असा होतो की, पंचावन्नाव्या वर्षी निवृत्त झालेला माणूस आयकर धोरणातील लाभ घेण्यास पात्र होण्यापूर्वीच मृत्यू पावतो.

खरं पाहता ज्येष्ठ नागरिकांना बँक, पोस्ट ऑ फिस, रेल्वेच्या तिकिटाची खिडकी अशा ठिकाणी अग्रताक्रम देऊन त्यांच्याबद्दल आदर व्यक्त व्हायला हवा. त्यांच्याप्रति अशा प्रकारचं सहज सौजन्य दाखवण्यानं काही आभाळ कोसळणार नाही. अशा सोयी-सवलतींचा गैरफायदा घेणारे महाभागही निघतील यात शंका नाही. पण ज्या देशाच्या लोकसंख्येत केवळ आठ टक्के ज्येष्ठ नागरिक असतील तिथे असा गैरफायदा घेणारे किती निघतील? शंभरापैकी पाच माणसे अप्रामाणिक निघाली तर त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था किंवा प्रशासन विस्कळीत होणार नाही. नियम कितीही ‘फुलप्रूफ’ केले तरी पाच- दहा टक्के अवैध गोष्टी करणारे निघतातच.

सीनियर सिटिझन या जोडशब्दांनी एक विशिष्ट मानसिक परिवर्तन घडवलं आहे. त्याची नोंद घ्यायलाच हवी. आता साठी ओलांडलेल्या मंडळींना आपली ओळख करून देताना संकोच वाटत नाही. ‘आता मी ज्येष्ठ नागरिक आहे’ असं सहज ताठ मानेनं म्हणतात आणि तुम्ही माझ्याशी सौजन्यपूर्ण व्यवहार करायला हवा, असंच जणू त्यातून ध्वनित होत असतं. आपल्याकडे ही सौजन्यसंस्कृती पूर्णत: विकसित झाली नसली तरी आता ती व्यापक होत आहे, ही समाधानाची बाब आहे. भगवान बुद्धांनी वैशालीच्या लिच्छवी प्रजेला जे सात मंत्र दिले होते त्यातील एक मंत्र असा होता : हे प्रजाजनहो, जोवर तुम्ही तुमच्या राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींचा उचित सन्मान करत राहाल तोवर वैशाली कुणीच जिंकू शकणार नाही. तथागत बुद्धांचा हा मंत्र आजही तितकाच अर्थपूर्ण आहे.

काही वर्षांपूर्वी अमेरिकेच्या पिट्सबर्ग शहरात प्रकाशित होणारं एक वैशिष्ट्यपूर्ण साप्ताहिक माझ्या पाहण्यात आलं होतं. या साप्ताहिकाचं नाव होतं ‘सीनियर सिटिझन’. बत्तीस पानांच्या टॅब्लॉइड आकाराच्या या नियतकालिकात ज्येष्ठ नागरिकांसाठीच विशेष प्रकारचं वाचन-साहित्य देण्यात आलं होतं. या साप्ताहिकात ज्येष्ठ नागरिकांच्या मानसिक समस्यांपासून करकपातीसारख्या आर्थिक गोष्टींवर हलकीफुलकी चर्चा करण्यात आली होती. अगदी पत्रमैत्रीच्या वा ‘मॅट्रिमोनिअल’ जाहिरातीसुद्धा होत्या. याशिवाय चिंतनात्मक साहित्य आणि हलकेफुलके विनोदही होते. अशा प्रकारचं नियतकालिक आपल्या देशातल्या एखाद्या प्रादेशिक भाषेत निघत असल्याचं ऐकिवात वा पाहण्यात नाही. आपल्याकडे ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनसाहित्य म्हणून धार्मिक ग्रंथांकडे बोट दाखवले जाते. वयाच्या साठीपर्यंत ज्यांना गीता वा भागवताविषयी फारशी माहिती नाही, त्यांना हे सगळं वाचायला सांगणं ही एक प्रकारची क्रूर चेष्टाच आहे.

ज्याप्रमाणे बालरोग वा स्त्रीरोगतज्ज्ञ असतात, पती-पत्नीच्या यौवनसुलभ प्रश्नावर सल्ला देणारे डॉक्टर असतात, त्याचप्रमाणे वृद्धांच्या शारीरिक अवस्थेविषयीही वेगळा विचार असायला हवा. पाश्चिमात्य देशातील सामाजिक सुरक्षेसारखी कल्पना आपल्याकडे आजवर नव्हती आणि अजूनही नाही. याचं कारण असं की, आपल्याकडे आजवर दोन, तीन पिढ्या सर्रास एकत्र राहत असत. हे आता वेगानं अदृश्य होत चाललं आहे. आता तर मुलगा वा मुलगीही पालकांपासून वेगळे राहू लागले आहेत. सध्याच्या ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीनं हा संक्रमण काळ आहे. हे सगळे आपल्या बालपणी आणि तरुणपणीही संयुक्त कुटुंबात राहत होते. अशा कुटुंबातून जे व्यक्तिगत लाभ मिळत, ते सर्व बहुतेक आयुष्याच्या उत्तरार्धात! सध्याचे ज्येष्ठ नागरिक जेव्हा अशा प्रकारचे लाभ मिळवण्याच्या अवस्थेत आले आहेत, तेव्हा संयुक्त कुटुंबाच्या विघटनामुळे या लाभाला पारखे झाले आहेत. त्यांच्या बाबतीत मानसिक समस्या अधिक निर्माण झाल्या आहेत. या समस्या आणि त्यांचे आनुषंगिक प्रश्न यावर पुष्कळ चर्चा होऊ शकते. त्याची कारणे, उपाय व दूरगामी परिणामांविषयी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यास करता येईल. लोकप्रिय इंग्रजी लेखक ए. जी. गार्डिनर यांनी एका निबंधात सूर्योदय आणि सूर्यास्त यांची तुलना केली आहे. ते लिहितात, ‘जसं सूर्योदयाचं स्वत:चं सौंदर्य असतं, तसाच सूर्यास्तही देखणा असतो.’ हेच तर निसर्गाचे वैशिष्ट्य आहे. मानवसर्जित सौंदर्य कितीही अनुपम असले तरी त्याचा पुन:पुन्हा उपभोग घेतल्यास त्यातून मिळणा-या आनंदात घट होते. कितीही सुंदर चित्र, शिल्प किंवा संगीत वारंवार पाहिले आणि ऐकले तर होणारी अनुभूती प्रत्येक वेळी तितकीच राहत नाही. निसर्गाबद्दल मात्र असे म्हणता येणार नाही. भरती-ओहोटी असो, प्रत्येक वेळी या घटना तितक्याच सुंदर आणि अनोख्या दिसतात. मानवदेह हाही निसर्गदत्त; तेव्हा त्यालाही हा नियम लागू पडतो. जीवनाचा सूर्योदय म्हणजे शिशुअवस्था रम्य आहे, तर जीवनाचा सूर्यास्त म्हणजे वृद्धावस्थाही काही कमी सुरम्य नाही!

(गुजराती मासिक ‘अखंड आनंद’मधून साभार)
अनुवाद : प्रतिभा काटीकर