आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘निवद’ आणि ‘मिरवणूक’ असे दोन कथासंग्रह लवकरच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव येथील इंग्रजीचे अध्यापक आणि कथा-कादंबरीकार उमेश मोहिते सन 1985 पासून लेखन करीत असून आतापर्यंत त्यांची चार पुस्तके प्रकाशित झाली आहेत. इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारा हा लेखक रमतो मात्र मराठी साहित्यात. त्यांचे ‘निवद’ आणि ‘मिरवणूक’ असे दोन कथासंग्रह लवकरच प्रसिद्धीच्या मार्गावर असून, नुकतीच त्यांची ‘बांधणूक’ ही कादंबरी औरंगाबादच्या जनशक्ती वाचक चळवळीने प्रसिद्ध केली आहे. या कादंबरीत गाव पातळीवरील आजचे वास्तव शब्दबद्ध केले आहे.

आजच्या जागतिकीकरणाच्या युगामध्ये चंगळवादी प्रवृत्तीची लागण अशिक्षित वर्गातदेखील कशी झाली आहे याचे मनोज्ञ चित्रण या कादंबरीतून घडते. बजरंग, गिरजा, सखू व नामदेव या प्रमुख व्यक्तीरेखा आहेत. त्यात गिरजा या नायिकेची अंगभूत हुशारी अभिव्यक्त केली आहे. गिरीजा ही निरक्षर माता आपल्या भरकटलेल्या मुलाचे व्यक्तिमत्त्व कसं उभारते हे मुळातूनच वाचण्यासारखं आहे. गिरजा या नायिकेचं धीरोदात्त व्यक्तिमत्त्व बघून वाचकालादेखील स्तीमित व्हायला होतं. बांधणूक मधून व्यसनाच्या आहारी गेलेल्या बजरंगला ही माता कशी मार्गावर आणते म्हणजे त्याच्या ढासळलेल्या व्यक्तिमत्त्वाची बांधणूक कशी करते हे समरसून लिहिले आहे.
कष्टकरी, श्रमिक, अशिक्षित शेतमजुरांच्या व्यथा, वेदना शब्दबद्ध करणार्‍या उमेश मोहिते यांचा पहिला कथासंग्रह ‘जागरण’ 1993 ला प्रसिद्ध झाला असून या पुस्तकाला प्रतिष्ठेचा कै. भि. ग. रोहमारे पुरस्कारही 1994 मध्ये प्राप्त झाला होता. जागरण या पुस्तकाची दुसरी आवृत्ती जनशक्ती वाचक चळवळ या प्रकाशन संस्थेमार्फत लवकरच प्रसिद्ध होत आहे. ‘वळख’ हा त्यांचा दुसरा कथासंग्रह 2009 ला प्रसिद्ध झाला असून त्याला औरंगाबाद येथील शोतकरी साहित्य पुरस्कार ख्यातनाम समीक्षक डॉ. सुधीर रसाळ व प्राचार्य रा. रं. बोराडे यांच्या हस्ते मिळाला आहे. शिवाय ‘वळख’ हा कथासंग्रह डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या एम. ए. मराठीच्या अभ्यासक्रमातदेखील समाविष्ट होता हे विशेष. 2011 मध्ये उमेश मोहिते यांची वळण ही कादंबरी मीरा बुक्स अ‍ॅँड पब्लिकेशन, औरंगाबाद यांनी प्रकाशित केली असून या कादंबरीतून त्यांनी कुमार अवस्थेतील मुलांचे भावविश्व रेखाटले आहे. जून 2013 मध्ये या कादंबरीला उदगीर (जि. लातूर) येथील कै. विलास मोहिते स्मृती राज्यस्तरीय साहित्य साधना पुरस्कार डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते मिळाला आहे. याशिवाय ‘निवद’ आणि ‘मिरवणूक’ असे दोन कथासंग्रह लवकरच प्रसिद्ध होणार असल्याची माहिती उमेश मोहिते यांनी दिली.